भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३५२:
गंभीर प्रक्षोभकारण नसताना एरवी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करण्याबद्दल शिक्षा :
(See section 131 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : गंभीर प्रक्षोभकारण नसताना एरवी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग.
शिक्षा :३ महिन्यांचा कारावास व ५०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : जिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग केली ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
एखाद्या व्यक्तीकडून गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारण घडले नसताना एरवी, जो कोणी तिच्यावर हमला किंवा फौजदारी बलप्रयोग करील त्याला, तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा पाचशे रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
स्पष्टीकरण :
प्रक्षोभकारण हे अपराध्याने अपराधासाठी निमित्त म्हणून शोधलेले किंवा इच्छापूर्वक उकरुन काढलेले असेल तर, किंवा
कायद्याचे पालन म्हणून केलेल्या किवा एखाद्या लोकसेवकाने असा लोकसेवक म्हणून आपल्या अधिकाराचा कायदेशीर वापर करुन केलेल्या गोष्टीमुळे प्रक्षोभन झालेले असेल तर, किंवा
खाजगीरीत्या बचाव करण्याच्या हक्काचा कायदेशीर वापर करताना केलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे प्रक्षोभन झालेले असेल तर,
गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारणामुळे या कलमाखालील अपराधाची शिक्षा सौम्य होणार नाही.
प्रक्षोभकारण हे अपराध सौम्य ठरवण्याइतपत गंभीर व आकस्मिक होते किंवा कसे हा तथ्यविषयक प्रश्न आहे.