Constitution अनुच्छेद १३ : मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १३ :
मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे :
(१) या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे, ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील तेथवर, ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत असतील.
(२) राज्य, या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणारा किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही आणि या खंडाचे उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा त्या उल्लंघनाच्या व्याप्तीपुरता शून्यवत असेल.
(३) या अनुच्छेदात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर,—-
(क) कायदा यात, भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्याइतकाच प्रभावी असलेला कोणताही अध्यादेश, आदेश, उपविधी, नियम, विनियम, अधिसूचना, रूढी किंवा परिपाठ यांचा समावेश आहे ;
(ख) अंमलात असलेले कायदे यात, भारताच्या राज्यक्षेत्रातील विधानमंडळाने किंवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेल्या किंवा केलेल्या व पूर्वी निरसित न झालेल्या कायद्याचा समावेश आहे—-मग असा कोणताही कायदा किंवा त्याचा कोणताही भाग त्यावेळी मुळीच किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये अंमलात नसला तरी हरकत नाही.
१.((४) या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट अनुच्छेद ३६८ अन्वये केलेल्या संविधानाच्या कोणत्याही सुधारणेस लागू असणार नाही.)
———
१. संविधान (चोविसावी सुधारणा) अधिनियम, १९७१ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केले.

Leave a Reply