JJ act 2015 कलम ७५ : बालकास क्रुरतेनी वागविण्यासाठी शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ७५ :
बालकास क्रुरतेनी वागविण्यासाठी शिक्षा :
जी कोणी व्यक्ती बालकाचा प्रत्यक्ष ताबा असतांना किंवा बालक त्याच्या नियंत्रणाखाली असताना, बालकावर हल्ला करील, सोडून देईल, गैरकृत्य करील, जाणीवपूर्वक उघड्यावर टाकील, बालकास अनावश्यक शारीरिक किंवा मानसिक कष्ट होतील, अशाप्रकारे दुर्लक्ष करील, त्या व्यक्तीस तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीचा कारावास किंवा एक लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील :
परंतु असे की, जर बालकास त्याच्या जन्मदात्या माता-पित्यांनी त्यांच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे सोडून दिले होते असे उघडकीस आल्यास ते सोडून देणे जाणीवपूर्वक नव्हते असे समजले जाईल व त्यांना शिक्षेची तरतूद लागू होणार नाही :
परंतु आणखी असे की, सदर बालकास सोडून दिले ती व्यक्ती, बालकास संगोपनासाठी आणि संरक्षणासाठी ज्या संघटनेच्या ताब्यात सोपवले होते, अशी संघटना चालविणारी किंवा अशा संघटनेत नोकरी करणारी असल्यास सदर व्यक्तीला पाच वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीचा कारावास आणि पाच लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल :
परंतु आणखी असे की, सदर क्रूर वर्तणुकीमुळे बालकास शारीरिक अपंगत्व आल्यास किंवा मानसिक आजारामुळे दैनंदिन व्यवहार करणे अशक्य झाल्यास किंवा बालकाच्या जीवितास किंवा अवयवास धोका निर्माण झाल्यास सदर व्यक्तीस किमान तीन वर्षे ते दहा वर्षे सश्रम (कठोर) कारावास आणि पाच लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकेल.

Leave a Reply