Bsa कलम ६ : हेतू ,पूर्वतयारी आणि पूर्वीचे किंवा नंतरचे वर्तन :

भारतीय पुरावा अधिनियम २०२३
कलम ६ :
हेतू ,पूर्वतयारी आणि पूर्वीचे किंवा नंतरचे वर्तन :
१) जे कोणत्याही वादतथ्याच्या किंवा संबद्ध तथ्याच्या हेतूचे किंवा पूर्वतयारीचे दर्शक किंवा घटक असते असे कोणतेही तथ्य संबद्ध(सुसंगत) असते.
२) कोणत्याही दाव्याच्या किंवा कार्यवाहीच्या संबंधात, अथवा त्यातील एखाद्या वादतथ्याच्या किंवा त्याच्याशी संबद्ध(सुसंगत) अशा तथ्याच्या संबंधात अशा दाव्यातील किंवा कार्यवाहीतील एखाद्या पक्षकाराने अथवा त्याच्या एखाद्या अभिकत्र्याने केलेल्या वर्तनाचा आणि जिच्याबाबत घडलेला एखादा अपराध हा एखाद्या कार्यवाहीचा विषय आहे अशा कोणत्याही व्यक्तीच्या वर्तनाचा एखाद्या तथ्यावर प्रभाव पडत असेल अथवा एखाद्या तथ्याचा अशा वर्तनावर प्रभाव पडत असेल तर, ते वर्तन संबद्ध(सुसंगत) असते – मग असा प्रभाव पूर्वी पडलेला असो वा नंतर पडलेला असो.
स्पष्टीकरण १ :
वर्तन या शब्दात कथनांचा समावेश होत नाही, मात्र ती कथने ही जर त्या कथनांहून अन्य अशा कृती करत असताना केलेली असतील व त्या कृतींचा खुलासा करणारी असतील व त्या कृतींचा खुलासा करणारी असतील तर गोष्ट वेगळी; पण या खुलाशामुळे या अधिनियमाच्या अन्य कोणत्याही कलमाखालील कथनांच्या संबद्धतेवर(सुसंगतेवर) परिणाम होणार नाही.
स्पष्टीकरण २ :
जेव्हा कोणत्याही व्यक्तीचे वर्तन हे संबद्ध(सुसंगत) तथ्य असते तेव्हा तिच्याकडे केलेले किंवा तिच्या समत्र व तिला ऐकू येईल अशा तऱ्हेने केलेले जे कोणतेही कथन अशा वर्तनावर परिणाम करते ते संबद्ध(सुसंगत) तथ्य असते.
उदाहरणे :
(a) क) (बी) चा खून करण्याबद्दल (ऐ) ची संपरीक्षा करण्यात येत आहे. (ऐ) ने (सी) चा खून केला, (ऐ) ने (सी) चा खून केला हे (बी) ला माहीत होते व आपल्याला असेलेली माहिती जाहीर करण्याची धमकी देऊन (बी) ने (ऐ) कडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता, ही तथ्ये संबद्ध आहेत.
(b) ख) पैसे भरण्याबाबतच्या बंधपत्रावरुन (ऐ) हा (बी) च्या विरुद्ध दावा लावतो. (बी) बंधपत्र केल्याचे नाकारतो. बंधपत्र ज्यावेळी केले असल्याचे अभिकथन करण्यात आले आहे त्यावेळी (बी) ला विशिष्ट प्रयोजनासाठी पैशांची जरुरी होती हे तथ्य संबद्ध आहे.
(c) ग) (बी) वर विषप्रयोग करुन त्याचा खून करण्याबद्दल (ऐ) ची संपरीक्षा करण्यात येत आहे. (बी) ला देण्यात आले होते तशाच प्रकारचे विष (बी) च्या मृत्युपूर्वी (ऐ) ने पैदा केले होते हे तथ्य संबद्ध आहे.
(d) घ) विवक्षित दस्तऐवज हा (ऐ) चे मृत्युपत्र आहे किंवा काय हा प्रश्न आहे. अभिकथित मृत्युपत्राच्या तरतुदी ज्या बाबींशी संबधित आहेत त्याबाबत (ऐ) ने अभिकथित मृत्युपत्राच्या दिनांकापूर्वी नुकतीच चौकशी केली होती, मृत्युपत्र करण्याच्या बाबतीत त्याने वकिलांचा सल्ला घेतला होता व अन्य मृत्युपत्रांचे मसुदे त्याने तयार करवून घेतले होते, पण त्याला ते पसंत पडले नव्हते, ही तथ्ये संबद्ध आहेत.
