Ndps act कलम ६८-फ : बेकायदेशीर संपादित मालमत्ता जप्त करणे किंवा गोठविणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-फ :
बेकायदेशीर संपादित मालमत्ता जप्त करणे किंवा गोठविणे :
१) कलम ६८-ई अन्वये चौकशी करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला जिच्या संबंधात अशी चौकशी किंवा अन्वेषण करण्यात येत आहे ती मालमत्ता बेकायदेशीरपणे संपादित केलेली आहे आणि अशी मालमत्ता लपविली जाण्याची, हस्तांतरित केली जाण्याची किंवा तिच्यावर अन्य कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे व परिणामी या प्रकरणान्वये अशी मालमत्ता सरकारजमा करण्याच्या कोणत्याही कार्यवाहीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, असे सकारण वाटेल तर तो अशी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देऊ शकेल आणि अशी मालमत्ता जप्त करणे व्यवहार्य नसेल अशा बाबतीत अशी मालमत्ता असा आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्याच्या किंवा सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरित करता येणार नाही किंवा तिच्या बाबतीत अन्य कार्यवाही करता येणार नाही, असा आदेश चौकशी करणारा अधिकारी देऊ शकेल व अशा आदेशाची एक प्रत संबंधित व्यक्तीवर बजावण्यात येईल.
परंतु, या पोटकलमाखाली लादण्यात आलेल्या कोणत्याही आदेशाच्या बाबतीत सक्षम प्राधिकाऱ्याला रीतसर माहिती देण्यात आली पाहिजे आणि असा आदेश काढण्यात आल्यापासून अठ्ठेचाळीस तासांच्या आत अशा आदेशाची एक प्रत अशा सक्षम प्राधिकाऱ्याकडे पाठविण्यात आली पाहिजे.
२) पोटकलम (१) अन्वये काढलेल्या कोणत्याही आदेशाला तो काढल्यापासून तीस दिवसांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्याच्या कोणत्याही आदेशाद्वारे पुष्टी देण्यात आल्याशिवाय सदर आदेश अमलात येणार नाही.
स्पष्टीकरण –
या कलमाच्या प्रयोजनासाठी मालमत्तेचे हस्तांतरण म्हणजे, मालमत्तेचा कोणताही विनियोग, बेचनपत्र, अभिहस्तांकन, व्यवस्था, सोपवणी प्रदान किंवा इतर अन्य व्यक्तींकडे सोपवणे; आणि यापुर्वीच्या तरतुदींच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो –
अ) मालमत्तेचा न्यास निर्माण करणे;
ब) मालमत्तेच्या बाबतीत भाडेपट्टा, गहाण, भार, सुविधाधिकार, अनुज्ञप्ती, अधिकार, भागीदारी किंवा हितसंबंध देणे किंवा निर्माण करणे;
क) अधिकार देणाऱ्या व्यक्तींखेरीज इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावाने मालमत्तेचा विनियोग करण्याचे निश्चित करण्यासाठी, मालकाखेरीज अन्य व्यक्तीकडे सोपवण्यात आलेल्या मालमत्तेच्या नेमणुकीच्या अधिकाराचा वापर करणे, आणि;
ड) कोणत्याही व्यक्तीने आपल्या स्वत:च्या मालमत्तेचे मूल्य प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कमी करण्यासाठी आणि इतर कोणत्याही व्यक्तीच्य मालमत्तेचे मूल्य वाढविण्यासाठी कोणत्याही उलाढालीमध्ये सहभागी होणे.

Leave a Reply