बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ५९ :
अनाथ, सोडलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकाच्या आंतरराष्ट्रीय दत्तकविधानाची (दत्तक ग्रहणाची) क्रियारीती :
१) बालक दत्तक देण्यास योग्य असल्याचे जाहीर झाल्यानंतर साठ (६०) दिवसांच्या आत जर, विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था आणि राज्य संस्थेच्या संयुक्त प्रयत्नानंतरही भारतीय किंवा अनिवासी भारतीय माता-पित्यांना दत्तक देता न आल्यास, सदर बालक आंतरराष्ट्रीय दत्तकविधानास (दत्तक ग्रहणास) मुक्त होईल :
परंतु असे की, मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेले बालक, भावंडे किंवा पाच वर्षापेक्षा जास्त वयाची मुले यांना प्राधान्याने
दत्तकविधान (दत्तक ग्रहण) नियंत्रण नियमावलीनुसार आंतरराष्ट्रीय दत्तकविधानासाठी (दत्तक ग्रहण) दिले जाईल.
२) भारतीय बालकांच्या आंतरराष्ट्रीय दत्तकविधानासाठी (दत्तक ग्रहणासाठी) , अनिवासी भारतीय किंवा परदेशस्थ भारतीय किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.
३) कोणत्याही धर्माच्या अनिवासी भारतीय किंवा परदेशस्थ भारतीय किंवा भारतीय वंशाच्या प्रस्तावित व्यक्तीस भारतातील अनाथ, सोडून दिलेले किंवा ताब्यात दिलेले बालक दत्तक घेण्याची इच्छा असल्यास ते परदेशी दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था किंवा केंद्रीय अधिकारी किंवा त्यांचे वास्तव्य असलेल्या देशातील संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधून दत्तकविधान (दत्तक ग्रहण) नियंत्रण संस्थेने घालून दिलेल्या नियमानुसार कारवाई करतील.
४) यथास्थिती, अधिकृत परदेशी दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था किंवा केंद्रीय अधिकारी किंवा संबंधित शासकीय संस्था, त्या प्रस्तावित दत्तक माता-पित्यांचा गृह निरीक्षण अहवाल तयार करतील व ते पात्र असल्याचे आढळल्यास, त्यांच्या अर्जाची भारतीय दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्थेकडे नियंत्रण संस्थेने घालून दिलेल्या नियमानुसार दत्तक देण्याबाबत शिफारस करतील.
५) अशा दत्तकास उत्सुक माता-पित्यांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर दत्तक ग्रहण नियंत्रण संस्था सदर अर्जाची तपासणी करतील व सदर अर्ज पात्र असल्याबाबत आढळल्यास सदर अर्ज विशेष दत्तक देण्यास योग्य असलेली बालके ज्यांचेकडे असतात अशा दत्तक ग्रहण नियंत्रण संस्थेकडे पाठवतील.
६) सदर विशेष दत्तक विधान संस्था उत्सुक माता-पित्यांच्या तपशिलाबरोबर योग्य बालकाचा तपशील जुळवून, बालकाचा बालक निरीक्षण अहवाल आणि वैद्यकीय अहवाल बालकासोबत उत्सुक माता-पित्यांकडे पाठवतील, त्यांना मान्य असल्यास ते सदर अहवाल स्वीकृतीसह संस्थेकडे परत पाठवतील.
७) दत्तकास उत्सुक मातापित्यांकडून सदर बालकाची स्वीकृती कळविल्यानंतर सदर विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था १.(जिल्हा दंडाधिकाऱ्या समक्ष) दत्तक आदेशासाठी नियमानुसार अर्ज सादर करतील.
८) २.(जिल्हा दंडाधिकाऱ्याद्वारे पारित दत्तकाबाबत प्रमाणित आदेश) प्राप्त झाल्यावर सदर दत्तक नियंत्रण संस्था सदर आदेश संबंधित अधिकारी, राज्य संस्था आणि उत्सुक माता-पित्यांकडे पाठवतील व बालकासाठी पारपत्र मिळवतील.
९) अधिकारी सदर बालकाच्या दत्तकविधानाबाबत भारताच्या व ज्या देशात बालक जाणार आहे त्या देशाच्या देशांतरण (इमिग्रेशन) अधिकाऱ्यांना कळवतील.
१०) बालकास पारपत्र आणि व्हिसा मिळाल्यावर दत्तकास उत्सुक माता-पिता, विशेष दत्तकविधान संस्थेकडून बालकास व्यक्तिश: ताब्यात घेतील.
११) अधिकृत विदेशी बालक दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था, किंवा केंद्रीय प्राधिकरण किंवा संबंधित शासकीय विभागावर यथास्थिती, दत्तक माता-पित्यांकडील बालकाचा प्रगती अहवाल सादर करण्यास बंधनकारक असेल. जर काही अडचणी निर्माण झाल्यास सदर विदेशी बालक दत्तकविधान संस्था प्राधिकरण आणि संबंधित भारतीय राजनैतिक दूतावासाच्या सल्ल्याने दत्तक नियंत्रण नियमावलीच्या अधीन राहून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी जबाबदार असतील.
१२) परदेशी व्यक्ती किंवा भारतीय वंशाची व्यक्ती किंवा परेदशस्थ भारतीय नागरिक जे वारंवार भारतात वास्तव्यास असतात ते बालक दत्तक घेण्यास उत्सुक असल्यास, त्यासाठी त्यांचे वास्तव्य असलेल्या देशाच्या वकिलातीतून प्राप्त केलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासह दत्तक नियंत्रण संस्थेकडे दत्तम नियंत्रण संस्थेच्या नियमावलीच्या अधीन राहून योग्य त्या कारवाईसाठी अर्ज सादर करु शकतील.
——-
१. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम १९ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.
२. २०२१ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम १९ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.