माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम २ :
व्याख्या :
१) या अधिनियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर –
(a)क) प्रवेश या शब्दातील व्याकरणिक फेरफार आणि तत्सम अभिव्यक्ती याचा अर्थ संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क याच्या तर्कशास्त्रीय, अंकगणितीय किंवा मेमरी फंक्शन साधनांमधून माहिती मिळविणे, त्याचे शिक्षण देणे किंवा त्याबाबत माहिती देणे असा आहे;
(b)ख) प्रेषिती म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जिला मिळावे असा प्रेषकाचा उद्देश असेल अशी व्यक्ती. मात्र त्यात कोणत्याही मध्यस्थाचा अंतर्भाव होत नाही.
(c)ग) न्यायनिर्णायक अधिकारी म्हणजे कलम ४६च्या पोटकलम (१) अन्वये नियुक्त केलेला न्यायनिर्णायक अधिकारी;
(d)घ) १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर (सही) करणे याचा त्याच्या व्याकरणिक फेरफारांसह आणि तत्सम अभिव्यक्तीसह अर्थ इलेक्ट्रॉनिक अभिलेखांवर १.(इलेक्ट्रॉनिक सही) करून ते अधिकृत करण्याच्या प्रयोजनासाठी एखाद्या अंगीकारलेले कोणतेही पद्धतीशास्त्र किंवा कार्यपद्धती असा आहे;
(da)२.(घ-क)अपील न्यायाधिकरण म्हणजे कलम ४८ च्या पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेले अपील न्यायाधिकरण.
(e)ङ) समुचित शासन म्हणजे-
एक) संविधानाच्या सातव्या अनुसूचीच्या सूची दोनमध्ये यादी दिलेल्या,
दोन) संविधानाच्या सातव्या अनुसूचीच्या यादी तीन अन्वये अधिनियमात केलेल्या कोणत्याही राज्य कायद्याच्या संबंधातील.
कोणत्याही बाबींच्या संबंधात राज्य शासन आणि इतर कोणत्याही बाबतीत केंद्र शासन;
(f)च) अॅसीमेट्रीक क्रिप्टो सिस्टिम म्हणजे इलेक्ट्रानिक सहीसाठी प्रायव्हेट की आणि डिजिटल सहीची पडताळणी करण्यासाठी पब्लिक की यांचा समावेश असलेली सिक्यूअर की-पेअर पद्धती;
(g)छ) प्रमाणन प्राधिकारी म्हणजे कलम २४ अन्वये इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र देण्यासाठी जिला लायसेन्स देण्यात आले आहे अशी व्यक्ती;
(h)ज) प्रमाणन प्रथा-विवरणपत्र म्हणजे डिजिटल सही प्रमाणपत्र देताना प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणाने वापरलेल्या प्रथा विनिर्दिष्ट करण्यासाठी प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणाने दिलेले विवरणपत्र;
(ha)३.(जक)संदेशवहन साधन याचा अर्थ सेलफोन, पर्सनल डिजिटल असिस्टंटस किंवा दोहांचे संयुक्तिकरण अथवा कोणताही मजकूर व्हिडिओ, ऑडिओ किंवा प्रतिमा संदेशवहन करण्यासाठी, पाठविण्यासाठी किंवा पारेषित करण्यासाठी वापरलेले अन्य कोणतेही साधन असा आहे;
(i)झ) संगणक म्हणजे कोणतेही इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक, ऑप्टिकल किंवा इतर हाय स्पीड डाटा प्रोसेसिंग डिव्हाईस किंवा इलेक्ट्रॉनिक, मॅग्नेटिक किंवा ऑप्टिकल इम्पल्सेसच्या मॅन्युप्युलेशनद्वारे लॉजिकल, आरिथमेटिक अँड मेमरी परफॉर्म करणारी पद्धती आणि त्यात सर्व इनपुट, आऊटपुट, प्रोसेसिंग, स्टोअरेज, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर किंवा संगणकाला किंवा संगणक सिस्टीमला किंवा संगण नेटवर्कला जोडलेल्या आहेत किंवा त्याच्याशी संबंधित आहेत अशा कम्युनिकेशन सुविधांचा त्यात समावेश होतो;
(j)४.(ञ) संगणक नेटवर्क म्हणजे एक किंवा अधिक संगणक किंवा संगणक सिस्टिम किंवा संदेशवाहन साधणे
एक) सॅटेलाईट, मायक्रोवेव्ह, टेरेस्टियल लाईन तार किंवा बिनतारी किंवा इतर कम्युनिकेशन माध्यमांमार्फत आणि
दोन ) इंटरकनेक्शन सलगपणे असलेल्या किंवा नसलेल्या दोन किंवा अधिक परस्परांना जोडलेल्या संगणकांचा समावेश असलेल्या टर्मिनल्स किंवा कॉम्प्लेक्स किंवा संदेशवहन साधन यांच्यामार्फत परस्परांना जोडणे;
