मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ६० :
केंद्र सरकारच्या मालकीच्या वाहनांची नोंदणी :
१) केंद्र सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील असे प्राधिकरण, केंद सरकारची मालमत्ता असलेल्या किंवा त्या त्या काळी त्याच्या संपूर्ण नियंत्रणाखाली असलेल्या आणि देशाच्या संरक्षणाशी संबंधित शासकीय प्रयोजनांसाठी वापरण्यात येणाऱ्या, आणि कोणत्याही वाणिज्यिक उपक्रमांशी संबंधित नसलेल्या कोणत्याही मोटार वाहनाची नोंदणी करू शकेल आणि अशा प्रकारे नोंदणी करण्यात आलेल्या कोणत्याही वाहनाची, ते केंद्र सरकारची मालमत्ता असेपर्यंत किंवा त्याच्या संपूर्ण नियंत्रणाखाली असेल, तोपर्यंत या अधिनियमाखाली अन्यथा नोंदणी करणे आवश्यक असणार नाही.
२) पोट-कलम (१) खाली वाहनाची नोंदणी करणारे प्राधिकरण, केंद्र सरकारने याबाबत केलेल्या नियमांमध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींनुसार नोंदणी चिन्ह नेमून देईल आणि असे वाहन या अधिनियमातील व त्याकाली केलेल्या नियमांतील सर्व आवश्यकता त्या वेळेपुरत्या पूर्ण करते आणि त्या वाहनाची या कलमाखाली नोंदणी करण्यात आलेली आहे, अशा आशयाचे त्या वाहनाच्या संबंधात प्रमाणपत्र देईल.
३) या कलमाखाली नोंदणी करण्यात आलेल्या वाहनासोबत पोट-कलम (२) अन्वये दिलेले प्रमाणपत्र असेल.
४) या कलमाखाली नोंदणी करण्यात आलेले वाहन केंद्र सरकारची मालमत्ता राहिली नाही किंवा त्याच्या संपूर्ण नियंत्रणाखाली राहिले नाही, तर त्यानंतर कलमे ३९ व ४० च्या तरतुदी लागू होतील.
५) पोट-कलम (१) खाली वाहनाची नोंदणी करणारे प्राधिकरण, वाहनाचे सर्वसाधारण स्वरूप, एकंदर आकारमान, अक्षबंध वजन यासंबंधी, राज्य शासनास कोणत्याही वेळी लागेल अशी सर्व माहिती पुरवील.