माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ६क :
१.(सेवा पुरवठाकारांकडून सेवा पुरविणे :
१) समुचित शासन, या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ आणि इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे जनतेला कार्यक्षमपणे सेवा पुरविण्यासाठी, संगणकीकरणाची सुविधा उभारण्यासांी, तिची देखभाल करण्यासाठी आणि तिची दर्जावाढ करण्यासाठी आणि विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अन्य कोणत्याही सेवा पुरविण्यासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, आदेशाद्वारे कोणत्याही सेवा पुरवठाकारास प्राधिकृत करता येईल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या अशाप्रकारे प्राधिकृत केलेल्या सेवा पुरवठाकारामध्ये अशा सेवा क्षेत्राचे नियमन करणाऱ्या धोरणानुसार इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे सेवा पुरविण्यासाठी समुचित शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे अशी कोणतीही व्यक्ती, खासगी एजन्सी, खासगी कंपनी, भागीदारी संस्था एका व्यक्तीची मालकी असलेली संस्था, किंवा अशी अन्य कोणतीही निकाय किंवा एजन्सी यांचा समावेश होतो.
२) समुचित शासनास, अशी सेवा पुरविण्याच्या प्रयोजनार्थ समुचित शासनाकडून विहित करण्यात येईल असा सेवा आकार, अशी सेवा उपलब्ध करून दिलेल्या व्यक्तीकडून गोळा करण्यासाठी तो धारण करण्यासाठी व त्याचे समायोजन करण्यासाठी देखील पोटकलम (१) अन्वये प्राधिकृत केलेल्या कोणत्याही सेवा पुरवठाकारांस प्राधिकृत करता येईल.
३) पोटकलम (२) च्या तरतुदींस अधीन राहून, समुचित शासनास, सेवा पुरवठाकारांद्वारे सेवा आकार गोळा करण्यासाठी, तो धारण करण्यासाठी व त्याचे समायोजन करण्यासाठी त्या अधिनियमांतर्गत, नियमातंर्गत, विनियमातंर्गत किंवा ज्या अन्वये सेवा पुरविण्यात आली आहे. त्या अधिसूचनेअंतर्गत स्पष्टपणे तरतूद केलेली नाही ही वस्तुस्थिती असली तरी, या कलमान्वये सेवा आकार मोठा करण्यासाठी, तो धारण करण्यासाठी व त्याचे समायोजन करण्यासाठी, सेवा पुरवठाकारांस प्राधिकृत करता येईल.
४) समुचित शासनास या कलमान्वये सेवा पुरवठाकारांकडून ज्याची आकारणी करता येईल आणि गोला करता येईल त्या सेवा आकाराचे प्रमाण, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करता येईल.
परंतु, समुचित शासनास, विविध प्रकारच्या सेवांसाठी सेवा आकाराचे वेगवेगळे प्रमाण विनिर्दिष्ट करता येईल.)
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ७ द्वारे दाखल.