(k)ट) संगणक साधनसामग्री म्हणजे संगणक, संगणक सिस्टीम, संगणक नेटवर्क, डाटा, कॉम्प्युटर डाटाबेस किंवा सॉफ्टवेअर;
(l)ठ) संगणक यंत्रणा म्हणजे इनपुट-आऊटपुट आधार साधनासह आणि कार्यक्रम पार पाडण्याजोगे (प्रोग्रॅमबेल) आणि बाह्य फाईलबरोबर वापरण्यास योग्य नसतात असे कॅलक्युलेटर्स (परिगणित्रे) वगळून, ज्यामध्ये संगणक प्रोग्रॅम, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रक्शन, इनपुट आधारसामग्री व आऊटपुट आधारसामग्री यांचा समावेश आहे आणि जे तर्कशास्त्र, गणित, आधारसामग्री साठवण व रिट्रीव्हल, कम्युनिकेशन कन्ट्रोल आणि इतर कार्ये पार पाडते असे साधन किंवा साधनांचा संग्रह;
(m)ड) नियंत्रक म्हणजे कलम १७ च्या पोटकलम (१) अन्वये नियुक्त केलेल्या प्रमाणन प्राधिकरणाचे नियंत्रक;
(n)ढ)५.(***)
(na)३.(ढ-क) सायबर कॅफे म्हणजे जनतेतील कोणत्याही व्यक्तीस नेहमीचा व्यवहार करताना ज्या ठिकाणी इंटरनेटद्वारे कोणत्याही व्यक्तीस कोणतीही सुविधा पुरवली जाते असे ठिकाण;
(nb)ढ-ख) सायबर सुरक्षा म्हणजे कोणत्याही अनाधिकृत मार्गापासून, वापरापासून, उघड करण्यापासून, व्यत्ययापासून, फेरफारापासून किंवा विनाशापासून माहितीचे साधनसामग्रीचे, साधनांचे, संगणकाचे, संगणक साधनसंपत्तीचे, संदेशवहन साधनांचे व त्यात साठवलेल्या माहितीचे संरक्षण करणे;)
(o)ण) आधारसामग्री (डाटा) म्हणजे फॉर्मलाईज रीतीने तयार करण्यात येत असलेली किंवा तयार करण्यात आली असलेली आणि कॉम्प्युटर सिस्टीममध्ये किंवा कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये प्रोसेस करावयाची किंवा प्रोसेस करण्यात येत असलेली किंवा प्रोसेस करण्यात आली असलेली माहिती, ज्ञान, वस्तुस्थिती, संकल्पना किंवा सूचना यांचे नमुने होत आणि ते कोणत्याही स्वरूपात (कॉम्प्युटर qप्रटआऊट, मॅग्नेटिक किंवा ऑप्टिक स्टोअरेज मीडिया, पंच कार्ड, पंच टेप्स) किंवा कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये अंतर्गतपणे साठवलेले अशा स्वरूपात असतील;
(p)त) डिजिटल सही १.(डिजिटल सिग्नेचर) म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचे कलम ३ च्या तरतुदींनुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा कार्यपद्धतीने सबस्क्रायबरने केलेले अधिप्रमाणन;
(q)थ) डिजिटल सही प्रमाणपत्र म्हणजे कलम ३५ च्या पोटकलम (४) अन्वये दिलेले डिजिटल सही प्रमाणपत्र;
(r)द) इलेक्ट्रॉनिक प्रपत्र याचा माहितीच्या संदर्भातील अर्थ, निर्माण केलेली, पाठवलेली, मिळालेली किंवा मीडिया, मॅग्नेटिक, ऑप्टिकल, कॉम्प्युटर मेमरी, मायक्रो फिल्म किंवा कॉम्प्युटर जनरेटेड मायक्रोफिच किंवा तत्सम साधनामध्ये असलेली कोणतीही माहिती असा आहे;
(s)ध) इलेक्ट्रॉनिक गॅझेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले राजपत्र;
(t)न) इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड (अभिलेख) म्हणजे आधारसामग्री, अभिलेख किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्म किंवा मायक्रो फिल्म किंवा कॉम्प्युटर जनरेटेड मायक्रो फिच यामध्ये साठवलेली, प्राप्त केलेली किंवा पाठवलेली डेटा जनरेटेड प्रतिमा किंवा आवाज,
(ta)३.(न-क) इलेक्ट्रॉनिक सही (सिग्नेचर) म्हणजे दुसऱ्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या इलेक्ट्रॉनिक तंत्राच्या सहाय्याने एखाद्या वर्गणीदाराने (सबक्राईबर) केलेले कोणत्याही इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचे अधिप्रमाणत आणि यात डिजिटल सहीचा समावेश होतो.
