Bsa कलम १२ : मानसिक किवा शारीरिक अवस्था अथवा शारीरिक संवेदना यांचे अस्तित्व दर्शविणारी तथ्ये:

भारतीय पुरावा अधिनियम २०२३
कलम १२ :
मानसिक किवा शारीरिक अवस्था अथवा शारीरिक संवेदना यांचे अस्तित्व दर्शविणारी तथ्ये:
उद्देश, ज्ञान, सद्भाव, हयगय, बेदरकारपणा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीबाबतची दुर्भावना किंवा सद्भावना यांसारख्या कोणत्याही मानसिक अवस्थेचे अस्तित्व दर्शवणारी अथवा कोणत्याही शारीरिक अवस्थेचे किंवा शारीरिक संवेदनेचे अस्तित्व दर्शवणारी तथ्ये ही, अशी कोणताही शारीरिक किंवा मानसिक अवस्था अथवा शारीरिक संवेदना यांचे अस्तित्व वादनिविष्ट किंवा संबद्ध असेल तेव्हा संबद्ध असतात.
स्पष्टीकरण १ :
मानसिक अवस्था हे तथ्य संबद्ध असताना, ती मानसिक अवस्था अस्तित्वात आहे ही गोष्ट तिच्या अस्तित्वाचे दर्शक म्हणून संबद्ध असलेल्या तथ्याद्वारे, सर्वसाधारणपणे नव्हे तर, विशिष्ट प्रस्तुत बाबीच्या संदर्भात दर्शवली गेली पाहिजे.
स्पष्टीकरण २ :
पण जेथे एखाद्या अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तिच्या संपरीक्षेच्या वेळी आरोपीने पूर्वी केलेला अपराध या कलमाच्या अर्थानुसार संबद्ध होत असेल तेथे, अशा व्यक्तिची पूर्वीची दोषसिद्धी हे सुद्धा संबद्ध तथ्य असेल.
उदाहरणे :
(a) क) एखादा माल हा चोरीचा माल असल्याचे माहीत असूनही तो स्वीकारला असा आरोप (ऐ) वर आहे. चोरीचा विशिष्ट माल त्याच्या कब्जात होता असे शाबीत झाले आहे. त्याचवेळेस दुसऱ्या अनेक चोरीच्या वस्तू त्याच्या कब्जात होत्या हे तथ्य, त्याच्या कब्जात असलेल्या एकूण एक वस्तू चोरीच्या असल्याचे त्याला माहीत होते हे दाखवण्याच्या दृष्टीने साधक होत असल्यामुळे ते संबद्ध आहे.
(b) ख) (ऐ) ने दुसऱ्या व्यक्तीला कपटीपणाने नकली चलन सुपूर्द केले व त्याने ते सुपूर्द केले तेव्हा त्याला ते नकली असल्याचे माहीत होते असा त्याच्यावर आरोप आहे. ते सुपूर्द करण्याच्या वेळेस (ऐ) च्या कब्जात इतर अनेक नकली चलन होते हे तथ्य संबद्ध आहे. एक नकली चलन, ते नकली असल्याचे माहीत असताना दुसऱ्या व्यक्तीला खरे म्हणून सुपूर्द केल्याबद्दल (ऐ) ला पूर्वी दोषी ठरवण्यात आले होते हे तथ्य संबद्ध आहे.
(c) ग) (बी) च्या कुत्र्याने इजा केल्याबद्दल (ऐ) हा (बी) विरुद्ध दावा लावतो. आपला कुत्रा हिंस्त्र आहे हे (बी) ला माहीत आहे. (एक्स), (वाय) व (झेड) यांना तो कुत्रा पूर्वी चावला होता व त्यांनी (बी) कडे तक्रारी केल्या होत्या, ही तथ्ये संबद्ध आहेत.
