भारतीय पुरावा अधिनियम २०२३
कलम २ :
व्याख्या :
१) या अधिनियमात, संदर्भावरून विरूद्ध उद्देश दिसून येत नसेल तेथे, –
(a) क) न्यायालय यामध्ये सर्व न्यायाधीश व दंडाधिकारी यांचा आणि लवाद (मध्यस्थ) खेरीजकरून, पुरावा घेण्यास विधिद्वारे प्राधिकृत असलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश आहे;
(b) ख) निर्णायक पुरावा, जेव्हा या अधिनियमाद्वारे एखादे तथ्य हे दुसऱ्या एखाद्या तथ्याचा निर्णायक पुरावा असल्याचे ठरवण्यात आले असेल तेव्हा, न्यायालय पहिला तथ्याच्या शाबितीवरून दुसरे तथ्य शाबीत झाल्याचे मानील व ते नाशाबीत करण्यासाठी पुरावा देण्यास मुभा देणार नाही;
(c) ग) तथ्याच्या संबंधात नाशाबीत जेव्हा आपणापुढील बाबींचा विचार केल्यानंतर, एखादे तथ्य अस्तित्वात नाही असा न्यायालयाला समज होतो किंवा व्यवहारदृष्टी असलेल्या माणसाने ते अस्तित्वात नाही अशा समजुतीने त्या विशिष्ट प्रकरणाच्या परिस्थितीत वागायला हवे इतके त्याचे नास्तित्व न्यायालयाला संभवनीय वाटते तेव्हा, ते नाशाबीत झाले असे म्हटले जाते;
(d) घ) दस्तऐवज याचा अर्थ, कोणताही मजकूर नमूद करण्यासाठी अक्षरे, आकडे / आकृत्या किंवा चिन्हे अशी जी साधने वापरण्याचे उद्देशित असेल किंवा वापरता येतील त्या साधनांनी किंवा त्यापैकी एकाहून अधिक साधनांनी कोणत्याही पदार्थावर लिहिलेला किंवा व्यक्त केलेला किंवा रेकॉर्ड केलेला मजकूर असा आहे आणि यामध्ये इलैक्ट्रॉनिक व डिजिटल रेकॉर्डचा समावेश आहे;
उदाहरणे :
एक) एखादे लिखाण हा दस्तऐवज आहे;
दो) मुद्रित, शिळामुद्रित (कोरिव) किंवा छायाचित्रित केलेले शब्द हे दस्तऐवज आहेत;
तीन) एखादा नकाशा किंवा आराखडा हा दस्तऐवज आहे;
चार) धातूच्या पत्र्यावरील किंवा दगडावरील कोरीव लेख हा दस्तऐवज आहे;
पाच) एखादे विडंबनचित्र हा दस्तऐवज आहे;
सहा) ई-मेल, सव्र्हर लॉग, संगणक, लॅपटॉप किंवा स्मार्ट फोन, संदेश, वेबसाइट, स्थान पुरावा आणि डिजिटल उपकरणांवर संग्रहित व्हॉईस मेल संदेशांमधील इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हे दस्तऐवज आहेत;
(e) ङ) पुरावा यात पुढील गोष्टी अभिप्रेत व समाविष्ट आहेत:
एक) चौकशीतील तथ्यविषयक बाबींसंबंधी आपणासमोर जी कथने किंवा इलैक्ट्रॉनिक माध्यमातून दिलेली कथने करण्यास न्यायालय साक्षीदारांना परवानगी देते किंवा आवश्यक करते ती सर्व कथने; आणि अशा कथनांना तोंडी पुरावा / साक्ष असे म्हटले जाते;
दोन) न्यायालयाचे निरीक्षणार्थ हजर केलेले सर्व दस्तऐवज व यात इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेखांचा समावेश होता; आणि अशा दस्तऐवजांना लेखी पुरावा असे म्हटले जाते;
(f) च) तथ्य यात-
एक) इंद्रियगोचनर (इंद्रियांद्वारे बोधगम्य) होणारी कोणतीही वस्तू, परिस्थिती किंवा वस्तूंमधील संबंध;
दोन) कोणत्याही व्यक्तीला जिचे भान होऊ शकते अशी कोणतीही मानसिक अवस्था, अभिप्रेत व समाविष्ट आहे.
