बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १५ :
निर्घृण अपराधाबाबत मंडळामार्फत प्राथमिक पडताळणी :
१) ज्याने वयाची १६ वर्षे पूर्ण केली आहेत किंवा जो १६ वर्षापेक्षा जास्त वयाचा आहे अशा बालकाने निर्घृण स्वरुपाचा अपराध केल्याचा संशय असल्यास, मंडळ सदर बालकाच्या अशा स्वरुपाचा अपराध करण्याच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेबाबत, त्याच्या कृत्याच्या दुष्परिणामांबाबत त्याला असेलेली जाणीव आणि ज्या परिस्थितीत त्याने सदर अपराध केल्याचा संशय आहे, त्या परिस्थितीबाबत प्राथमिक पडताळणी करेल आणि कलम १८ च्या पोटकलम (३) अन्वये आदेश देऊ शकेल :
परंतु अशा पडताळणीसाठी मंडळ अनुभवी मानसशास्त्रज्ञ किंवा मानसिक सामाजिक कार्यकर्ता किंवा इतर तज्ञांची मदत घेऊ शकेल.
स्पष्टीकरण :
या कलमांसाठी, सदर प्राथमिक चौकशी म्हणजे खटल्याची सुनावणी नाही तर बालकाची असा अपराध करण्याची क्षमता आणि परिणामांची जाणीव याबाबतची प्राथमिक स्वरुपाची चौकशी आहे.
२) प्राथमिक चौकशीमध्ये, सदर प्रकरणाची निर्गती (निपटारा) मंडळाकडूनच केली जावी असे बालमंडळाचे मत झाल्यास मंडळ शक्यतोवर, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील समन्स प्रकरणाच्या (केसच्या) कार्यपद्धती वापरेल :
परंतु सदर प्रकरणाची निर्गती (निपटारा) मंडळामार्फत करण्याच्या निर्णयाविरुद्ध कलम १०१ च्या पोटकलम (२) अन्वये अपील करता येईल :
परंतु आणखी असे की, या कलमाअंतर्गत करावयाची प्राथमिक पडताळणी, कलम १४ मध्ये नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे.