गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ५८ :
त्रासदायकपणे प्रवेश करणे, झडती घेणे, जप्ती करणे किंवा अटक करणे यासाठी शिक्षा :
१) कलम ४२, कलम ४३ किंवा कलम ४४ अन्वये अधिकार सोपवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीने
अ) संशयाला पुरेसे कारण नसताना कोणत्याही इमारतीत, वाहनात किंवा जागेत प्रवेश केला किंवा झडती घेतली किंवा प्रवेश करण्याची किंवा झडती घेतली किंवा प्रवेश करण्याची किंवा झडती घेण्याची व्यवस्था केली,
ब) या अधिनियमान्वये जप्त करण्यात पात्र असलेली गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापार उत्तेजित करणारे पदार्थ किंवा इतर वस्तू जप्त करण्याच्या निमित्ताने किंवा कलम ४२, कलम ४३ किंवा कलम ४४ अन्वये जप्त करण्यास पात्र असलेले कोणतेही दस्तऐवज किंवा इतर वस्तू जप्त करण्याच्या निमित्ताने कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता त्रासदायक रीतीने किंवा अनावश्यक असताना जप्त केली किंवा
क) एखाद्या व्यक्तीला त्रासदायकपणे किंवा अनावश्यक पकडून ठेवले, तिची झडती घेतली किंवा तिला अटक केली, तर अशी व्यक्ती सहा महिन्यांपर्यंतच्या कैदेच्या शिक्षेस किंवा एक हजार रूपयांपर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षांस पात्र ठरेल.
२) कोणतीही व्यक्ती, जाणीवपूर्वक व कूटील हेतूने चुकीची माहिती देईल व असे करण्यामुळे या अधिनियमाखाली अटक करण्यास किंवा झडती घेण्यास कारण निर्माण करील, तर ती दोन वर्षांपर्यंत कैदेच्या शिक्षेस किंवा दंड किंवा या दोन्ही शिक्षांना पात्र होईल.
