Ndps act कलम ६८-ह : सरकारजमा करण्यात आलेल्या मालमत्तेची नोटीस :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-ह :
सरकारजमा करण्यात आलेल्या मालमत्तेची नोटीस :
१) सदर प्रकरण जिला लागू होते अशा व्यक्तीने एकतर स्वत: किंवा तिच्या वतीने दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीमार्फत धारण केलेल्या मालमत्तेचे मूल्य, तिचे उत्पन्न, आजीविका व मत्ता यांची माहीत असलेली साधने आणि कलम ६८ इ अन्वये तपासणी करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या अहवालाच्या परिणामी किंवा अन्य प्रकारे उपलब्ध झालेल्या माहितीवरून किंवा सामग्रीवरून अशी सर्व किंवा कोणतीही मालमत्ता बेकायदेशीरपणे संपादित केलेली आहे असे मानण्यास सक्षम प्राधिकरणास कारण असल्यास (अशी कारणे लेखी नमूद करणे आवश्यक आहे) ते अशा व्यक्तीला (यात यापुढे जिचा बाधित व्यक्ती असा निर्देश करण्यात आला आहे) नोटीस बजावू शकेल आणि त्यामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेला तीस दिवसांच्या कालावधीत, त्याने अशी मालमत्ता ज्यामधून किंवा ज्याच्या मदतीने संपादित केली असेल अशी त्याच्या उत्पन्नाची आजीविकेची किंवा मत्तेची साधने दर्शवण्यास आणि तो ज्याचा आधार घेऊ इच्छितो तो पुरावा आणि संबद्ध अशी इतर माहिती व तपशील देण्यास आणि अशी सर्व किंवा कोणतीही मालमत्ता बेकायदेशीररीत्या संपादित केलेली मालमत्ता असल्याचे का मानण्यात येऊ नये व या प्रकरणान्वये ती केंद्र सरकारकडे का जमा करण्यात येऊ नये त्याबाबत कारणे देण्यास बजावू शकेल.
२) पोटकलम (१) खाली एखाद्या व्यक्तीला पाठवण्यात आलेल्या नोटिशीमध्ये त्या व्यक्तीच्या वतीने अन्य कोणत्याही व्यक्तीने कोणतीही मालमत्ता धारण केली असल्याचे विनिर्दिष्ट करण्यात आले असेल अशा बाबतीत, त्या नोटिशीची एक प्रत अशा इतर व्यक्तींवरही बजावण्यात आली पाहिजे.
(परंतु, कलम ६८-अ च्या पोट कलम २ च्या खंड (कक) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तीवर किंवा सदर खंडात नमूद केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकावर किंवा सहयोग्यावर किंवा पूर्वधारकावर अशा नोटीशीची बजावणी करू नये.).

Leave a Reply