भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४४५ :
घरफोडी (गृह-भेदन) :
(See section 330 of BNS 2023)
गृह-अतिक्रमण करणाऱ्या इसमाने यात यापुढे वर्णन केलेल्या सहा प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारे घरामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये आपला शिरकाव करुन घेतला, अथवा स्वत: अपराध करण्याच्या उद्देशाने घरामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये असून किंवा, त्यामध्ये अपराध केलेला असून, अशा सहा प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारे घर सोडून जाऊन गृह-अतिक्रमण केले तर, त्या इसमाने घरफोडी (गृह-भेदन) केली असे म्हटले जाते, ते सहा प्रकार पुढीलप्रमाणे :-
पहिला : गृह-अतिक्रमण करण्यासाठी जर तो, त्याने स्वत: किंवा गृह-अतिक्रमणाला अपप्रेरणा (चिथावणी) देणाऱ्या कोणत्याही इसमाने तयार केलेल्या मार्गाने प्रवेश करील किंवा निघून जाईल तर,
दुसरा : तो स्वत: किंवा अपराधाला अपप्रेरणा (चिथावणी) देणारा यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मनुष्यव्यक्तीने ज्या मार्गाने प्रवेश करावा असे अभिप्रेत नाही त्या मार्गाने, अथवा कोणत्याही भिंतीवर किंवा इमारतीवर शिडीने किंवा नुसते वर चढून त्याने जेथे प्रवेश मिळवलेला असेल, अशा कोणत्याही मार्गाने जर तो प्रवेश करील किंवा निघून जाईल तर.
तिसरा : गृह-अतिक्रमण करण्यासाठी किंवा जर तो, त्याने स्वत: किंवा गृह-अतिक्रमणाला अपप्रेरणा देणाऱ्या कोणत्याही इसमाने, एखादा मार्ग ज्या साधनांच्या साह्याने खुला करण्याचे घराच्या ताबाधारकाला अभिप्रेत नव्हते, अशा कोणत्याही साधनाच्या साह्याने खुल्या केलेल्या त्या मार्गाने प्रवेश करील किंवा निघून जाईल तर.
चौथा : गृह-अतिक्रमण करण्यासाठी किंवा गृह-अतिक्रमणानंतर घर सोडून जाण्यासाठी जर तो कोणतेही कुलूप उघडून प्रवेश करील किंवा निघून जाईल तर.
पाचवा : फौजदारीपात्र बलप्रयोग करुन किंवा हमला करुन किंवा कोणत्याही व्यक्तीला ठार करण्याची धमकी देऊन जर तो आपला शिरकाव करुन घेईल किंवा निर्गमन करील तर.
सहावा : जो कोणताही मार्ग, यातून प्रवेश किंवा निर्गमन होऊ नये म्हणून बंद करुन ठेवण्यात आलेला असल्याचे आणि त्याने स्वत: किंवा गृह-अतिक्रमणाला अपप्रेरणा (चिथावणी) देणाऱ्या व्यक्तीने तो उघडलेला असल्याचे तिला माहीत असेल त्या मार्गाने जर तो प्रवेश करील किंवा निघून जाईल तर.
स्पष्टीकरण :
घराच्या जोडीला ताब्यात असलेले आणि ज्याच्यामध्ये व अशा घरामध्ये थेट अंतर्गत संधान असेल असे कोणतेही उपगृह किंवा इमारत ही या कलमाच्या अर्थानुसार घराचा भाग असते.
उदाहरणे :
क) (य) च्या घराच्या भिंतीला भोक पाडून व त्या भोकातून आपला हात आत घालून (क) गृह-अतिक्रमण करतो. ही घरफोडी आहे.
ख) नौतलांमधील पोटहोलमधून जलयानावर हळूच शिरकाव करुन (क) गृह-अतिक्रमण करतो. ही घरफोडी आहे.
ग) खिडकीमधून (य) च्या घरामध्ये प्रवेश करुन (क) गृह-अतिक्रमण करतो. ही घरफोडी आहे.
घ) बंद करण्यात आलेले दार उघडून त्या दारामधून (य) च्या घरात प्रवेश करुन (क) गृह-अतिक्रमण करतो. ही घरफोडी आहे.
ङ) दारामधील छिद्रातून तार आत घालून तिच्या साहाय्याने कडी उचलून त्या दारातून (य) च्या घरात प्रवेश करुन (क) गृह-अतिक्रमण करतो. ही घरफोडी आहे.
च) (य) च्या घराच्या दाराची किल्ली (य) कडून हरवली, ती (क) ला सापडते आणि त्या किल्लीने दार उघडल्यानंतर (य) च्या घरात शिरुन (क) गृह-अतिक्रमण करतो. ही घरफोडी आहे.
छ) (य) त्याच्या दारात उभा आहे. (य) ला खाली पाडून (क) जबरदस्तीने वाट करुन घेतो आणि घरात प्रवेश करुन गृह-अतिक्रमण करतो. ही घरफोडी आहे.
ज) (य) चा द्वाररक्षक (म) हा (य) च्या दारात उभा आहे. (क) हा (म) ला मारहाण करण्याची धमकी देऊन आपणास प्रतिकार करण्यापासून त्याला परावृत्त करतो व घरात प्रवेश करुन गृह-अतिक्रमण करतो. ही घरफोडी आहे.