Ipc कलम ५०५ : सार्वजनिक आगळीक होण्यास साधक अशी विधाने :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ५०५ :
१.(सार्वजनिक आगळीक होण्यास साधक अशी विधाने :
(See section 353 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लष्करी बंड किंवा सार्वजनिक शांततेविरुद्ध अपराध करण्याच्या उद्देशाने खोट विधान, अफवा इत्यादी प्रसृत करणे.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
अपराध : वेगवेगळ्या वर्गामध्ये शत्रुत्व, द्वेषभाव किंवा दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने खोटी विधाने, अफवा इत्यादी प्रसृत करणे.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
अपराध : शत्रुत्व, द्वेषभाव किंवा दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने उपासनास्थान इत्यादी ठिकाणी खोटे विधान, अफवा इत्यादी प्रसृत करणे.
शिक्षा :५ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
२.(१)) जर कोणी एखादे विधान, अफवा किंवा वृत्त प्रकरणपरत्वे करील, प्रसिद्ध करील, किंवा प्रसृत करील आणि त्यामागे–
अ) ३.(भारताची) भूसेना, ४.(नौसेना किंवा वायुसेना) यातील कोणताही अधिकारी भूसैनिक, ५.(नौसैनिक किंवा वायुसैनिक) यांच्याकडून बंड घडवून आणण्याचा, किंवा त्या नात्याने त्याचे जे कर्तव्य असेल त्याकडे त्याला दुर्लक्ष करायला लावण्याचा, किंवा त्यात कसूर करायला लावण्याचा उद्देश असेल, किंवा त्यामुळे तसे होण्याची शक्यता असेल तर, किंवा
ब) ज्यामुळे एखादी व्यक्ती देशाविरुद्ध किंवा सार्वजनिक प्रशांततेविरुद्ध अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे जनतेमध्ये अथवा जनतेपैकी एखाद्या भागामध्ये भीती किंवा भयग्रस्तता निर्माण करण्याचा उद्देश असेल, किंवा त्यामुळे तसे होण्याची शक्यता असेल तर, किंवा
क) एखाद्या वर्गातील किंवा समूहातील व्यक्तींना दुसऱ्या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समूहाविरुद्ध कोणताही अपराध करण्यास चिथावणी देण्याचा उद्देश असेल, किंवा त्यामुळे तशी चिथावणी दिली जाण्याची शक्यता असेल तर,
त्याला ६.(तीन वर्षांपर्यंत) असू शकेल इतक्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
वर्गावर्गामध्ये शत्रुत्व, द्वेषभाव किंवा दुष्टावा निर्माण करणारी किंवा वाढविणारी विधाने :
७.(२) जर कोणी अफवा किंवा भयप्रद वृत्त अंतर्भूत असलेले कोणतेही विधान किंवा वृत्त करील, प्रसिद्ध करील किंवा प्रसृत करील आणि धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थना, भाषा, जात किंवा समाज या कारणावरुन, किंवा इतर कोणत्याही कारणावरुन निरनिराळे धार्मिक, वांशिक, भाषक किंवा प्रादेशिक गट किंवा जाती किंवा समाज यांच्यामध्ये शत्रुत्वाची किंवा द्वेषाची भावना, किंवा दृष्टावा निर्माण होण्याची शक्यता असेल त्याला, तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उपासनास्थान, इत्यादी ठिकाणी केलेला पोटकलम (२) खालील अपराध :
३) जो कोणी, कोणत्याही उपासनास्थानी अथवा धार्मिक उपासना किंवा धार्मिक संस्कार करण्यात गुंतलेल्या कोणत्याही जमावामध्ये पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेला अपराध करील त्याला पाच वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.)
अपवाद:
जेव्हा कोणतेही विधान, अफवा, किंवा वृत्त करणाऱ्या, प्रसिद्ध करणाऱ्या, किंवा प्रसृत करणाऱ्या व्यक्तीला असे विधान, अफवा किंवा वृत्त खरे आहे असे मानण्यास वाजवी आधारकारणे असतील आणि ती व्यक्ती ते विधान, अफवा, किंवा वृत्त ८.(सद्भावपूर्वक आणि पूर्वोक्त असा कोणताही उद्देश नसताना) करील, प्रसिद्ध करील, किंवा प्रसृत करील तेव्हा ते कृत्य या कलमाच्या अर्थानुसार अपराध या सदरात जमा होणार नाही.
——–
१. १९८९ चा अधिनियम ४ – कलम ६ द्वारे मूळ कलमाऐवजी सामविष्ट करण्यात आले.
२. १९६९ चा अधिनियम ३५ – कलम ३ द्वारे मूळ कलम ५०५ याला त्या कलमाचे पोटकलम (१) असा नवीन क्रमांक देण्यात आला.
३. अनुकूलन आदेश १९५० द्वारे हर मॅजेस्टीच्या किंवा इम्पीरिअल सव्र्हिस ट्रूप्समधील या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आला. मॅजेस्टीच्या या शब्दानंतर असलेला किंवा रॉयल इंडियन मरीनमधील हा मजकूर १९३४ चा अधिनियम ३५ – कलम २ व अनुसूची यांद्वारे वगळण्यात आला होता.
४. १९२७ चा अधिनियम १० – कलम २ व अनुसूची यांद्वारे नौसेना या शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. १९२७ चा अधिनियम १० – कलम २ व अनुसूची यांद्वारे किंवा नौसैनिक याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. १९६१ चा अधिनियम ४१ – कलम ४ द्वारे दोन वर्ष या ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
७. १९६९ चा अधिनियम ३५ – कलम ३ द्वारे पोटकलमे (२) व (३) समाविष्ट करण्यात आले.
८. १९६९ चा अधिनियम ३५ – कलम ३ द्वारे समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply