मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम १४ :
अन्वेषण :
१) आयोग कोणत्याही चौकशीसंबंधात अन्वेषण करण्याच्या प्रयोजनासाठी केंद्र सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या किंवा अन्वेषण अभिकरणाच्या सेवांचा, यथास्थिति, केंद्र सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या सहमतीने उपयोग करु शकेल.
२) चौकशीशी संबंधित कोणत्याही प्रकरणता अन्वेषण करण्याच्या प्रयोजनासाठी पोटकलम (१) , अन्वये ज्याच्या सेवांचा उपयोग करण्यात आला असेल असा कोणताही अधिकारी किंवा अभिकरण, आयोगाच्या निदेशाच्या व नियंत्रणाच्या अधीन राहून, –
(a)क)(अ) कोणत्याही व्यक्तीस उपस्थित राहण्यास फर्मावील व भाग पाडील आणि त्याची तपासणी करील;
(b)ख)(ब) कोणत्याही दस्तऐवज शोधून सादर करण्यास फर्मावील ; आणि
(c)ग)(क) कोणत्याही कार्यालयामधून सरकारी अभिलेख किंवा त्याची प्रत मागवील.
३) ज्यांची सेवा पोटकलम (१) अन्वये उपयोगात आणली जाते त्या कोणत्याही अधिकाऱ्यासमोर किंवा अभिकरणासमोर कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कोणत्याही निवेदनासंबंधात, कलम १५ चे उपबंध, जसे ते एखाद्या व्यक्तीने आयोगासमोर साक्ष देताना केलेल्या कोणत्याही निवेदानसंबंधात लागू होतात, तसेच लागू होतील.
४) पोटकलम (१) अन्वये ज्या अधिकाऱ्याच्या किंवा अभिकरणाच्या सेवेचा वापर केला असेल ते, चौकशीशी संबंधित कोणत्याही बाबीसंबंधात अन्वेषण करतील आणि त्याचा अहवाल, आयोग त्यासंदर्भात विनिर्दिष्ट करील अशा कालावधीच्या आत आयोगाला सादर करतील.
५) पोटकलम (४) अन्वये सादर केलेल्या अहवालात नमूद केलेल्या तथ्यांच्या आणि निष्कर्ष असल्यास, त्याच्याही अचूकतेविषयी आयोग स्वत:चे समाधान करुन घेईल आणि या प्रयोजनासाठी आयोग त्यास योग्य वाटेल अशी चौकशी करील (त्यात, अन्वेषण करणाऱ्या किंवा अन्वेषणास सहाय्य करणाऱ्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या तपासणीचाही अंतर्भाव राहील.)