शस्त्र अधिनियम १९५९
कलम २ :
व्याख्या व निर्वचन :
१) या अधिनियमात, संदर्भामुळे अन्यथा आवश्यक नसल्यास,-
(a)क)(अ) संपादन याचे व्याकरणिक रूपभेद व सजातीय शब्दप्रयोग धरून त्यामध्ये, भाड्याने घेणे, उसनवार घेणे, किंवा देणगी म्हणून स्वीकारणे या गोष्टी अंतर्भूत आहेत,
(b)ख)(ब) दारूगोळा याचा अर्थ, कोणत्याही अग्निशस्त्रांसाठी लागणारा दारूगोळा असा असून, त्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो :-
एक) अग्निबाण, बाँब, स्फोटगोळा, कुलपी गोळे व १.(अन्य क्षेपणास्त्रे)
दोन) टॉर्पेडो वापरणे व पाण्याखाली सुरूंग पेरणे यासाठी बनवलेल्या वस्तू,
तीन) स्फोटक, स्फूर्जक किंवा विखंडनीय सामग्री किंवा अपायकारक द्रव, वायू किंवा अशी अन्य वस्तू-मग ती अग्निशस्त्राबरोबर वापरण्याजोगी असो अथवा नसो ज्यामध्ये आहे किंवा आत राहू शकेल अशा रीतीने बनवलेल्या किंवा तदनुकूल बदल करून घेतलेल्या अशा अन्य वस्तू,
चार) अग्निशस्त्रांतील बार आणि अशा बारांसाठी सहायक वस्तू,
पाच) पलिते व घर्षणनलिका,
सहा) दारूगोळ्याचे भाग व तो तयार करण्याची यंत्रसामुग्री आणि
सात) केंद्र शासन, याबाबतीत शासकीय राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशी दारूगोळ्याची घटकद्रव्ये,
(c)ग)(क) शस्त्रे याचा अर्थ, हल्ल्याची किंवा बचावाची आयुधे म्हणून बनवलेल्या किंवा तदनुकूल बदल करून घेतलेल्या कोणत्याही वर्णनाच्या वस्तू असा आहे आणि त्यात, दारूगोळा, धारदार व अन्य प्राणघातक आयुधे व शस्त्राचे भाग आणि ती शस्त्रे तयार करण्याची यंत्रसामुग्री यांचा समावेश होतो, पण लाठी किंवा चालतांना वापरावयाची साधी काठी यांसारख्या, केवळ घरगुती किंवा शेकती कामासाठी बनवलेल्या वस्तू, आणि ज्यांचा खेळणी म्हणून होणारा उपयोग सोडून अन्यथा उपयोग होऊ शकत नाही किंवा वारप-योग्य आयुधे म्हणून ज्यांचे रूपांतर होऊ शकत नाही अशी आयुधे यांचा समावेश नाही.
(d)२.(घ) ड)जिल्हा दंडाधिकारी याचा, ज्या कोणत्याही क्षेत्रासाठी पोलीस आयुक्ताची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा क्षेत्राच्या संबंधातील अर्थ, पोलीस आयुक्त असा आहे. अशा संपूर्ण क्षेत्रावर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर अधिकारिता वापरणारा जो कोणताही पोलीस उपआयुक्त राज्य शासनाकडून याबाबतीत अशा क्षेत्राच्या किंवा त्याच्या भागाच्या संबंधात विनिर्दिष्ट केला जाईल त्याचा त्यात समावेश होतो.)
(e)ङ)(इ) अग्निशस्त्रे याचा अर्थ, कोणतेही स्फोटक द्रव्य किंवा अन्य रूपातील ऊर्जा यांद्वारे कोणत्याही प्रकारचे क्षेप्यके किंवा क्षेप्यके सोडण्यासाठी बनवलेली किंवा तदनुकूल बदल करून घेतलेली कोणत्याही वर्णनाची शस्त्रे असा आहे, आणि त्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो:-
एक) तोफा, हातगोळे, दंगल-पिस्तुले किंवा कोणताही अपायकारक द्रव, वायू किंवा अशी अन्य वस्तू सोडण्यासाठी बनवलेली किंवा तदनुकूल बदल करून घेतलेली कोणत्याही प्रकारची आयुधे,
दोन) अग्निशस्त्रांची रंजक उडवल्यामुळे होणारा आवाज किंवा चकमकाट कमी करण्यासाठी बनवलेली किंवा तदनुकूल बदल करून घेतलेली अशा कोणत्याही अग्निशस्त्रांची उपसाधने,
तीन) अग्निशस्त्रांचे भाग व ती निर्माण करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री, आणि
चार) तोफा चढवणे, वाहून नेणे व त्या डागणे यांसाठी लागणाऱ्या गाड्या, मचाणी व उपयंत्रे.
(ea)३.(ङक)(इअ) लायसन म्हणजे याचा अर्थ, या अधिनियमानुसार केलेल्या नियमांच्या तरतुदींनुसार जारी केलेले (दिलेले) लायसन अभिप्रेत आहे आणि याच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक स्वरुपात जारी (दिलेला) केलेले लायसन देखील आहे.)
