शस्त्र अधिनियम १९५९
कलम २१ :
कब्जा कायदेशीर असण्याचे बंद झाल्यावर शस्त्रे, इत्यादींचा निक्षेप :
१) ज्यांचा कब्जा लायसनाचा कालावधी संपल्यामुळे किंवा लायसनाचे निलंबन किंवा प्रत्याहरण करण्यात आल्यामुळे किंवा कलम ४ खाली अधिसूचना काढण्यास आल्यामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे कायदेशीर असण्याचे बंद झाले असेल अशी कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा ज्या व्यक्तीच्या कब्जात असेल अशी कोणतीही व्यक्ती, अनावश्यक विलंब न लावता सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे किंवा विहित करण्यात येतील अशा शर्तीच्या अधीनतेने, लायसनधारक व्यापाऱ्याकडे किंवा जर अशी व्यक्ती संघराज्याच्या सशस्त्र सेनेची सदस्य असल्यास पथक शस्त्रगारामध्ये तो निक्षिप्त करील.
स्पष्टीकरण :
या पोटकलमातील पथक शस्त्रागार या संज्ञेमध्ये भारतीय नौसेनेच्या जहाजामधील किंवा आस्थापनेमधील शस्त्रागार समाविष्ट आहे.
२) शस्त्रे किंवा दारूगोळा पोटकलम (१) खाली निक्षिप्त करण्यात आला असेल त्याबाबतीत, निक्षेपक, किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याचा वैध प्रतिनिधी, विहित करण्यात येईल असा कालावधी संपण्यापूर्वी कोणत्याही वेळी –
(a)क)(अ) या अधिनियमाच्या किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याच्या आधारे तो अशाप्रकारे निक्षिप्त केलेली कोणतीही वस्तू आपल्या कब्जात घेण्यास हक्कदार झाल्यावर ती परत मिळण्यास, किंवा
(b)ख)(ब) या अधिनियमाच्या किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याच्या आधारे, जी व्यक्ती अशा प्रकारे निक्षिप्त केलेली कोणतीही वस्तू आपल्या कब्जात घेण्यास किंवा तिच्या विल्हेवाटीतून मिळणारे उत्पन्न मिळण्यास हक्कदार असेल किंवा ती कब्जात ठेवण्यास या अधिनियमाद्वारे किंवा अशा अन्य कायद्याद्वारे जिला मनाई करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही व्यक्तीकडे विक्रीद्वारे किंवा अन्यथा हस्तांतरित करून तिची विल्हेवाट करण्यास किंवा विल्हेवाट प्राधिकृत कऱ्यास हक्कदार असेल :
परंतु, या पोटकलमातील कोणतीही गोष्ट, ज्याचे अधिहरण कलम ३२ खाली निदेशित करण्यात आले असेल अशी कोणतीही वस्तू परत करण्यास किंवा तिची विल्हेवाट करण्यास प्राधिकृत करते असे मानले जाणार नाही.
३) निक्षिप्त करण्यात आलेल्या व पोटकलम (२) खाली, त्यामध्ये निर्देशिलेल्या कालावधित परत न मिळालेल्या किंवा विल्हेवाट न करण्यात आलेल्या सर्व वस्तू जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या आदेशान्वये समपहृत होऊन शासनाकडे जमा होतील :
परंतु, एखाद्या लायसानचे विलंबन झाले असल्यास लायसनाच्या कक्षेत येणाऱ्या वस्तूच्या बाबतीत, निलंबन-कालावधित असा कोणताही समपहरण आदेश देण्यात येणार नाही.
४) पोटकलम (३) खाली आदेश काढण्यापूर्वी, विहित रीतीने निक्षेपकावर किंवा त्याचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या वैध प्रतिनिधीवर लेखी नोटीस बजावून तीद्वारे जिल्हाधिकारी, नोटिशीत विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या वस्तू का समपहृत येऊ नयेत याचे कारण त्याने नोटीस बजावण्यास आल्यापासून तीस दिवसांच्या आत दाखवावे अशी आज्ञा करील.
५) निक्षेपकाने किंवा, प्रकरणपरत्वे, त्याच्या वैध प्रतिनिधीने कोणतेही कारण दाखवले असल्यास ते विचारात घेऊन जिल्हा दंडाधिकारी, त्याला योग्य वाटेल असा आदेश देईल.
६) समपहृत होऊन जमा झालेल्या वस्तू किंवा त्यांच्या विल्हेवाटीपासून झालेले उत्पन्न शासन संपूर्णत: किंवा अंशत: कोणत्याही वेळी निक्षेपकाला किंवा त्याच्या वैध प्रतिनिधीला परत करू शकेल.