Ipc कलम ९२ : सद्भावपूर्वक एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी संमतीशिवाय केलेली कृती :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ९२ :
सद्भावपूर्वक एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी संमतीशिवाय केलेली कृती :
(See section 30 of BNS 2023)
कोणतीही गोष्ट (कृती) एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी सद्भावपूर्वक केलेली असून, संमती दर्शविणे त्या व्यक्तीला शक्य नाही, अशी परिस्थिती असेल तर, अथवा ती व्यक्ती संमती देण्यास असमर्थ असून तिला हितकारक होईल अशा प्रकारे गोष्ट (कृती) करण्यासाठी वेळीच जाचेकडून संमती मिळविणे शक्य होईल असा तिचा कोणताही पालक अगर कायदेशीर रक्षणभार आहे असा अन्य इसम तेथे नसेल तर, त्या व्यक्तीची संमती न घेताही ती गोष्ट (कृती) केली तरी, तिच्या योगे त्या व्यक्तीला कोणताही अपाय घडल्यास त्यामुळे ती गोष्ट (कृती) अपराध होत नाही; परंतु –
परंतुके :
एक: उद्देशपूर्वक मृत्यू घडवून आणण्याच्या, किंवा मृत्यु घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या बाबतीत हा अपवाद लागू असणार नाही.
दोन: कोणतीही गोष्ट करणाऱ्या व्यक्तीला, त्या गोष्टीमुळे मृत्यू घडून येणे संभवनीय आहे अशी जाणीव असेल तर, ती गोष्ट मृत्यू किंवा जबर दुखापत टाळणे याहून अथवा कोणताही भीषण रोग किंवा विकलता बरी करणे याहून अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी करण्याच्या बाबतीत हा अपवाद लागू असणार नाही.
तीन: मृत्यू किंवा दुखापत टाळणे याहून अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी (कारणासाठी) इच्छापूर्वक दुखापत करणे किंवा दुखापत करण्याचा प्रयत्न करण्याच्या बाबतीत हा अपवाद लागू असणार नाही.
चार: जो कोणताही अपराध करण्याच्या बाबतीत हा अपवाद लागू होण्यासारखा नाही त्याच्या अपप्रेरणाच्या पडत नाही त्याचे सहाय्य करण्यास (अपप्रेरणा) पण हा अपवाद लागू नसतो.
उदाहरणे :
क) (य) आपल्या घोड्यावरुन पडतो व बेशुद्ध होतो. (य) वर कवटीला शस्त्र क्रिया करणे आवश्यक आहे असे (क) या शल्यचिकित्सकाला आढळून येत. (य) ला स्वत:च निर्णय करण्याची शक्ती पुन्हा प्राप्त होण्यापूर्वी, (क) हा (य) चा मृत्यू घडावा या उद्देशाने नव्हे, तर (य) चे हित या सद्भावनेने ती शस्त्रक्रिया करतो. (क) ने काहीही अपराध केलेला नाही.
ख) एक वाघ (य) ला पळवून नेतो. वाघावर गोळी झाडल्यास त्या गोळीने (य) कदाचित मारला जाईल असा संभव आहे हे जाणूनही पण (य) ला मारण्याच्या उद्देशाने नव्हे, तर (य) चे हित व्हावे या सद्भावनेने (क) वाघावर गोळी झाडतो. (क) च्या गोळीने (य) ला प्राणघातक जखम होते. (क) ने काहीही अपराध केलेला नाही.
ग) (क) या शल्यचिकित्सकाला असे दिसून येते की, एक बालक अपघातात सापडलेले असून ताबडतोब शस्त्रक्रिया केली नाही तर, तो प्राणघातक ठरण्याचा संभव आहे. बालकाच्या पालकाकडे विनंती करण्यास वेळ नाही. बालकाच्या विनवणीस न जुमानता त्याच्या हिताच्या उद्देशाने (क) सद्भावपूर्वक ती शस्त्रक्रिया करतो. (क) ने काहीही अपराध केलेला नाही.
घ) आग लागलेल्या घरात (क) हा (य) या मुलासह आहे. खालचे लोक घोंगडी पसरुन धरतात. घराच्या गच्चीवरुन मुलाला खाली टाकल्यास, त्याच्या पडण्यामुळे मूल मरण्याचा संभव असल्याची जाणीव असून, पण मुलाला मारण्याच्या उद्देशाने नव्हे, तर मुलाच्या हिताच्या उद्देशाने सद्भावपूर्वक तो तसे करतो. या बाबतीत वरुन पडल्यामुळे ते मूल मेले तरी, (क) ने काहीही अपराध केलेला नाही.
स्पष्टीकरण :
नुसता आर्थिक फायदा म्हणजे कलमे ८८, ८९ व ९२ यांच्या अर्थानुसार हित नव्हे.

Leave a Reply