विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम ७ :
हॉटेलचालक आणि इतर यांच्यावर तपशील पुरवण्याचे आबंधन :
१) ज्या ठिकाणी राहण्याची किंवा झोपण्याची सोय बक्षिसी घेऊन केली जाते अशी वास्तू सुसज्ज असली वा नसली तरी तेथील चालकाने, अशा वास्तूमध्ये ज्या विदेशी व्यक्तीची सोय करण्यात आलेली असेल त्यांच्याबद्दलची विहित करण्यात येईल अशी माहिती अशा विहित व्यक्तीस आणि विहित पद्धतीने कळवणे हे त्या चालकाचे कर्तव्य असेल.
स्पष्टीकरण :
या पोटकलमात उल्लेखिलेली माहिती ही अशा वास्तूत ज्यांची सोय करण्यात आली आहे त्या सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही विदेशी व्यक्तीशी संबंधित असू शकेल आणि ती ठराविक कालांतरागणिक किंवा विशिष्ट वेळी वा प्रसंगी सादर करण्यात यावी असे सांगता येईल.
२) अशा प्रकारच्या कोणत्याही वास्तूत सोय करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस पोटकलम (१) मध्ये उल्लेखिलेली माहिती सादर करण्यासाठी त्या वास्तूचा चालक मागवील असा तपशील त्या चालकाकडे सादर करावा लागेल.
३) अशा प्रत्येक वास्तूच्या चालकाला, त्याने स्वत: पोटकलम (१) अन्वये सादर केलेल्या माहितीची आणि पोटकलम (२) अन्वये त्याने मिळवलेल्या माहितीची दप्तरी नोंद ठेवावी लागेल आणि ते दप्तर विहित करण्यात येईल अशा पद्धतीनुसार राखावे लागेल व विहित अशा कालावधीपर्यंत जतन करावे लागेल, आणि कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला ते दप्तर निरीक्षणार्थ खुले राहील.
१.(४) यासंबंधात विहित केलेल्या एखाद्या क्षेत्रात, विहित प्राधिकरणा संबंधित व्यक्तींना कळवण्यासाठी त्याच्या मते सुयोग्य अशा पद्धतीने एखादी नोटीस प्रसिद्ध करुन जर तसा निदेश दिला तर, कोणत्याही निवासी वास्तूची वहिवाट करणाऱ्या किंवा तिच्यावर ताबा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अशा वास्तूत सोय करण्यात येणाऱ्या विदेशी व्यक्तींच्या संबंधात, विनिर्दिष्ट करण्यात येईल अशी माहिती विनिर्दिष्ट अशा व्यक्तीस व विनिर्दिष्ट अशा पद्धतीने सादर करणे हे तिचे कर्तव्य असेल; आणि अशा वास्तूत सोय करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस पोटकलम (२) के उपबंध लागू होतील.)
———
१. १९४७ चा अधिनियम क्रमांक ३८ याच्या कलम ६ द्वारा समाविष्ट केले.
