भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ५५ :
तोंडी पुरावा प्रत्यक्ष असावा :
कोणत्याही कामात तोंडी पुरावा प्रत्यक्ष असेल, म्हणजे –
एक) जे पाहता येणे शक्य असते अशा तथ्याचा त्यामध्ये निर्देश असतो तेव्हा, तो पुरावा म्हणजे आपण ते पाहिले अशी साक्षीदाराने दिलेली साक्ष असेल;
दोन) जे ऐकणे शक्य असते अशा तथ्याच्या त्यामध्ये निर्देश असतो तेव्हा, तो पुरावा म्हणजे आपण ते ऐकले अशी साक्षीदाराने दिलेली साक्ष असेल;
तीन) अन्य कोणत्याही इंद्रियाने किंवा अन्य कोणत्याही रीतीने ज्याचे ज्ञान होऊ शकते अशा तथ्याचा त्यात निर्देश असतो तेव्हा, तो पुरावा म्हणजे त्या इंद्रियाद्वारे किंवा त्या रीतीने त्याचे ज्ञान स्वत:ला झाले अशी साक्षीदाराने दिलेली साक्ष असेल;
चार) एखाद्या मताचा किंवा ज्यांवर ते मत आधारलेले आहे त्या कारणांचा त्यात निर्देश असतो तेव्हा तो पुरावा म्हणजे त्या कारणावर आपले मत आधारलेले आहे अशी त्या साक्षीदाराने दिलेली साक्ष असेल :
परंतु, सामान्यत: विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या कोणत्याही विवेचक ग्रंथात व्यक्त करण्यात आली असतील ती मते आणि ज्यांच्या आधारावर अशी मते बनवण्यात आली ती कारणे, लेखक मृत असल्यास किंवा त्याचा शोध लागत नसल्यास, किंवा तो साक्ष देण्यास असमर्थ असल्यास, किंवा न्यायालयाला गैरवाजवी वाटतो इतका विलंब किंवा खर्च झाल्याशिवाय त्याला साक्षीदार म्हणून बोलावणे शक्य नसल्यास असे विवेचक ग्रंथ हजर करून शाबीत करता येतील :
परंतु आणखी असे की, तोंडी पुराव्यात दस्तऐवजाहून अन्य कोणत्याही मूर्त वस्तूच्या अस्तित्वाचा किंवा स्थितीचा निर्देश असेल तर, न्यायालय त्याला योग्य वाटल्यास, अशी मूर्त वस्तू आपल्या निरीक्षणासाठी हजर करण्यास फर्मावू शकेल.