Ndps act कलम ६ : गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ यांबाबतची सल्लागार समिती :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६ :
गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ यांबाबतची सल्लागार समिती :
१) केंद्र सरकारला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ (या कलमात यापुढे जिचा उल्लेख समिती असा केलेला आहे) सल्लागार समिती या नावाची एक सल्लागार समिती स्थापन करता येईल. ही समिती केंद्र सरकार वेळोवेळी तिच्याकडे विचारार्थ पाठवील अशा, या अधिनियमाच्या अंमलबाजवणी बाबतच्या बाबींवर त्या सरकारला सल्ला देईल.
२) या समितीमध्ये अध्यक्षाच्या आणि केंद्र सरकारला नेमता येतील अशा जास्तीतजास्त वीस सदस्यांचा समावेश असेल.
३) केंद्र सरकारला फर्मावील त्या त्या वेळी या समितीची बैठक होईल आणि तिला तिच्या स्वत:च्या कार्यपद्धतीचे विनियमन करण्याचा अधिकार असेल.
४) समितीला तिची स्वत:ची कोणतीही कामे कार्यक्षम रीतीने पार पाडण्याकरिता आवश्यक एक किंवा अधिक उपसमित्यांची स्थापना करता येईल. आणि अशा कोणत्याही उपसमितीवर सर्वसाधारणपणे किंवा कोणत्याही विशिष्ट बाबींवर विचार करण्यासाठी समितीचा सदस्य नसेल अशा (बिनसरकारी व्यक्तीसह) कोणत्याही व्यक्तीची नेमणूक करता येईल.
५) समितीचा सभापती आणि इतर अध्यक्ष यांच्या पदाची मुदत, प्रसंगवशात रिक्त झालेली पदे भरण्याची रीत आणि त्यांना कोणतेही भत्ते देय असल्यास ते भत्ते आणि समिती तिचा सदस्य नसलेल्या एखाद्या व्यक्तीला ज्या शर्तींच्या व निर्बंधांच्या अधीन राहून तिच्या कोणत्याही उपसमितीचा सदस्य म्हणून नेमू शकेल त्या शर्ती व निर्बंध या गोष्टी केंद्र सरकारने केलेल्या नियमांद्वारे ठरवून देण्यात येतील त्याप्रमाणे असतील.

Leave a Reply