Arms act कलम १० : शस्त्रे, इत्यादी आयात व निर्यात करण्यासाठी लायसन :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम १० :
शस्त्रे, इत्यादी आयात व निर्यात करण्यासाठी लायसन :
१) कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या उपबंधानुसार यासंबंधातील लायसन धारण केल्याशिवाय समुद्रमार्गे, भूभाग किंवा हवाईमार्गे कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा भारतामध्ये आणता येणार नाही किंवा तेथून बाहेर नेता येणार नाही ;
परंतु –
(a)क)(अ) कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा आपल्या कब्जात ठेवण्यास या अधिनियमाच्या किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याच्या आधारे हक्कदार असलेल्या किंवा तसे करण्यास या अधिनियमाद्वारे किंवा अशा कायद्याद्वारे जिला मनाई करण्यात आलेली नसेल अशा व्यक्तीस, याबाबतीतील लायसन असल्याशिवाय अशी शस्त्रे किंवा दारूगोळा स्वत:च्या खाजगी वापराकरिता वाजवी परिमाणात भारतात आणता येईल किंवा भारताबाहेर नेता येईल;
(b)ख)(ब) केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा कोणत्याही देशाचा खराखुरा पर्यटक असून ज्या व्यक्तीला कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा आपल्या कब्जात ठेवण्यास त्या देशाच्या कायद्याद्वारे मनाई करण्यात आली नसेल त्या व्यक्तीला या कलमाखालील लायसनशिवाय, पण विहित करण्यात येतील अशा शर्तीनुसार, केवळ खेळांच्या प्रयोजनांसाठी-अन्य प्रयोजनासाठी नव्हे – वाजवी परिमाणात शस्त्रे व दारूगोळा आपल्याबरोबर भारतात आणता येईल.
स्पष्टीकरण :
या परंतुकाच्या खंड (ख) च्या प्रयोजनार्थ, पर्यटक या शब्दाचा अर्थ, भारताचा नागरिक नसलेली जी व्यक्ती मनोरंजन, स्थळदर्शन किंवा केंद्र शासनाने आमंत्रित केलेल्या बैठकीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय परिषदा, संघ किंवा इतर निकाय यामध्ये प्रतिनिधी या नात्याने भाग घेणे याव्यतिरिक्त अन्य कोणताही उद्देश नसताना, सहा महिन्यांहून अधिक नाही इतक्या कालावधीकरिता भारतास भेट देते ती व्यक्ती असा ओ.
२) पोटकलम (१) च्या परंतुकामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, आपणास त्या परंतुकाचा खंड (क)किंवा ख) लागू होतो असा दावा सांगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस असा खंड लागू होतो किंवा कसे याबाबत अथवा अशा खंडात उल्लेख केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातील शस्त्रे किंवा दारूगोळा यांचे परिमाण वाजवी आहे किंवा कसे याबाबत अथवा अशी व्यक्ती अशी शस्त्रे व दारूगोळा यांचा ज्यासाठी उपयोग करते त्या उपयोगाबाबत १.(सीमाशुल्क आयुक्तास) किंवा केंद्र शासनाने अधिकारी प्रदान केलेल्या अन्य कोणत्याही अधिकाऱ्यास कसलीही शंका असल्यास, त्याला अशा व्यक्तीच्या कब्जातील शस्त्रे दारूगोळा त्यासंबंधात त्यास केंद्र शासनाकडून आदेश मिळेपर्यंत अडकवून ठेवता येईल.
३) भारताच्या एका भागाकडून समुद्रमार्गे किंवा हवाईमार्गे किंवा भारताचा भाग नसलेल्या कोणत्याही मध्यगत क्षेत्रातून दुसऱ्या भागाकडे नेलेली शस्त्रे व दारूगोळा, या अधिनियमाच्या अर्थानुसार भारताबाहेर नेली व भारतात आणली असे होते.
——–
१. १९९५ चा अधिनियम २२ याच्या कलम ८९ द्वारा सीमाशुल्क समाहारकास याऐवजी (१-४-१९९५ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply