Ipc कलम २९२ : १.(अश्लील पुस्तके इत्यादींची विक्री वगैरे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २९२ :
१.(अश्लील पुस्तके इत्यादींची विक्री वगैरे :
(See section 294 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अश्लील पुस्तके, इत्यादींची विक्री इत्यादी.
शिक्षा :पहिल्या दोषसिद्धीअन्ती दोन वर्षाचा कारावास, व २००० रुपये द्रव्यदंड, आणि दुसरी किंवा त्यानंतर दोषसिद्धी झाल्यास पाच वर्षांचा कारावास व ५००० रुपये द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
२.(१)पोटकलम (२)च्या प्रयोजनार्थ (कारणाकरिता) जर एखादे पुस्तक, पत्रक, कागद, लिखाण, रेखन, रंगचित्र, प्रतिरूपण, आकृती किंवा अन्य कोणतीही वस्तू कामुक असेल, अथवा विषयलोलुपतेला आवाहन करत असेल अथवा सर्व संबध्द परिस्थिती पाहता, ज्या व्यक्ती त्यात अंतर्भूत (समाविष्ट) असलेले किंवा साकारलेले साहित्य वाचण्याचा, पाहण्याचा, किंवा ऐकण्याचा संभव आहे त्यांना नीतिभ्रष्ट करण्यास किंवा बिघडवण्यास पुरेसे आहे; तसेच त्याला एकत्रित परिणाम (ज्यामध्ये दोन किंवा अधिक बाबींचा समावेश त्याबाबतीत) त्यांपैकी कोणत्याही बाबीचा परिणाम नीतिभ्रष्ट किंवा बिघडवण्यास होत असेल, तर ते अश्लील अगर बीभत्स मानले जाईल.)
२.(२))जो कोणी –
अ)कोणतेही अश्लील पुस्तक, पत्रक, कागद, लिखाण, रेखन, रंगचित्र, प्रतिरूपण किंवा आकृती किंवा अन्य कोणतीही अश्लील वस्तू विकेल, भाडयाने देईल, वितरीत करील, जाहीरपणे प्रदर्शित करील किंवा कोणत्याही रीतीने प्रसृत करील, अथवा विक्री, भाड्याने देणे, वितरण, जाहीर प्रदर्शन किंवा प्रसारण या प्रयोजनाकरता ती बनवील, निर्मिल किंवा आपल्या कब्जात बाळगील, अथवा
ब) कोणतीही अश्लील वस्तू पूर्वोक्त (वरील नमूद) कोणत्याही प्रयोजनाकरता (कारणांकरीता) अशी वस्तू विकली जाईल, भाड्याने दिली जाईल, वितरित केली जाईल किंवा जाहीरपणे प्रदर्शित केली जाईल किंवा कोणत्याही रीतीने प्रसृत केली जाईल याची जाणीव असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना आयात करील, निर्यात करील किंवा तिची ने-आण करील, अथवा
क) ज्या धंद्याच्या ओघात अशा कोणत्याही अश्लील वस्तू पूवोक्त (वरील नमूद) प्रयोजनाकरता (कारणांकरिता) बनवल्या जातात, निर्मिल्या जातात, खरीदल्या जातात, ठेवल्या जातात, आयात केल्या जातात, निर्यात केल्या जातात किंवा त्यांची ने-आण केली जाते, त्या जाहीरपणे प्रदर्शित केल्या जातात किंवा कोणत्याही रीतीने प्रसृत केल्या जातात हे स्वत:ला माहीत आहे किंवा तसे समजण्यास कारण आहे त्या धंद्यात भाग घेईल किंवा त्यातून नफा मिळवील, अथवा
ड) या कलमाखाली अपराध असलेली कोणतीही कृती करण्यामध्ये एखादी व्यक्ती गुंतलेली आहे, किंवा गुंतण्यास तयार आहे अगर अशी कोणतीही अश्लील वस्तू एखाद्या व्यक्तीकडून किंवा तिच्यामार्फत पैदा (निर्माण) करता येते अशी जाहिरात करील किंवा कोणत्याही साधनाद्वारे जाहीर (विहित) करील, अथवा
इ) या कलमाखाली अपराध असलेली कोणतीही कृती करण्याची तयारी दर्शवील, किंवा करण्याचा प्रयत्न करील,
त्याला ३.(पहिला दोषसिद्धीअन्ती (अपराध शाबीत झाल्यास) दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा दोन हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, आणि जर दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर दोषसिद्धी (शिक्षा झाल्यास) पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा पाच हचार रुपयांपर्यंच असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.)
४.(अपवाद :
अ) जे कोणतेही पुस्तक, पत्रक, लिखाण, कागद, रेखन, रंगचित्र, प्रतिरुपण किंवा आकृती-
एक) शास्त्र, वाड्मय, कला, विद्या किंवा सर्वसाधारण स्वारस्याचे अन्य विषय यांना उपकारक आहे याकारणावरुन असे पुस्तक, पत्रक, कागद, लिखाण, रेखन, रंगचित्र, प्रतिरुपण किंवा आकृती त्यांचे प्रकाशन लोकहितार्थ म्हणून समर्थनीय असल्याचे शाबीत केले जाते ती, किंवा
दोन)धार्मिक प्रयोजनाकरिता सद्भावपूर्वक ठेवली जाते ती किंवा वापरली जाते ती वस्तू;
ब)प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वतीय स्थळे
एक)प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष अधिनियम १९५८ (१९५८ चा २४) यातील अर्थानुसार जे कोणतेही प्राचीन स्मारक असेल, किंवा
दोन)कोणतेही मंदिर किंवा मूर्तींची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी अगर कोणत्याही धार्मिक प्रयोजनासाठी (कारणांसाठी) ठेवलेली किंवा वापरली जाणारी कोणतीही गाडी,
यावरील किंवा यामधील शिल्पात, कोरीव किंवा रंगचित्रीत किंवा प्रतिरुपित असे कोणतेही प्रतिरुपण यास हे कलम लागू होत नाही.)
——–
१. १९२५ चा अधिनियम ८ – कलम २ द्वारे मूळ कलमाऐवजी हे कलम दाखल करण्यात आले.
२. १९६९ चा अधिनियम ३६ – कलम २ द्वारे हे पोटलकम समाविष्ट करण्यात आले. व मूळ कलम २९२ याला त्याकलमाचे पोटलकम (२) असा नवीन क्रमांक देण्यात आला.
३. १९६९ चा अधिनियम ३६ – कलम २ द्वारे विवक्षित शब्दांऐवजी हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
४. १९६९ चा अधिनियम ३६ – कलम २ द्वारे मूळ अपवादाऐवजी हा अपवाद समाविष्ट करण्यात आला.

Leave a Reply