गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
(१९८५ चा अधिनियम क्रमांक ६१) (१६ सप्टेंबर १९८५)
प्रकरण १:
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
अंमली औषधिद्रव्यांसंबंधीचा कायदा एकत्रित व विशोधित करणे, अंमली औषधिद्रव्य आणि मन:प्रभावी पदार्थ यासंबंधीच्या कार्यपद्धतींचे नियंत्रण व विनियमन करण्यासाठी कडक तरतूद करणे, १.(अंमली औषधिद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ यांच्या निषिद्ध व्यापारातून प्राप्त केलेली किंवा त्यासाठी उपयोगात आणलेली संपत्ती सरकारजमा करण्यासाठी तरतूद करणे, अंमली औषधिद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ यासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय अभिसंधीच्या तरतुदींची अंमलबजावणी करणे) आणि त्याच्याशी संबंधित बाबी यांसाठी अधिनियम.
भारतीय गणराज्याच्या छत्तिसाव्या वर्षी संसदेद्वारे तो पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
———
१) या अधिनियमास गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ असे म्हणता येईल.
२) हा संपूर्ण भारतभर लागू आहे. २.(आणि तसेच तो
अ) भारत बाहेरील सर्व भारतीय नागरिकांना,
ब) भारतात नोंदणी झालेल्या जहाज व हवाईजहाजा वरील अशांनाही लागू असेल.)
३) केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नेमून देईल अशा तारखेला हा अधिनियम अमलात येईल आणि या अधिनियमाच्या वेगवेगळ्या तरतुदींकरिता आणि या अधिनियमाच्या वेगवेगळ्या तरतुदींकरिता आणि वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळ्या तारखा नेमून देता येतील व अशा कोणत्याही तरतुदीमध्ये या अधिनियमाच्या प्रारंभाबद्दल कोणताही उल्लेख असल्यास, त्याचा कोणत्याही राज्याच्या संदर्भात अर्थ लावताना ती तरतूद त्या राज्यात अमलात येण्यासंबंधीचा उल्लेख असा अर्थ लावण्यात येईल.
———
१. १९८९ चा अधिनियम क्रमांक २ याच्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २००१ चा अधिनियम क्रमांक ९ याच्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