उदाहरणे :
एक) विवक्षित पदार्थ विवक्षित जागी विवक्षित क्रमाने मांडलेले आहेत हे तथ्य आहे;
दोन) एखाद्या व्यक्तिने काही ऐकले किंवा पाहिले हे तथ्य आहे;
तीन) एखाद्या व्यक्तिने विवक्षित शब्द म्हटले हे तथ्य आहे;
चार) एखाद्या व्यक्तिला विवक्षित मत आहे, त्याचा विवक्षित उद्देश आहे, तो सद्भावपूर्वक किंवा कपटीपणाने वागतो, किंवा तो विशिष्ट शब्द विशिष्ट अर्थाने वापरतो, किंवा त्याला विशिष्ट वेळी विशिष्ट संवेदनचे भान असते किंवा झाले होते हे तथ्य आहे;
(g) छ) वादतथ्ये या शब्दप्रयोगामध्ये, जे तथ्य निव्वळ तेच तेवढे किंवा इतर तथ्यांच्या जोडीने लक्षात घेतल्यास त्यातून कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत प्रपादिलेला किंवा नाकबूल केलेला हक्क, दायित्व किंवा नि:समर्थता यांचे अस्तित्व, नास्तित्व, स्वरुप किंवा व्याप्ती अपरिहार्यपणे निष्पन्न होते असे कोणतेही तथ्य अभिप्रेत व समाविष्ट आहे;
स्पष्टीकरण :
जेव्हा केव्हा दिवाणी प्रक्रियेच्या संबंधी त्या त्या काळी अमलात असलेल्या कायद्याच्या उपबंधाखाली, कोणतेही न्यायालय तथ्यविषयक वादप्रश्न नमूद करते तेव्हा, अशा वादप्रश्नाच्या उत्तरादाखल जे तथ्य प्रपादन करावयाचे किंवा नाकबूल करावयाचे ते वादतथ्य असते.
उदाहरणे :
(ऐ) वर (बी) च्या खुनाचा आरोप आहे. त्याच्या संपरीक्षेत पुढील वादतथ्ये असतील :-
एक) (ऐ) ने (बी) चा मृत्यु घडवून आणला;
दोन) (बी) चा मृत्यु घडवून आणण्याचा (ऐ) चा उद्देश होता;
तीन) (बी) कडून (ऐ) ला गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारण मिळाले होते;
चार) ज्या कृतीमुळे (बी) चा मृत्यु घडून आला ती करताना (ऐ) हा मनोविकलतेमुळे त्या कृतीचे स्वरुप जाणण्यास असमर्थ होता;
(h) ज) गृहीत धरता येईल – न्यायालयाला एखादे तथ्य गृहीत धरता येईल असे जेव्हा या अधिनियमाद्वारे उपबंधित केलेले असेल तेव्हा, न्यायालय असे तथ्य नाशाबीत झाले नाही तर व तोपर्यंत ते शाबीत असल्याचे मानू शकेल, नाहीतर त्याचा पुरावा मागवू शकेल;
(i) झ) बिनशाबीत – बिनशाबीत (शाबीत झाले नाही) एखादे तथ्य जेव्हा शाबीतही झालेले नसते आणि नाशाबीतही झालेले नसते तेव्हा, ते बिनशाबीत राहिले असे म्हटले जाते;
(j) ञ) शाबीत – शाबीत जेव्हा आपणापुढील बाबींचा विचार केल्यानंतर, एखादे तथ्य अस्तित्वात आहे असा न्यायालयाचा समज होतो किंवा व्यवहारदृष्टी असलेल्या माणसाने ते अस्तित्वात आहे अशा समजुतीने त्या विशिष्ट प्रकरणाच्या परिस्थितीत वागायला हवे इतके त्याचे अस्तित्व न्यायालयाला संभवनीय वाटते तेव्हा, ते शाबीत झाले असे म्हटले जाते;
(k) ट) संबद्ध (सुसंगत) – एखादे तथ्य हे या अधिनियमाच्या उपबंधात निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही एका प्रकारे दुसऱ्या तथ्याशी संबंधित असेल तेव्हा ते त्या दुसऱ्या तथ्याशी संबद्ध आहे असे म्हटले जाते;
(l) ठ) गृहीत धरील – न्यायालयाने एखादे तथ्य गृहीत धरावे असे जेव्हा जेव्हा या अधिनियमाद्वारे निदेशित केलेले असेल तेव्हा, न्यायालय असे तथ्य नाशाबीत झाले नाही तर व तोपर्यंत ते शाबीत असल्याचे मानील.
२) येथे वापरलेले शब्द आणि वाक्प्रचार, जे या अधिनियमात परिभाषित केलेले नाहीत परंतु माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००२ (२००० चा २१), भारतीय न्याय संहिता २०२३ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मध्ये परिभाषित केले आहेत, त्यांचा अनुक्रमे उक्त अधिनियम व संहितेत आहे तसाच अर्थ असेल.