(f)च) (फ)लायसन प्राधिकरण याचा अर्थ, या अधिनियमानुसार केलेल्या नियमांखाली लायसने देण्याची किंवा त्यांचे नवीकरण करण्याची शक्ती प्रदान केलेला अधिकारी किंवा प्राधिकरण असा आहे, आणि त्यात शासनाचा समावेश होतो,
(ff)४.(चच)(फफ) दंडाधिकारी याचा अर्थ, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) या खालील कार्यकारी दंडाधिकारी असा आहे.)
(g)छ) (ग)विहित याचा अर्थ, या अधिनियमानुसार केलेलल्या नियमांद्वारे विहित केलेले असा आहे,
(h)ज) (ह) मनाई केलेला दारूगोळा याचा अर्थ, कोणताही अपायकारक द्रव, वायू किंवा अशी अन्य वस्तू ज्यामध्ये आहे, किंवा आत राहू शकेल अशा रीतीने बनवलेला किंवा तदनुकूल बदल करून घेतलेला असा कोणताही दारूगोळा असा आहे, आणि त्यात अग्निबाण, बाँब स्फोटक गोळे, कुलपी गोळे, ५.(क्षेपणास्त्रे) टॉर्पेडो वापरणे व पाण्याखाली सुरूंग पेरणे यांसाठी बनवलेल्या वस्तू व केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे मनाई केलेला दारूगोळा म्हणून विनिर्दिष्ट करील अशा अन्य वस्तू यांचा समावेश होतो.
(i)झ)(आय) मनाई केलेली शस्त्रे याचा अर्थ,-
एक) जी अग्निशस्त्रे घोड्यावर दाब दिला असता, घोड्यावरून दाब काढून घेण्यात येईपर्यंत किंवा क्षेपणास्त्रे ठेवलेला कोठा रिकामा होईपर्यंत त्यातून क्षेपणास्त्रे सुटत राहतील अशा रीतीने बनवलेली किंवा तदनुकूल बदल करून घेतलेली असतात ती अग्निशस्त्रे, किंवा
दोन) कोणताही अपायकारक द्रव, वायू किंवा अशी अन्य वस्तू सोडण्यासाठी बनवलेली किंवा तदनुकूल बदल करून घेतलेली कोणत्याही वर्णनाची आयुधे, असा आहे, आणि त्यामध्ये तोफा, विमानवेधी व रणगाडावेधी अग्निशस्त्रे आणि केंद्र शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे मनाई केलेली शस्त्रे म्हणून विनिर्दिष्ट करील अशी इतर शस्त्रे यांचा समावेश आहे.
(j)ञ) (जे) लोकसेवक याला, भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याच्या कलम २१ मध्ये असलेलाच अर्थ आहे.
(k)ट)(के) हस्तांतरण याचे व्याकरणिक रूपभेद व सजातीय शब्दप्रयोग धरून त्यामध्ये भाड्याने देणे, उसनवार देणे व कब्जा देऊन टाकणे याचा समावेश आहे.
२) या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, अग्निशस्त्राच्या नळीची लांबी तोंडापासून, रंजक झाडण्यात आल्यावर ज्या ठिकाणी बाराचा स्फोट होतो तेथपर्यंत मोजण्यात येईल.
३) एखाद्या क्षेत्रात अंमलात नसलेल्या कोणत्याही कायद्याच्या या अधिनियमात केलेल्या कोणत्याही उल्लेखाचा त्या क्षेत्राच्या संबंधातील अर्थ त्या क्षेत्रात कोणताही समनुरूप कायदा अंमलात असल्यास त्या कायद्याचा उल्लेख म्हणून लावला जाईल.
४) कोणताही अधिकारी किंवा प्राधिकारी यांचा या अधिनियमात कोणताही उल्लेख येईल तेव्हा, जेथे त्याच पदनामाचा कोणताही अधिकारी किंवा प्राधिकारी नसेल अशा एखाद्या क्षेत्राच्या संबंधात त्याचा अर्थ, केंद्र शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अधिकाऱ्याचा किंवा प्राधिकाऱ्याचा उल्लेख म्हणून लावला जाईल.
———-
१. १९८८ चा अधिनियम क्रमांक ४२ याच्या कलम २ द्वारे मूळ मजकूराऐवजी समाविष्ट केले.(१-८-१९८८ पासून)
२. १९७१ चा अधिनियम क्रमांक ५५ याच्या कलम २ द्वारे मूळ खंडाऐवजी समाविष्ट करण्यात आला. (१३-१२-१९७१ पासून)
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ४८ याच्या कलम २ द्वारा (१४-१२-२०१९ पासून) पोटकलम (१) मधील खंड (ङ) नंतर समाविष्ट करण्यात आले.
४. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम २ अन्वये (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात अ्राले.
५. १९८८ चा अधिनियम क्रमांक ४२ याच्या कलम २ द्वारे (१-९-१९८८ पासून) समाविष्ट करण्यात आले.