भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ५९ :
राष्ट्रपतिपदाच्या शर्ती :
(१) राष्ट्रपती, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून आला तर, तो, राष्ट्रपती म्हणून आपले पद ग्रहण करील त्या दिनांकास त्याने त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल.
(२) राष्ट्रपती, अन्य कोणतेही लाभपद धारण करणार नाही.
(३) राष्ट्रपती, आपल्या अधिकृत निवासस्थानाचा, निवासशुल्क न देता वापर करण्यास हक्कदार असेल आणि संसद कायद्याद्वारे ठरवील अशा वित्तलब्धी, भत्ते व विशेषाधिकार यांचाही हक्कदार असेल आणि त्यासंबंधात याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत दुसऱ्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या अशा वित्तलब्धी, भत्ते व विशेषाधिकार यांना तो हक्कदार असेल.
(४) राष्ट्रपतीची वित्तलब्धी आणि भत्ते त्याच्या पदावधीत कमी केले जाणार नाहीत.