भारताचे संविधान ( राज्यघटना )
भाग आठ :
१.(संघ राज्यक्षेत्रे) :
अनुच्छेद २३९ :
२.(संघ राज्यक्षेत्रांचे प्रशासन :
(१) संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केली असेल ती खेरीजकरून, राष्ट्रपती, स्वत: विनिर्दिष्ट करील अशा पदनामासह त्याने नियुक्त करावयाच्या प्रशासकामाङ्र्कत कृती करून, त्यास योग्य वाटेल अशा मर्यादेपर्यंत, प्रत्येक संघ राज्यक्षेत्राचे प्रशासन करील.
(२) भाग सहामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, राष्ट्रपतीस, एखाद्या राज्याच्या राज्यपालास लगतच्या संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक म्हणून नियुक्त करू शकेल, आणि राज्यपालाची अशा प्रकारे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असेल त्याबाबतीत, तो आपल्या मंत्रिपरिषदेविना स्वतंत्रपणे आपली कार्ये पार पाडील.
—————-
१.संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम १७ द्वारे पहिल्या अनुसूचीचा भाग ग यातील राज्ये या मूळ शीर्षाऐवजी दाखल केले.
२.संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम १७ द्वारे मूळ अनुच्छेद २३९ व २४० यांच्याऐवजी दाखल केला.