विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम ५ :
नावात बदल करणे :
१) हा अधिनियम अंमलात आला त्या तारखेस जी विदेशी व्यक्ती भारतात होती अशा कोणत्याही व्यक्तीला, त्या तारखेनंतर १.(भारतात) असताना, उक्त तारखेच्या निकटपूर्व काळात ती साधारणत: ज्या नावाने ओळखली जात असेल त्या नावाव्यतिरिक्त इतर कोणतेही नाव कोणत्याही प्रयोजनासाठी धारण करता किंवा वापरता येणार नाही अथवा त्या प्रयोजनासाठी धारण करण्याचा किंवा वापरण्याचा उद्देश बाळगता येणार नाही.
२) हा अधिनियम ज्या तारखेस अंमलात आला त्या तारखेनंतर एखाद्या विदेशी व्यक्तीने जर एखादा व्यापार किंवा धंदा, उक्त तारखेच्या निकटपूर्वी तो व्यापार किंवा धंदा ज्या नावाने किंवा अभिधानाने चालवला जात होता त्यापेक्षा वेगळ्या अशा कोणत्याही नावाने स्वतंत्रपणे किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीशी सहयोग करुन चालू ठेवला किंवा चालू ठेवण्याचे योजिले तर, पोटकलम (१) च्या प्रयोजनार्थ ती व्यक्ती उक्त तारखेच्या निकटपूर्वी ज्या नावाने ती ओळखली जात होती त्यापेक्षा वेगळे नाव वापरीत आहे असे मानण्यात येईल.
३) हा अधिनियम अंमलात आला त्या तारखेस १.(भारतात) नसलेली एखादी विदेशी व्यक्ती त्यानंतर १.(भारतात) आली तर तिच बाबतीत, पोटकलम (१) व (२) मध्ये हा अधिनियम अंमलात आल्याच्या तारखेसंबंधीचा जो कोणताही उल्लेख असेल त्याऐवजी जणू काही ती विदेशी व्यक्ती त्यानंतर भारतात प्रथम ज्या तारखेस आली त्या तारखेचाच उल्लेख केलेला असावा त्याप्रमाणे ती पोटकलमे परिणामक होतील.
४) या कलमाच्या प्रयोजनार्थ –
(a)क) नाव या शब्दप्रयोगात आडनावाचाही समावेश होतो; आणि
(b)ख) नावातील वर्णक्रम बदलल्यास नाव बदलण्यात आले असे मानण्यात येईल.
५) या कलमातील कोणतीही गोष्ट-
(a)क) केन्द्र शासनाने दिलेल्या २.(***) लायसनास किंवा परवानगीस अनुसरुन एखादे नाव; किंवा
(b)ख) विवाहित महिलेने तिच्या पतीचे नाव धारण केल्याच्या किंवा वापरल्याच्या बाबतीत,
लागू होणार नाही.
———
१. १९४७ चा अधिनियम क्रमांक ३८ याच्या कलम २ द्वारे ब्रिटिश भारत याऐवजी समाविष्ट केले.
२. १९५७ चा अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ६ द्वारा राज हा शब्द वगळण्यात आला (१९-१-१९५७ रोजी व तेव्हापासून).
