कलम ११ : आदेश, निदेश इत्यादींची अंमलबजावणी करण्याची शक्ती :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम ११ :
आदेश, निदेश इत्यादींची अंमलबजावणी करण्याची शक्ती :
१) या अधिनियमाच्या उपबंधांद्वारे किंवा त्याखाली किंवा त्यानुसार कोणताही निदेश देण्याची किंवा इतर कोणतीही शक्ती वापरण्याची शक्ती ज्याला प्रदान करण्यात आलेली आहे असे कोणतेही प्राधिकरण, या अधिनियमात स्पष्टपणे उपबंधित केल्याप्रमाणे करावयाच्या अन्य कोणत्याही कारवाईव्यतिरिक्त, अशा निदेशाचे अनुपालन व्हावे किंवा त्या निदेशाचा भंग होऊ नये किंवा झाल्यास त्याचे परिमार्जन व्हावे किंवा, प्रकरणपरत्वे, त्या शक्तीचा वापर प्रभावीरीत्या व्हावा यासाठी, त्याच्या मते वाजवी मर्यादेपर्यंत आवश्यक असतील असे उपाय योजू शकेल किंवा योजण्याची व्यवस्था करु शकेल आणि आवश्यक तेवढ्या बळाचा वापर करु शकेल किंवा वापर करण्याची व्यवस्था करु शकेल.
२) कोणताही पोलीस अधिकारी हा, या अधिनियमाखाली किंवा त्यानुसार काढलेल्या कोणत्याही आदेशाचे किंवा निदेशाचे अनुपालन व्हावे किंवा त्या आदेशाचा किंवा निदेशाचा भंग होऊ नये किंवा झाल्यास त्याचे परिमार्जन व्हावे यासाठी, त्याच्या मते वाजवी मर्यादेपर्यंत आवश्यक असतील असे उपाय योजू शकेल आणि आवश्यक तेवढ्या बळाचा वापर करु शकेल.
३) या कलमाद्वारे प्रदान केलेल्या शक्तीमुळे, त्या शक्तीचा वापर करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही जमिनीवर किंवा इतर मालमत्तेच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा अधिकारही प्रदान होतो असे मानण्यात येईल.

Leave a Reply