प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम २९ :
सिद्ध दोषी व्यक्तीला प्राण्याच्या मालकीपासून वंचित ठेवण्याची न्यायालयाची शक्ती :
(१) या अधिनियमाखाली कोणत्याही प्राण्याचा मालक, कोणत्याही अपराधासाठी सिद्ध दोषी आहे, असे आढळल्यास, न्यायालय, त्याच्या दोषसिद्धीनंतर त्याला योग्य वाटेल तर, अन्या कोणत्याही शिक्षादेशाच्या जोडीला, ज्या प्राण्याच्या बाबतीत अपराध केला गेला असेल त्या प्राण्याचे शासनाकडे समपहरण करण्यात येईल आणि त्याला योग्य वाटेल त्या परिस्थितीत, प्राण्याचे विल्हेवाट लावण्यासंबंधी आणखी आदेश देऊ शकेल.
(२) यापूर्वी या अधिनियमाखाली त्याचा दोष सिद्ध झाल्याचे किंवा मालकाच्या चारित्र्याचे किंवा अन्यथा प्राण्याला मालकाकडे ठेवल्यामुळे त्या प्राण्याला, आणखी क्रूरतेची वागणूक देण्यात येत आहे असे उघडकीस आल्याचे पुराव्याद्वारे दाखवून देण्यात आल्याखेरीज पोटकलम (१) अन्वये कोणताही आदेश देण्यात येणार नाही.
(३) पोटकलम (१) मधील उपबंधांना बाध न देता, न्यायालय, या अधिनियमान्वये अपराधाबद्दल सिद्धदोषी व्यक्तीला, कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही प्राण्याला किंवा न्यायालयाला योग्य वाटल्यास आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल त्या कोणत्याही प्रकारच्या किंवा कोणत्याही जातीच्या कोणत्याही प्राण्याला एकतर कायमचे किंवा आदेशाद्वारे नियत करण्यात येईल, अशा कालावधीत ताब्यात घेण्यास प्रतिबंध करण्याचा सुद्धा आदेश देऊ शकेल.
(४)(a)(क)(अ) यापूर्वी दोष सिद्ध झाल्याचा किंवा उक्त व्यक्तीच्या चारित्र्याचा किंवा अन्यथा ज्या प्राण्यांच्या संबंधात ती दोषी असेल त्या प्राण्याला ताब्यात घेऊन उक्त व्यक्तीने त्या प्राण्याला क्रूरतेने वागविल्याचे उघडकीस आल्याचे पुराव्याद्वारे दाखवून देण्यात आले नसेल तर;
(b)(ख)(ब) जिची दोषसिद्धी झाली होती तिच्यावर केलेल्या फिर्यादीत फिर्यादी व्यक्तीने, आरोपी व्यक्तीची दोषसिद्धी करीत असताना, पूर्वोक्त आदेश देण्याची विनंती करण्याचा आपला हेतू आहे, असे नमूद केलेले नसेल तर; आणि
(c)(ग) क)ज्यांच्या संबंधात सिद्धदोषी ठरवण्यात आले होते अशा प्रकारचा कोणताही प्राणी बाळगण्यासाठी, ज्या क्षेत्रात त्या त्या काळी अमलात असलेल्या कायद्याखाली लायसन आवश्यक असते त्या क्षेत्रात ज्या अपराधाबद्दल सिद्धदोषी ठरविण्यात आले असेल असा तो अपराध नसेल तर,
पोटकलम (३) खाली कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
(५) त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात एतदविरूद्ध काहीही अंतर्भूत असले तरी, पोटकलम (३) अन्वये ज्या कोणत्याही बाबतीत आदेश देण्यात आला आहे त्या व्यक्तीला दिलेल्या आदेशाच्या उपबंधाविरूद्ध कोणत्याही प्राण्याला ताब्यात घेण्याचा अधिकार असणार नाही आणि जर ती कोणत्याही आदेशाच्या उपबंधाचे व्यतिक्रमण करील तर, तो शंभर रूपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा तीन महिन्यांपर्यंत असू शकेल एवढ्या कारावासाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल.
(६) पोटकलम (३) अन्वये ज्या कोणत्याही न्यायालयाने आदेश दिला असेल ते न्यायालय, स्वत: होऊन किंवा याबाबतीत त्याच्याकडे करण्यात आलेल्या अर्जावरून, कोणत्याही वेळी असा आदेश, विखंडित करू शकेल किंवा त्यात फेरबदल करू शकेल.