Constitution अनुच्छेद ३३० : लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागा राखून ठेवणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
भाग सोळा :
विवक्षित वर्गांसंबंधी विशेष तरतुदी :
अनुच्छेद ३३० :
लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागा राखून ठेवणे :
१) लोकसभेत,–
(क) अनुसुचित जातींसाठी ;
१.((ख) आसामच्या स्वायत्त जिल्ह्यांमधील अनुसूचित जनजाती खेरीजकरून इतर अनुसूचित जनजातींसाठी ; आणि)
(ग) आसामच्या स्वायत्त जिल्ह्यांमधील अनुसूचित जनजातींसाठी जागा राखून ठेवल्या जातील.
(२) ज्याच्या संबंधात खंड (१) अन्वये अनुसूचित जातींसाठी किंवा अनुसूचित जनजातींसाठी जागा राखून ठेवल्या आहेत असे कोणतेही राज्य २.(किंवा संघराज्यक्षेत्र) यामधील अनुसूचित जातींच्या, किंवा यथास्थिति, असे राज्य २.(किंवा संघराज्यक्षेत्र) अथवा अशा राज्याच्या २.(किंवा संघराज्यक्षेत्राचा) भाग यामधील अनुसूचित जनजातींच्या लोकसंख्येचे त्या राज्याच्या २.(किंवा संघराज्य क्षेत्राच्या) एकूण लोकसंख्येशी जितके प्रमाण असेल, जवळजवळ तितकेच प्रमाण, त्या राज्यात २झ््रकिंवा संघराज्यक्षेत्रातट अशा प्रकारे राखून ठेवलेल्या जागांच्या संख्येचे लोकसभेत त्या राज्यास २झ््रकिंवा संघराज्यक्षेत्रासट नेमून दिलेल्या जागांच्या एकूण संख्येशी असेल.
३.((३) खंड (२) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, आसामच्या स्वायत्त जिल्ह्यांमधील अनुसूचित जनजातींसाठी लोकसभेत राखून ठेवलेल्या जागांच्या संख्येचे, त्या राज्याला नेमून दिलेल्या जागांच्या एकूण संख्येशी असावयाचे प्रमाण हे, कमीत कमी उक्त स्वायत्त जिल्ह्यांमधील अनुसूचित जनजातींच्या लोकसंख्येचे त्या राज्याच्या एकूण लोकसंख्येशी असलेल्या प्रमाणाइतके असेल.)
४.(स्पष्टीकरण :
या अनुच्छेदातील व अनुच्छेद ३३२ मधील लोकसंख्या या शब्दप्रयोगाचा अर्थ, ज्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे, अशा लगतपूर्व जनगणनेमध्ये निश्चित करण्यात आलेली लोकसंख्या, असा आहे :
परंतु असे की, या स्पष्टीकरणातील ज्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे अशी लगतपूर्व जनगणना या निर्देशाचा अन्वयार्थ, सन ५.(२०२६) नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रसिद्ध होईपर्यंत, सन ६.(२००१) च्या जनगणनेचा निर्देश म्हणून लावला जाईल.)
————
१. संविधान (एकावन्नावी सुधारणा) अधिनियम, १९८४ याच्या कलम २ द्वारे उपखंड (ख) ऐवजी दाखल केला. (१६ जून १९८६ रोजी व तेव्हापासून).
२. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे व्याकरणिक फेरफारांसह हा मजकूर समाविष्ट केला.
३. संविधान (एकतिसावी सुधारणा) अधिनियम, १९७३ याच्या कलम ३ द्वारे समाविष्ट केला.
४. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम ४७ द्वारे समाविष्ट केला (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
५. संविधान (चौऱ्यांऐंशीवी सुधारणा) अधिनियम, २००१ याच्या कलम ६ द्वारे २००० याऐवजी दाखल केला.
६. संविधान (सत्त्यांऐंशीवी सुधारणा) अधिनियम, २००३ याच्या कलम ५ द्वारे १९९१ याऐवजी दाखल केला.

Leave a Reply