गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-इ :
बेकायदेशीरपणे संपादन केलेली मालमत्ता ओळखणे :
१) कलम ५३ अन्वये अधिकार सोपवण्यात आलेला प्रत्येक अधिकारी आणि पोलिस ठाण्याचा प्रत्येक प्रभारी अधिकारी, जिला हे प्रकरण लागू होते अशा कोणत्याही व्यक्तीवर या अधिनियमान्वये शिक्षायोग्य असलेल्या अपराधाचा आरोप ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाल्यावर (तसी कारणे नमूद करून) बेकायदेशीरपणे संपादित केलेली मालमत्ता शोधण्यासाठी आणि ओळखण्यासाठी आवश्यक असतील असे सर्व उपाय योजण्याची कार्यवाही करील.
२) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या उपाययोजनामध्ये, कोणतीही व्यक्ती जागा, मालमत्ता, मत्ता, दस्तऐवज, कोणत्याही बँकेची किंवा सरकारी वित्त संस्थांची हिशेब पुस्तके किंवा इतर कोणतीही संबद्ध सामग्री यांच्या संबंधातली कोणतीही चौकशी, अन्वेषण किंवा सर्वक्षण यांचा समावेश असेल.
३) पोटकलम (२) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली कोणतीही चौकशी, अन्वेषण किंवा सर्वेक्षण पोटकलम (१) मध्ये नमूद करण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडून, याबाबतीत सक्षम प्राधिकाऱ्याकडून देण्यात किंवा काढण्यात येतील अशा निदेशांनुसार किंवा मार्गदर्शन तत्त्वांनुसार पार पाडण्यात येईल.
