Ipc कलम ४८७ : ज्याच्या आत माल आहे अशा कोणत्याही पात्रावर खोटे चिन्ह करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४८७ :
ज्याच्या आत माल आहे अशा कोणत्याही पात्रावर खोटे चिन्ह करणे :
(See section 350 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आतमध्ये माल असलेल्या कोणत्याही आवेष्टनावर किंवा पात्रावर, त्यात नसलेला माल इत्यादी त्यात आहे असा समज व्हावा या कपटी उद्देशाने खोटे चिन्ह करणे.
शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——–
ज्याच्या आत माल आहे असा कोणताही खोका, आवेष्टन किंवा अन्य पात्र यावर जो कोणी अशा रीतीने खोटे चिन्ह करील की; जेणेकरुन जो माल अशा पात्रात नाही तो त्यात आहे असा, किंवा जो माल त्याच्यात आहे तो त्यात नाही असा, किंवा अशा पात्रातील माल त्याचे खरे स्वरुप किंवा प्रत याहून वेगळ्या स्वरुपाचा व प्रतीचा आहे असा कोणत्याही लोकसेवकाचा किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा समज व्हावा असा वाजवी ठोकताळा बांधता येईल, त्याने लुबाडणूक करण्याच्या उद्देशाने आपण तसे वागलो नव्हतो असे शाबित केले नाही तर, त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply