भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३८२ :
चोरी करण्यासाठी मृत्यू, दुखापत किंवा निरोध घडवून आणण्याची पूर्वतयारी करून चोरी करणे :
(See section 307 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चोरी – अशी चोरी करण्याच्या किंवा ती केल्यानंतर काढता पाय घेण्याच्या किंवा तीतून मिळवलेली मालमत्ता ठेवून घेण्याच्या प्रयोजनार्थ मृत्यू किंवा दुखापत किंवा निषेध घडवून आणण्याची अथवा मृत्यूची, दुखापतीची किंवा निरोधाची भीती उत्पन्न करण्याची पूर्वतयारी करुन चोरी करणे.
शिक्षा :१० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जी कोणी चोरी करण्यासाठी किंवा अशी चोरी केल्यानंतर पळून जाणे सुकर व्हावे यासाठी, किंवा अशा चोरीमध्ये चोरलेली मालमत्ता ठेवून घेण्यासाठी, कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत मृत्यू किंवा दुखापत किंवा निरोध घडवून आणण्याची अथवा मृत्यूचे, दुखापतीचे अथवा निरोधाचे भय निर्माण करण्याची पूर्वतयारी करून चोरी करील त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
उदाहरणे :
क) (क) हा (य) च्या कब्जातील मालमत्तेची चोरी करतो, आणि, ही चोरी करताना, (य) ने प्रतिकार केल्यास त्याला दुखापत करावी यासाठी एक भरलेले पिस्तूल घेऊन ते तो आपल्या अंगरख्याआड ठेवतो. (क) ने या कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराध केलेला आहे.
ख) (क) हा (य) चा खिसा कापतो त्यावेळी, काय चालले आहे ते कळून (य) ने प्रतिकार केला किंवा (क) ला पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याला अडवता यावे म्हणून (य) ने आपले अनेक साथीदार आपल्या आसपास उभे केले होते. (क) ने या कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराध केलेला आहे.