माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ८५ :
कंपन्यांनी केलेले अपराध :
१) या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या, निदेशांच्या किंवा आदेशांच्या तरतुदींचे कोणतेही उल्लंघन करणारी व्यक्ती म्हणजे एखादी कंपनी असेल तर, जेव्हा उल्लंघन करण्यात आले असेल तर, जेव्हा उल्लंघन करण्यात आले असेल त्यावेळी कंपनीची जी प्रभारी असेल किंवा जी कंपनीचा व्यवसाय करण्यासाठी जबाबदार असेल अशी प्रत्येक व्यक्ती व त्याचप्रमाणे कंपनीसुद्धा त्या उल्लंघनासाठी दोषी असेल आणि ती कार्यवाही केली जाण्यास व तदनुसार शिक्षा दिली जाण्यास सुद्ध पात्र असेल.
परंतु असे की, जर त्याने असे उल्लंघन आपल्या नकळत करण्यात आले होते किंवा अशा उल्लंघनास प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती सर्व खबरदारी आपण घेतली होती हे सिद्ध केले तर, या पोटकलमातील कोणत्याही गोष्टीमुळे अशा व्यक्तीला शिक्षेस पात्र ठरविण्यास येणार नाही.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांच्या, निदेशांच्या किंवा आदेशांच्या तरतुदीचे उल्लंघन एखाद्या कंपनीने केले असेल आणि कंपनीचा कोणताही संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी यांच्या संमतीने किंवा मुकानुमतीने किंवा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे झाले असेल तर, असा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी सुद्धा उल्लंघनासाठी दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्याविरूद्ध कार्यवाही केली जाण्यास व तदनुसार शिक्षा दिली जाण्यास ते पात्र ठरतील.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी –
एक) कंपनी म्हणजे, निगम, निकाय असेल आणि त्यात भागीदारी संध्या आणि व्यक्तींचे इतर संघ यांचा समावेश असेल; आणि
दोन) संचालक याचा भागीदारी संस्थेच्या संबंधातील अर्थ भागीदारी संस्थेतील भागीदार असा आहे.