भारतीय दंड संहिता १८६०
कलम २२८-अ :
१.(विवक्षित अपराधांना बळी पडलेली व्यक्ती कोण ते उघड करणे इत्यादी:
(See section 72 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : विवक्षित अपराधांना बळी पडलेली व्यक्ती कोण ते उघड करणे इत्यादी.
शिक्षा :२ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——–
अपराध : न्यायलयाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याचे कामकाजवृत्त छापणे किंवा प्रकाशित करणे.
शिक्षा :२ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी
——-
१) २.(कलम ३७६, ३.(कलम ३७६ अ, कलम ३७६ अब, कलम ३७६ ब, कलम ३७६ क, कलम ३७६ ड, कलम ३७६ डअ, कलम ३७६ डब) किंवा कलम ३७६ ई,) कलमे या खाली ज्या व्यक्तीविरूध्द अपराध घडल्याचे अभिकथन करण्यात आले असेल, किंवा तसे आढळले असेल ती व्यक्ती कोण (या कलमात यापुढे बळी पडलेली व्यक्ती म्हणून निर्दिष्ट (उल्लेख)) हे ज्यावरून ज्ञात (समजून) होईल असे नाम किंवा मजकूर जो कोणी मुद्रित किंवा प्रकाशित करील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
२)बळी पडलेली व्यक्ती कोण हे ज्यावरून ज्ञात (समजू) होऊ शकेल असे नाव किंवा मजकूर यांचे मुद्रण किंवा प्रकाशन हे जर, –
अ)पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याने किंवा अशा अपराधाबाबत अन्वेषण (तपास करणाऱ्या) पोलीस अधिाकाऱ्याने सद्भावपूर्वक अशा अन्वेषणाच्या (तपासाकामी) प्रयोजनार्थ, अथवा त्याच्या लेखी आदेशानुसार केलेले असेल तर, अथवा
ब)बळी पडलेल्या व्यक्तीने किंवा तिच्या लेखी प्राधिकारान्वये (अधिकारान्वये) केलेले असेल तर, अथवा
क)बळी पडलेली व्यक्ती मरण पावली असेल किंवा अज्ञान असेल किंवा मनोविकल असेल त्याबाबतीत बळी पडलेल्या व्यक्तीच्या निकट आप्त संबंधीने अथवा त्याच्या लेखी प्राधिकारान्वये (अधिकारपत्राद्वारे) केले असेल तर,
अशा मुद्रणाला किंवा प्रकाशनाला पोटकलम (१) मधील काहीही लागू होत नाही :
परंतु निकट आप्तसंबंधीने असे अधिकारपत्र कोणत्याही मान्याताप्राप्त कल्याणकारी संस्थेचा किंवा संघटनेचा अध्यक्ष किंवा सचिव, मग त्याचे नामाभिधान काहीही असो याच्याशिवाय अन्य कोणाही व्यक्तीस देता कामा नये.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनार्थ, मान्यताप्राप्त कल्याणकारी संस्था किंवा संघटना म्हणजे केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने याद्वारे मान्यता दिलेली सामाजिक कल्याणकारी संस्था किंवा संघटना होय.
३)जो कोणी पोटकलम (१)मध्ये निर्देशिलेल्या (दर्शविलेल्या) अपराधाच्या संबंधात न्यायालयासमोर चाललेल्या कोणत्याही कार्यवाहीबाबत अशा न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही मजकूर मुद्रित किंवा प्रकाशित करील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाची कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
कोणत्याही उच्च न्यायालयाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचे मुद्रण किंवा प्रकाशन हे या कलमाच्या अर्थानुसार अपराध म्हणून गणले जाणार नाही.
———–
१. फौजदारी विधि (विशोधन) अधिनियम १९८३ (१९८३ चा ४३) – कलम २ द्वारे समाविष्ट केले.
२. फौजदारी (सुधारणा) अधिनियम २०१३ कलम ४ द्वारे सुधारित.
३. फौजदारी (सुधारणा) अधिनियम, २०१८ (क्र.२२ सन २०१८) कलम ३ द्वारे सुधारित.(भारताचे राजपत्र, असाधारण, भाग-२, खंड १, दिनांक ११-८-२०१८ रोजी इंग्रजीत प्रकाशित.