विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम १३ :
या अधिनियमाचे उपबंध, इत्यादींचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणे,इ. :
१) जी व्यक्ती या अधिनियमाच्या उपबंधांचे किंवा त्याखाली काढलेल्या कोणत्याही आदेशाचे किंवा त्याखाली दिलेल्या कोणत्याही निदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करील किंवा उल्लंघन करण्यास अपप्रेरणा देईल किंवा अपप्रेरणा देण्याचा प्रयत्न करील किंवा उल्लंघन करण्याची पूर्वतयारी म्हणून एखादी कृती करील, किंवा अशा कोणत्याही आदेशानुसार दिलेल्या कोणत्याही निदेशाचे पालन करण्यात कसूर करील तिने या अधिनियमाच्या उपबंधांचे उल्लंघन केले आहे असे मानण्यात येईल.
२) जी कोणीही व्यक्ती, अन्य कोणाही व्यक्तीने या अधिनियमाच्या उपबंधांचे अथवा त्यांखाली काढण्यात आलेल्या कोणत्याही आदेशाचे किंवा देण्यात आलेल्या निदेशाचे उल्लंघन केले आहे हे माहित असताना अथवा असे समजण्यास वाजवी कारण असताना उक्त उल्लंघन केल्याबद्दल त्या अन्य व्यक्तीच्या अटकेला, संपरीक्षेला अथवा शिक्षेला प्रतिबंध करण्याच्या, त्यामध्ये व्यत्यय आणण्याच्या अथवा अन्यथा त्यात हस्तक्षेप करण्याच्या हेतूने कोणतेही साहाय्य करील तिने त्या उल्लंघनाला अपप्रेरणा दिली आहे असे मानण्यात येईल.
३) कलम ३ अन्वये काढण्यात आलेल्या कोणत्याही आदेशाचे अथवा त्याच्या अनुसार देण्यात आलेल्या निदेशाचे उल्लंघन करुन कोणतीही विदेशी व्यक्ती ज्याच्या साहाय्याने १.(भारतात) प्रवेश करील अथवा भारत सोडून जाईल त्या जलयानाचा अधिपती अथवा त्या वायुयानाचा पायलट याने उक्त उल्लंघन होऊ नये म्हणून आपण सर्व प्रकारे यथायोग्य तत्परता दाखविली होती असे शाबीत केले नाही तर, त्याने या अधिनियमाचे उल्लंघन केले आहे असे मानण्यात येईल.
——–
१. १९४७ चा अधिनियम ३८ याच्या कलम २ द्वारे ब्रिटिश भारत याऐवजी समाविष्ट केले.
