भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १११ :
विधेयकास अनुमती :
संसदेच्या सभागृहांकडून विधेयक पारित झालेले असेल तेव्हा, ते राष्ट्रपतीस सादर केले जाईल आणि राष्ट्रपती, एकतर आपण त्या विधेयकास अनुमती देत आहोत असे किंवा त्यास अनुमती देण्याचे रोखून ठेवीत आहोत असे घोषित करील :
परंतु असे की, राष्ट्रपतीस अनुमतीकरता विधेयक सादर केल्यानंतर, ते धन विधेयक नसल्यास, शक्य तितक्या लवकर, त्याला ते विधेयक सभागृहांकडे संदेशासह परत पाठवून विनंती करता येईल की, त्यांनी त्या विधेयकाचा किंवा त्यातील कोणत्याही विनिर्दिष्ट तरतुदींचा फेरविचार करावा आणि विशेषत:, तो आपल्या संदेशात ज्यांची शिफारस करील अशा कोणत्याही सुधारणा प्रस्तुत करण्याच्या इष्टतेचा विचार करावा आणि विधेयक याप्रमाणे परत पाठवले जाईल तेव्हा, सभागृहे त्या विधेयकावर तद्नुसार फेरविचार करतील आणि जर ते विधेयक, सभागृहांनी सुधारणेसह किंवा त्याविना पुन्हा पारित केले आणि राष्ट्रपतीस अनुमतीकरता सादर केले तर, राष्ट्रपती त्यास अनुमती देण्याचे रोखून ठेवणार नाही.