(d) घ) विनिमयपत्राचा स्वीकर्ता (ऐ) याला आदात्याचे नाव कपोलकल्पित आहे हे माहीत होते किंवा काय हा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने काढलेली इतर विपत्रे, जर प्रदेयी ही खरीखुरी व्यक्ती असती तर ती (ऐ) कडे ज्यावेळेस विपत्रे पाठवू शकली असती त्यापूर्वी (ऐ) ने ती स्वीकारली होती हे तथ्य, प्रदेयी ही कपोलकल्पित व्यक्ती असल्याचे (ऐ) ला माहीत होते याचे दर्शक म्हणून संबद्ध आहे.
(e) ङ) (बी) च्या लौकिकाला बाध आणण्याच्या उद्देशाने एक अभ्यारोप प्रकाशित करुन (बी) ची अब्रुनुकसानी केल्याचा (ऐ) वर आरोप आहे. (बी) बद्दल (ऐ) च्या मनात असलेली दुर्भावना दर्शवणारे (बी) विषयीचे काही लिखाण (ऐ) ने प्रकाशित केले हे विशिष्ट प्रस्तुत तथ्य प्रकाशनाद्वारे (बी) च्या लौकिकाला बाध आणण्याचा (ऐ) चा उद्देश शाबीत करणारे म्हणून संबद्ध आहे. (ऐ) व (बी) यांच्यामध्ये आधी कसलेही भांडण नव्हते व ज्याबद्दल् तक्रार करण्यात आली ती गोष्ट (ऐ) ने जशी ऐकली तसाच तिचा पुनरुच्चार केला, ही तथ्ये (बी) च्या लौकिकास बाध आणण्याचा (ऐ) चा उद्देश नव्हता याचे दर्शक म्हणून संबद्ध आहेत.
(f) च) (सी) हा ऐपतदार आहे असे (बी) ला कपटीपणाने अभिवेदन केल्यामुळे दिवाळखोर (सी) वर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त झालेल्या (बी) ला नुकसान सोसावे लागले, म्हणून (बी) ने क विरुद्ध दावा लावला. (सी) ऐपतदार असल्याचे (ऐ) ने अभिवेदन केले त्यावेळेस (सी) चे शेजारी व त्याच्याशी व्यवहार करणाऱ्या व्यक्ती त्याला ऐपतदार समजत होत्या हे तथ्य, (ऐ) ने ते अभिवेदन सद्भावपूर्वक केले असल्याचे दर्शक म्हणून संबद्ध् आहे.
(g) छ) (ऐ) ज्या घराचा मालक आहे त्याचे काम (सी) या कंत्राटदाराच्या आदेशावरुन केल्याबद्दल मिळावयाच्या पैशासाठी (बी) हा (ऐ) विरुद्ध दावा लावतो. (बी) ने (सी) बरोबर संविदा केली होती हा (ऐ) चा बचाव आहे. (ऐ) ने (सी) ला प्रस्तुत कामाचे पैसे दिले होते हे तथ्य, (ऐ) ने प्रस्तुत कामाची व्यवस्था सद्भावपूर्वक (सी) कडे सोेपवली होती व त्यामुळे (सी) हा क चा अभिकर्ता म्हणून नव्हे तर स्वत:च्याच नावाने (बी) शी संविदा करु शकत होता हे शाबीत करणारे म्हणून संबद्ध आहे.
(h) ज) (ऐ) ला जी मालमत्ता सापडली तिचा अप्रामाणिक हेतूने अपहार केल्याचा (ऐ) वर आरोप आहे व जेव्हा त्याने तिचा स्वत:साठी म्हणून विनियोग केला तेव्हा, तिचा खरा मालक सापडू शकणार नाही असे तो सद्भावपूर्वक समजत होता किंवा काय असा प्रश्न आहे. (ऐ) ज्या ठिकाणी होता तेथे मालमत्ता हरवल्याची जाहीर नोटीस देण्यात आलेली होती हे तथ्य, मालमत्तेचा खरा मालक सापडू शकणार नाही असे (ऐ) सद्भावपूर्वक समजत नव्हता याचे दर्शक म्हणून संबद्ध आहे. मालमत्ता हरवल्याचे (सी) ने ऐकले होते व त्याविरुद्ध तिच्यावर खोटा दावा सांगण्याची त्याची इच्छा होती म्हणून त्याने कपटीपणाने नोटीस दिली होती हे (ऐ) ला माहीत होते किंवा तसा त्याचा समज होता हे तथ्य, (ऐ) ला नोटीस माहीत होती एवढ्याच तथ्यामुळे (ऐ) चा सद्भाव नाशाबीत होत नाही याचे दर्शक म्हणून संबद्ध आहे.