(tb)न-ख) इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र म्हणजे कलम ३५ अन्वये दिलेले इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र आणि यात्र डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्राचा समावेश होतो;
(u)प) कार्य यामध्ये संगणकाच्या संबंधात लॉजिक, नियंत्रण, गणितीय प्रक्रिया, वगळणे, साठवणे आणि कॉम्प्युटरमधून किंवा त्याच्याबरोबर कम्युनिकेशन किंवा टेलिकम्युनिकेशन यांचा अंतर्भाव होतो;
(ua)३.(प-क) भारतीय संगणक आपत्ती निवारण पथक (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) म्हणजे कलम ७० ब पोटकलम (ब) अन्वये स्थापन केलेली एजन्सी.
(v)फ) माहिती यामध्ये ६. (डेटा, मेसेज, टेक्स्ट,) इमेजेस, साऊंड, कोड, कॉम्प्युटर प्रोग्रॅम, सॉफ्टवेअर आणि डाटाबेसेस किंवा मायक्रो फिल्म किंवा कॉम्प्युटर जनरेटेड मायक्रोफिच यांचा अंतर्भाव होतो;
(w)७.(ब) कोणत्याही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक अभिलेखाच्या संबंधातील मध्यस्थ याचा अर्थ जी कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने तो अभिलेख स्वीकारते, साठवते किंवा पारेषित करते किंवा त्या अभिलेखाच्या संबंधात कोणतीही सेवा पुरवते अशी व्यक्ती; असा आणि त्यात दूरसंचार सेवा पुरवठाकाराचा नेटवर्क सेवा पुरवठाकारांचा, इंटरनेट सेवा पुरवठाकारांचा, वेब-होस्टिंग सेवा पुरवठाकारांचा, सर्च इंजिन्सचा ऑन-लाईन पेमेंट साईटचा, (स्थळांचा), ऑनलाईन लिलाव साईटचा, ऑनलाईन मार्केट स्थळांचा आणि सायबर कॅफेचा समावेश होतो;)
(x)भ) की पेअर (जोडी) अॅसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीमच्या संबंधात याचा अर्थ प्रायव्हेट की आणि त्याची गणितीयदृष्ट्या संबंधित पब्लिक की असा आहे. ज्या अशाप्रकारे संबंधित असतात की, प्रायव्हेट की द्वारे निर्माण केलेली डिजिटल सिग्नेचर पब्लिक की द्वारे पडताळता येते;
(y)म) कायदा यामध्ये संसदेचे किंवा राज्य विधानमंडळाचे अधिनियम, राष्ट्रपतींनी किंवा यथास्थिती राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश, अनुच्छेद, २४० अनुसार राष्ट्रपतींनी केलेले विनियम, संविधानाच्या अनुच्छेद ३५७ च्या खंड (१) च्या उपखंड (अ) अन्वये राष्ट्रपतींचा अधिनियम म्हणून अधिनियमित केलेली विधेयके यांचा समावेश होतो आणि तसेच त्यात त्याअन्वये काढलेले किंवा केलेले नियम, विनियम, उपविधी आणि आदेश यांचा समावेश होतो;
(z)य) लायसेन्स याचा अर्थ कलम २४ अन्वये प्रमाणन प्राधिकरणाला दिलेले लायसेन्स असा आहे;
(za)य-क) ऑरिजिनेटर म्हणजे जी कोणताही इलेक्ट्रॉनिक मेसेज पाठवते, निर्माण करते, साठवते किंवा पारेषित करते किंवा जी कोणताही इलेक्ट्रॉनिक मेसेज अन्य कोणत्याही व्यक्तीला पाठविण्याची, निर्माण करण्याची, साठवण्याची किंवा पारेषित करण्याची व्यवस्था करते अशी व्यक्ती मात्र त्यात मध्यस्थाचा अंतर्भाव होत नाही;
