गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ५२-अ :
१.(जप्त करण्यात आलेली गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांची व्यवस्था लावणे :
२.(१) कोणतेही गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ यांचे धोकादायक स्वरूप, चोरी होण्याची किंवा बदलले जाण्याची शक्यता, साठवण्यासाठी योग्य अशा जागेची अडचण किंवा अन्य कोणतीही बाब विचारात घेऊन जी गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ किंवा त्यांचा जो वर्ग जप्त करण्यात आल्याबरोबर नष्ट करता येतील अशी औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ केंद्र शासनाला, शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून विनिर्दिष्ट करता येतील आणि केंद्र शासन वेळोवेळी निश्चित करील असा अधिकारी केंद्रशासनाकडून ठरवून देण्यात येईल अशा रीतीने यात यापुढे निर्दिष्ट करण्यात आलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून ते काम पार पाडील.)
२) एखादे २.(गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ किंवा नियंत्रित पदार्थ किंवा हस्तांतरण) जप्त करण्यात आला असेल व सर्वांत जवळच्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे किंवा कलम ५३ अन्वये अधिकार देण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडे तो पाठविण्यात आला असेल, अशा वेळी पोट कलम (१) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेला अधिकारी अशा गुंगीकारक औषधी द्रव्याचे किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाचे वर्णन, दर्जा, प्रमाण, त्याच्या बांधण्याची पद्धत, गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ किंवा ते ज्या पुडक्यात बांधले असतील ती पुडकी यांची चिन्हे, क्रमांक किंवा ओळख दर्शविणारा तपशील, त्यांची मूळ निर्मिती करणारा देश आणि अशी गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांची ओळख पटावी म्हणून या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीमध्ये निर्दिष्ट अधिकाऱ्याला आवश्यक वाटतील, असे इतर तपशील अंतर्भूत असलेली वस्तुसूची तयार केली पाहिजे आणि कोणत्याही दंडाधिकाऱ्याकडे पुढील प्रयोजनासाठी अर्ज केला पाहिजे-
अ) अशा प्रकारे तयार करण्यात आलेली वस्तुसूची अचूक असल्याचे प्रमाणित करण्यासाठी किंवा
ब) अशी २.(औषधी द्रव्ये किंवा पदार्थ किंवा हस्तांतरण) यांची दंडाधिकाऱ्यांच्या समोर छायाचित्रे घेण्यासाठी आणि अशी छायाचित्रे खरी असल्याचे प्रमाणित करण्यासाठी किंवा
क) अशा औषधी द्रव्यांचे किंवा पदार्थांचे अशा दंडाधिकाऱ्यांच्या समोर नमुने काढून घेण्यासाठी आणि अशा प्रकारे काढलेल्या नमुन्यांची यादी अचूक असल्याचे प्रमाणित करण्यासाठी
३) पोट कलम (२) अन्वये अर्ज करण्यात आला असेल अशा बाबतीत, दंडादिकाऱ्याने लवकरात लवकर अर्जाला परवानगी दिली पाहिजे.
४) भारतीय पुरावा अधिनियम १८७२ (१८७२ चा १) यामध्ये किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) यामध्ये कोणतीही तरतूद असली तरीही, पोट कलम (२) अन्वये तयार केलेली आणि दंडाधिकाऱ्याने प्रमाणित केलेली २.(गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थांची किंवा नियत्रित पदार्थांची किंवा हस्तांतरणांची) वस्तुसूची, छायाचित्रे आणि कोणतीही नमुन्यांची सूची ही या अधिनियमाखालील अपराधाची न्यायचौकशी करणाऱ्या प्रत्येक न्यायालयाने अशा अपराधाच्या संबंधातील प्राथमिक पुरावा म्हणून मानली पाहिजे. )
———
१. १९८९ चा अधिनियम क्रमांक २ याच्या कलम १४ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
२. २०१४ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम १७ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
