भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३६१:
कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन करणे :
(See section 137 of BNS 2023)
जी अज्ञान व्यक्ती पुरुष असल्यास १.(सोळा) वर्षे वयाखालील असेल किंवा ती स्त्री असल्यास २.(अठरा) वर्षे वयाखालील असेल तिला अथवा कोणत्याही मनोविकल व्यक्तीला जो कोणी अशा अज्ञान व्यक्तीच्या किंवा मनोविकल व्यक्तीच्या कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अशा पालकाच्या संमतीवाचून घेऊन जाईल किंवा भूरळ पाडून नेईल तो अशा अज्ञान किंवा मनोविकल व्यक्तीचे कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन करतो असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण :
या कलमातील कायदेशीर पालक या शब्दप्रयोगात, जिच्याकडे अशा अज्ञान व्यक्तीची किंवा अन्य व्यक्तीची देखभाल किंवा अभिरक्षा आहे अशा कोणत्याही व्यक्तीचा समावेश होतो.
अपवाद :
जी कोणतीही व्यक्ती आपण एखाद्या अनौरस बालकाचा पिता असल्याचे सद्भावपूर्वक समजत असेल किंवा अशा बालकाच्या कायदेशीर अभिरक्षेला आपण हक्कदार असल्याचे सद्भावनापूर्वक समजत असेल तिने केलेली कोणतीही कृती जर अनैतिक व अवैध प्रयोजनार्थ करण्यात आलेली नसेल, तर अशा कृतीला हे कलम लागू होत नाही.
——-
१. १९४९ चा अधिनियम ४२ – कलम २ द्वारे चौदा याऐवजी समाविष्ट केले.
२. १९४९ चा अधिनियम ४२ – कलम २ द्वारे सोळा याऐवजी समाविष्ट केले.