IT Act 2000 कलम ८० : पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी यांचे प्रवेश करणे, झडती घेणे इत्यादी बाबतीतले अधिकार :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
प्रकरण १३ :
संकिर्ण :
कलम ८० :
पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी यांचे प्रवेश करणे, झडती घेणे इत्यादी बाबतीतले अधिकार :
१) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी १.(पोलीस निरीक्षकाच्या) दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल असा कोणताही पोलीस अधिकारी, किंवा केंद्र शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेला केंद्र शासनाचा किंवा राज्य शासनाचा कोणताही अधिकारी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करू शकेल आणि झडती घेऊ शकेल आणि तेथे आढळेली एखादी व्यक्ती, या अधिनियमाखालील अपराध करील असल्याचा संशय असेल किंवा तसे करीत असेल किंवा त्याने अपराध केला असेल किंवा करण्याच्या बेतात असेल तर तिला वॉरंटाशिवाय पकडू शकेल.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी सार्वजनिक ठिकाण या संज्ञेमध्ये, कोणतेही लोकवाहन, हॉटेल, कोणतेही दुकान किंवा लोकांनी वापरावी असा उद्देश असलेली किंवा लोकांना प्रवेश असलेली कोणतीही जागा याचा समावेश होतो.
२) जर कोणत्याही व्यक्तीला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याखेरीज अन्य व्यक्तीने पोटकलम (१) खाली अटक केली असेल तर, असा अधिकारी, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला अनावश्यक विलंब न करता त्या प्रकरणात अधिकारिता असणाऱ्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर करील किंवा पाठवील किंवा प्रभारी पोलीस ठाणे अधिकाऱ्यासमोर हजर करील.
३) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ याच्या तरतुदी, या कलमाच्या तरतुदीना अधीन राहून, जितपत शक्य असेल तितपत, या कलमाखाली केलेला कोणताही प्रवेश, झडती किंवा अटक या संबंतातही लागू होतील.
——-
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४१ द्वारे सुधारणा.

Leave a Reply