Bsa कलम १०८ : आरोपीचा खटला अपवादांमध्ये पडतो हे त्याने दाखविणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १०८ :
आरोपीचा खटला अपवादांमध्ये पडतो हे त्याने दाखविणे :
जेव्हा एखाद्या व्यक्तीवर कोणत्याही अपराधाचा आरोप असेल तेव्हा, ज्यामुळे तो खटला भारतीय न्याय संहिता २०२३ यातील सर्वसाधारण अपवादांपैकी कोणत्याही अपवादाच्या अंतर्गत अथवा त्याच संहितेच्या अन्य कोणत्याही भागात किंवा अपराधाची व्याख्या करणाऱ्या कोणत्याही कायद्यात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही विशेष अपवादाच्या किंवा परंतुकाच्या अंतर्गत येतो त्या परिस्थितीचे अस्तित्व शाबीत करण्याची जबाबदारी तिच्यावर असते व न्यायलय अशा परिस्थितीचा अभाव असल्याचे गृहीत धरील.
उदाहरणे :
(a) क) (ऐ) वर खुनाचा आरोप असून मनोविकलतेमुळे आपल्याला त्या कृतीचे स्वरुप समजले नाही असे तो अभिकथन करतो. शाबितीची जबाबदारी (ऐ) वर आहे.
(b) ख) (ऐ) वर खुनाचा दोषारोप असून गंभीर व आकस्मिक प्रक्षोभनकारणामुळे आपला संयम सुटला असे तो अभिकथन करतो. शाबितीची जबाबदारी (ऐ) वर आहे.
(c) ग) भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२२ च्या पोटकलम (२) द्वारा उपबंधित केलेले प्रकरण खेरीजकरुन जो कोणी इच्छापूर्वक जबर दुखापत करील तो विवक्षित शिक्षांना पात्र होईल असे कलम ११७ मध्ये उपबंधित केले आहे. इच्छापूर्वक जबर दुखापत केल्याबद्दल (ऐ) वर कलम ११७ खाली दोषारोप ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे ते प्रकरण कलम १२२ च्या पोटकलम (२) खाली येते ती परिस्थिती शाबीत करण्याची जबाबदारी (ऐ) वर आहे.

Leave a Reply