गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
प्रकरण २अ :
१.(औषधी द्रव्यांच्या दुरुपयोग नियंत्रणाकरिता राष्ट्रीय निधी :
कलम ७-अ :
औषधी द्रव्यांच्या दुरूपयोग नियंत्रणाकरिता राष्ट्रीय निधी:
१) केंद्र सरकारला औषधी द्रव्य दुरूपयोग नियंत्रण निधी या नावाचा एक निधी (या प्रकरणात यापुढे त्याचा उल्लेख निधी असा केलेला आहे.) राजपत्रातील अधिसूचनेद्वारे स्थापन करता येईल. या निधीमध्ये पुढील रकमा जमा करण्यात येतील-
अ) संसदेने या संबंधात केलेल्या कायद्याद्वारे योग्य ते समायोजन केल्यानंतर केंद्र सरकारला तरतूद करता येईल ती रक्कम.
ब) प्रकरण ५(अ) नुसार सरकारजमा केलेल्या कोणत्याही मालमत्तेच्या विक्रीचे उत्पन्न.
क) कोणतीही व्यक्ती किंवा संस्था देईल अशी कोणतीही अनुदाने
ड) उपरोक्त तरतुदींखाली निधीमध्ये जमा केलेल्या रकमांच्या गुंतवणुकीपासून मिळणारे कोणतेही उत्पन्न.
२.(२) पुढील योजनांच्या उपायाकरिता केलेला खर्च भागवण्याकरिता केंद्र सरकार निधींचा वापर करील.
अ) गुंगीकारक औषधी द्रव्यांच्या आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी,
ब) गुंगीकारक औषधी द्रव्यांच्या आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या दुरूपयोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी.
क) व्यसनींच्या शोध, उपचार, पुनर्वसनासाठी,
ड) गुंगीकारक औषधी द्रव्याच्या दुरूपयोगावर प्रतिबंध करण्यासाठी,
ई) गुंगीकारक औषधी द्रव्याच्या दुरूपयोगा विरूद्ध जनजागृतीसाठी,
फ) ज्या ठिकाणी व्यसनींना गुंगीकारक औषधी द्रव्याचा पूरवठा करणे ही वैद्यकीय गरज असेल अशा पूरवठ्यासाठी,
३) केंद्र सरकार निधीच्या वापराबाबत त्याला सल्ला देण्यासाठी व अशा निधीतून केंद्रसरकारने राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या मर्यादेस अधिन राहून मंजूरीकरीता, योग्य वाटेल अशा नियामक मंडळाची स्थापना करू शकेल.)
४) नियामक मंडळामध्ये (केंद्र सरकारच्या अपर सचिवापेक्षा कमी दर्जा नसलेला) अध्यक्ष आणि केंद्र सरकार नेमील असे जास्तीतजास्त सहा अन्य सदस्य यांचा समावेश असेल.
५) नियामक मंडळाला त्याच्या स्वत:च्या कार्यपद्धतीचे विनियमन करण्याचा अधिकार असेल.
———
१. १९८९ चा अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २००१ चा अधिनियम क्रमांक ९ याच्या कलम ४ अन्वये मूळ खंडा ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