(zb)य-ख) विहित म्हणजे या अधिनियमान्वये केलेल्या नियमांद्वारे विहित केलेले;
(zc)य-ग) प्रायव्हेट की म्हणजे डिजिटल सिग्नेचर निर्माण करण्यासाठी वापरण्यता येणारी की पेअरमधली की;
(zd)यघ) पब्लिक की म्हणजे डिजिटल सिग्नेचरची पडताळणी करण्यासाठी वापरण्यात येणारी आणि डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेली की पेअरमधली की;
(ze)यङ) सुरक्षापद्धती म्हणजे-
(a)क) अनधिकृत प्रवेश आणि गैरवापर यापासून वाजवीपणे संरक्षण देते असे;
(b)ख) विश्वासार्हता आणि अचूक वापर यासाठी वाजवी पातळीची तरतूद करते असे;
(c)ग) उद्देशित कार्ये पार पाडण्यासाठी वाजवीरीत्या योग्य असते असे;
(d)घ) सर्वसाधारणपणे स्वीकृत सुरक्षा कार्यपद्धतीला धरून असते असे; कॉम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर व प्रोसिजर;
(zf)य-च) सुरक्षा कार्यपद्धती म्हणजे पेंद्र सरकारने कलम १६ अन्वये विहित केलेली सुरक्षा कार्यपद्धती;
(zg)य-छ) वर्गणीदार (सबस्क्रायबर) म्हणजे जिच्या नावाने १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) प्रमाणपत्र देण्यात येते ती व्यक्ती;
(zh)य-ज) पडताळणे याचा डिजिटल सही, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा पब्लिक की यांच्या व्याकरणिक फेरफार केलेल्या रूपांसह आणि तशाच अभिव्यक्तीसह अर्थ-
(a)क) वर्गणीदाराच्या पब्लिक कीशी अनुरूप अशा प्रायव्हेट कीचा वापर करून मूळ इलेक्ट्रॉनिक रेकॉड डिजिटल सहीला जोडले आहे किंवा नाही.
(b)ख) असे रेकॉर्ड डिजिटल सहीशी अशाप्रमारे जोडण्यात आले होते तेव्हा मूळ रेकॉर्ड जसेच्या तसे ठेवण्यात आले होते की, त्यात फेरबदल करण्यात आले होते हे निर्धारित करणे.
२) या अधिनियमातील कोणत्याही अधिनियमितीचा किंवा तिच्या कोणत्याही तरतुदीचा अशी अधिनियमिती किंवा तरतूद ज्या क्षेत्रामध्ये अमलात नसेल त्याच्या संबंधात अर्थ लावताना तो त्या क्षेत्रात अमलात असलेल्या तदनुरूप कायद्याचा किंवा त्या कायद्याच्या संबंद्ध तरतुदीचा संदर्भ असल्याचे मानून लावण्यात येईल.
———
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे डिजिटल सिग्नेचर याऐवजी दाखल.
२.सन २०१७ चा अधिनियम ७ च्या कलम १६९ द्वारे दाखल.
३.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४ द्वारे दाखल.
४.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४ द्वारे खंड (ञ) सुधारणा.
५.सन २०१७ चा अधिनियम ७ च्या कलम १६९ द्वारे गाळले.
६.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४ द्वारे सुधारणा.
७.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम ४ द्वारे खंड (ब) सुधारणा.