(i) झ) (बी) ला ठार मारण्याच्या इराद्याने त्याच्यावर गोळी झाडल्याचा (ऐ) वर आरोप आहे. (ऐ) चा इरादा दर्शवण्यासाठी, (ऐ) ने पूर्वी (बी) वर गोळी झाडली होती हे तथ्य शाबीत करता येईल.
(j) ञ) (बी) ला धमकीची पत्रे पाठवल्याचा (ऐ) वर आरोप आहे. या पत्रांचा उद्देश दर्शवण्यासाठी (ऐ) ने (बी) ला पूर्वी पाठवलेली धमकीची पत्रे शाबीत करता येतील.
(k) ट) (ऐ) हा आपली पत्नी (बी) हिच्याशी क्रूरपणे वागल्याबद्दल दोषी आहे किंवा हा प्रश्न आहे. अभिकथित क्रूर वागणूकीच्या जरा आधी किंवा नंतर त्यांनी एकमेकांविषयी कोणत्या भावना व्यक्त केल्या ती संबद्ध तथ्ये आहेत.
(l) ठ) (ऐ) चा मृत्यू विषाने घडून आला होता किंवा काय हा प्रश्न आहे. (ऐ) ने आजारात आपल्या लक्षणांबाबत केलेली कथने ही संबद्ध तथ्ये आहेत.
(m) ड) जेव्हा (ऐ) चा आयुर्विमा उतरवला गेला तेव्हा, त्याचे प्रकृतिमान कसे होते हा प्रश्न आहे. प्रस्तुत वेळी किंवा त्यापूर्वी (ऐ) ने आपल्या प्रकृतिमानाबाबत केलेली कथने ही संबद्ध तथ्ये आहेत.
(n) ढ) (बी) ने सर्वसाधारणपणे वापरण्यालायक नसलेली गाडी भाड्याने दिल्यामुळे (ऐ) ला दुखापत झाली, म्हणून (ऐ) हा (बी) विरुद्ध हयगयीबद्दल दावा लावतो. त्या विशिष्ट गाडीच्या या दोषाकडे अन्य प्रसंगी (बी) चे लक्ष वेधण्यात आले होते हे तथ्य संबद्ध आहे. भाड्याने द्यावयाच्या गाड्यांबांबत नेहमीच (बी) हयगय करीत असे हे तथ्य असंबद्ध आहे.
(o) ण) (बी) वर उद्देशपूर्वक गोळी झाडून त्याला मारले म्हणून (बी) च्या खुनाबद्दल (ऐ) ची संपरीक्षा करण्यात आली, (ऐ) ने अन्य प्रसंगी (बी) वर गोळी झाडली होती हे तथ्य, (बी) ला गोळी झाडून मारण्याचा त्याचा उद्देश दर्शवणारे म्हणून संबद्ध आहे. माणसांना मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर गोळी झाडण्याची (ऐ) ला सवय होती, हे तथ्य असंबद्ध आहे.
(p) त) एका गुन्ह्याबद्दल (ऐ) ची संपरीक्षा करण्यात आली. तो विशिष्ट गुन्हा करण्याचा उद्देश सूचित करणारे काहीतरी त्याने म्हटले हे तथ्य संबद्ध आहे. त्या प्रकारचे गुन्हे करण्याकडे सर्वसाधारण कल दर्शविणारे काहीतरी त्याने म्हटले हे तथ्य असंबद्ध आहे.

Leave a Reply