(e) ङ) (ऐ) वर एका गुन्ह्याचा आरोप आहे. अभिकथित गुन्हा घडण्यापूर्वी किंवां त्यावेळी किंवा त्यानंतर (ऐ) ने प्रकरणाच्या तथ्यांना त्याला स्वत:ला अनुकूल असे स्वरुप देण्याच्या दृष्टीने पुरावा आणण्याची तजवीज केली होती अथवा त्याने पुरावा नष्ट केला होता किंवा लपवला होता अथवा ज्या व्यक्ती साक्षीदार झाल्या असत्या त्यांच्या उपस्थितीस प्रतिबंध केला होता किंवा त्या अनुपस्थित राहतील अशी तजवीज केली होती किंवा त्याबाबत खोटा पुरावा देण्यास व्यक्तींना फितवले होते, ही तथ्ये संबद्ध आहेत.
(f) च) (ऐ) ने (बी) ची जबरी चोरी केली किंवा काय हा प्रश्न आहे. (बी) ची जबरी चोरी झाल्यानंतर, ज्याने (बी) ची जबरी चोरी केली त्याचा शोध घेण्यास पोलीस येत आहेत असे (सी) ने (ऐ) च्या समक्ष म्हटले व त्यानंतर तत्काळ (ऐ) पळून गेला, ही तथ्ये संबद्ध आहेत.
(g) छ) (ऐ) हा (बी) चे १०००० रुपये देणे लागतो किंवा काय हा प्रश्न आंहे. (ऐ) ने (सी) कडे उसने पैसे मागितले व (डी) ने (ऐ) च्या समक्ष व त्याला ऐकू येईल अशा तऱ्हेने (सी) ला सांगितले की, (ऐ) वर विश्वास न ठेवण्याचा मी सल्ला देतो, कारण तो (बी) चे १०००० रु देणे लागतो आणि (ऐ) काही उत्तर न देता निघून गेला, ही संबद्ध तथ्ये आहेत.
(h) ज) (ऐ) ने गुन्हा केला किंवा काय हा प्रश्न आहे. गुन्हेगारासंबंधी चौकशी होत आहे असा (ऐ) ला इशारा देणारे पत्र मिळाल्यावर तो फरारी झाला हे तथ्य व पत्राचा मजकूर ही संबद्ध तथ्ये आहेत.
(i) झ) (ऐ) वर गुन्ह्याचा आरोप आहे. अभिकथित गुन्हा घडल्यानंतर तो फरारी झाला अथवा गुन्ह्यामुळे मिळालेली मालमत्ता किंवा त्या मालमत्तेपासून येणारे उत्पन्न त्याच्या कब्जात होते अथवा गुन्हा करण्याच्या कामी वापरण्यात आल्या असतील किंवा वापरता आल्या असत्या त्या वस्तू त्याने लपवल्या, ही संबद्ध आहते.
(j) ञ) (ऐ) शी जबरी बलात्कार करण्यात आला होता किंवा काय हा प्रश्न आहे. अभिकथित बलात्कारानंतर थोड्याच वेळात तिने गुन्ह्यासंबंधी फिर्याद दिली, फिर्याद कोणत्या परिस्थितीत व कोणत्या शब्दात देण्यात आली, ही तथ्ये संबद्ध आहेत. आपणांशी जबरी बलात्कार करण्यात आला असे ती फिर्याद न देता म्हणाली हे तथ्य जरी कलम २६ च्या खंड (a)(क) खाली मृत्युकालीन अधिकथन म्हणून किंवा कलम १६० खाली परिपोषक पुराीवा म्हणून संबद्ध असले तरी, या कलमाखाली वर्तन म्हणून संबद्ध नाही.
(k) ट) (ऐ) ची जबरी चोरी झाली किंवा काय हा प्रश्न आहे. अभिकथित जबरी चोरी झाल्यानंतर थोड्याच वेळात त्याने अपराधासंबंधी फिर्याद दिली, फिर्याद कोणत्या परिस्थितीत व कोणत्या शब्दांत देण्यात आली, ही तथ्ये संबद्ध आहेत. आपली जबरी चोरी करण्यात आली असे तो कोणतीही फिर्याद न देता म्हणाला हे तथ्य जरी कलम २६ च्या खंड (a)(क) खाली मृत्युकालीन अधिकथन म्हणून किंवा कलम १६० खाली परिपोषक पुरावा म्हणून संबद्ध असले तरी, या कलमाखाली वर्तन म्हणून संबद्ध नाही.

Leave a Reply