Bsa कलम ७ : वादनिविष्ठ तथ्य किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्यांचा खुलासा किंवा ती प्रस्तुत करण्यासाठी जरूर असलेली तथ्ये :

भारतीय पुरावा अधिनियम २०२३
कलम ७ :
वादनिविष्ठ तथ्य किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्यांचा खुलासा किंवा ती प्रस्तुत करण्यासाठी जरूर असलेली तथ्ये :
एखाद्या वादनिविष्ट तथ्याचा किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्याचा खुलासा किंवा ते प्रस्तुत करण्यासाठी जरूर असलेली अशी अथवा वादनिविष्ट तथ्याने किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्याने सूचित केलेल्या अनुमानास जी तथ्ये पुष्टी देतात किंवा त्याचे खंडन करतात किंवा जिची ओळख पटणे संबद्ध (सुसंगत) आहे अशा कोणत्याही वस्तूची किंवा व्यक्तीची ओळख पटवतात अथवा वादनिविष्ट तथ्य किंवा संबद्ध (सुसंगत) तथ्य केव्हा व कोठे घडले ती वेळ व स्थळ ज्यांमुळे निश्चित होते अथवा ज्यांनी असे कोणतेही तथ्य घडवून आणले त्या पक्षांमधील संबंध ज्यांमुळे दर्शवला जातो अशी तथ्ये त्या प्रयोजनाकरिता आवश्यक असतील तेथवर संबद्ध (सुसंगत)असतात.
उदाहरणे :
(a) क) विवक्षित दस्तऐवज हा (ऐ) चे मृत्युपत्र आहे किंवा काय हा प्रश्न आहे. अभिकथित मृत्युपत्राच्या दिनांकास असलेली (ऐ) च्या मालमत्तेची व त्याच्या कुटुंबाची स्थिती ही संबद्ध तथ्ये असू शकतील.
(b) ख) (ऐ) वर लांच्छनास्पद वर्तनाचा आरोप करणाऱ्या बदनामीकारक मजकुराबद्दल (ऐ) हा (बी) विरुद्ध दावा लावतो, बदनामीकारक असल्याचे अभिकथित केलेला मजकूर खरा आहे असे ख दृढकथन करतो. बदनामीकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला त्यावेळचे पक्षकारांचे स्थान व त्यांच्यामधील संबंध ही वादनिविष्ट तथ्यांना प्रास्ताविक म्हणून संबद्ध असू शकतील. (ऐ) व (बी) यांच्यामध्ये तंटा होतो व त्यामुळे त्यांच्यामधील संबंधावर परिणाम झाला असेल तेव्हा, ते तथ्य संबद्ध असले तरी, बदनामीकारक मजकुराशी संबंध नसलेल्या बाबीविषयीचा (ऐ) व (बी) यांच्यामधील तंट्याचा तपशील असंबद्ध आहे.
(c) ग) (ऐ) वर गुन्ह्याचा आरोप आहे. गुन्हा घडल्यानंतर लवकरच (ऐ) आपल्या घरातून परागंदा झाला हे तथ्य वादतथ्यांच्या नंतरचे किंवा त्यांच्यामुळे परिणाम झालेले वर्तन म्हणून कलम ६ खाली संबद्ध आहे. जेव्हा त्याने घर सोडले तेव्हा, ज्या स्थळी तो गेला तेथे त्याला आकस्मिक व तातडीचे काम होते हे तथ्य, (ऐ) ने आकस्मिकपणे घर सोडले या तथ्याचा खुलासा करु शकणारे म्हणून संबद्ध आहे. तो ज्या कामगिरीवर निघाला तिचा तपशील, ते काम आकस्मिक व तातडीचे होते हे दर्शवण्यापुरता आवश्यक असेल तेवढे खेरीजकरुन एरव्ही संबद्ध नाही.
(d) घ) (सी) ने (ऐ) बरोबर केलेला नोकरीचा करार मोडण्यास त्याला प्रवृत्त केल्याबद्दल (ऐ) हा (बी) विरुद्ध दावा लावतो. (ऐ) ची नोकरी सोडल्यावर (सी) हा (ऐ) ला असे म्हणतो की, (बी) ने मला अधिक चांगली नोकरी देऊ केल्यामुळे मी तुमची नोकरी सोडून देत आहे. हे कथन वादतथ्य म्हणून संबद्ध असलेल्या (सी) च्या वर्तनाचा खुलासा करणारे म्हणून संबद्ध आहे.
(e) ङ) (ऐ) वर चोरीचा आरोप असून तो चोरीचा माल (बी) ला देत असताना नजरेस पडतो व (बी) ती मालमत्ता (ऐ) च्या पत्नीला देत असताना नजरेस पडतो. ती सुपूर्द करताना (बी) म्हणतो, तू ही लपवून ठेवावीस असे (ऐ) चे सांगणे आहे. (बी) चे हे विधान त्या व्यवहाराचा भाग असलेल्या तथ्याचा खुलासा करणारे म्हणून संबद्ध आहे.
(f) च) दंगा केल्याबद्दल (ऐ) ची संपरीक्षा होते व तोे जमावाच्या अग्रभागी चालला होता असे शाबीत होते. जमावाचा आरडाओरडा हे तथ्य त्या व्यवहाराच्या स्वरुपाचा खुलासा करणारे म्हणून संबद्ध आहे.

Leave a Reply