Ipc कलम २१६ : हवालतीमधून पळालेल्या किंवा ज्याच्या गिरफदारीचा (अटकेचा) आदेश देण्यात आला आहे अशा अपराध्यास आसरा देणे:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २१६ :
हवालतीमधून पळालेल्या किंवा ज्याच्या गिरफदारीचा (अटकेचा) आदेश देण्यात आला आहे अशा अपराध्यास आसरा देणे:
(See section 253 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : हवालतीतून पळालेल्या किंवा ज्याचा गिरफदारीचा आदेश देण्यात आला आहे अशा अपराध्याला आसरा देणे – अपराध देहांतदंड्य असल्यास.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
अपराध : आजीवन कारावासाच्या किंवा १० वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास, द्रव्यदंडासह किंवा त्याविना .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
अपराध : १० वर्षाच्या नव्हे, तर १ वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास.
शिक्षा :अपराधासाठी उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या एक चतुर्थांशाइतका कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
जेव्हा केव्हा एखाद्या अपराधाबद्दल सिद्धदोष (शिक्षा झालेली) ठरलेली किंवा त्याचा दोषारोप असलेली कोणतीही व्यक्ती त्या अपराधाबद्दल कायदेशीर हवालतीत असता अशा हवालतीतून पळून गेली असेल, किंवा जेव्हा केव्हा एखाद्या लोकसेवकाने अशा लोक सेवकाच्या कायदेशीर अधिकारांचा वापर करुन, एखाद्या अपराधाबद्दल एखाद्या विवक्षित व्यक्तीस गिरफदार (अटक) करण्याचा आदेश दिला असेल तेव्हा, अशा पलायनाची अगर गिरफदारीच्या (अटकेच्या) आदेशाची माहिती असून जो कोणी ती व्यक्ती गिरफदार (अटक) होऊ नये या उद्देशाने तिला आसरा देईल किंवा लपवील त्याला पुढीलप्रमाणे शिक्षा होईल. म्हणजे-
अपराध देहांतदंड्य असल्यास :
ज्या अपराधाबद्दल ती व्यक्ती हवालतीत होती किंवा तिला गिरफदार करण्याचा आदेश देण्यात आला तो अपराध मृत्यूच्या शिक्षेस पात्र असेल, तर सात वर्षेपर्यंत तो असू शकेल, इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल;
अपराध आजीवन कारावासाच्या, किंवा कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास :
तो अपराध १.(आजन्म कारावासाच्या) किंवा दहा वर्षांच्या कारावासास पात्र असेल, तर तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा द्रव्यदंडासहित किंवा त्याविना, होइल;
आणि तो अपराध एक वर्षापर्यंत असू शकेल पण दहा वर्षेपर्यंत नव्हे, इतक्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल, तर त्या अपराधासाठी उपबंधित (दर्शविलेल्या) सर्वाधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेच्या एकचतुर्थांशइतकी त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
२.(या कलमातील अपराध या शब्दात जी कोणतीही कृती किंवा अकृती ३.(भारताबाहेर) केल्याबद्दल एखादी व्यक्ती दोषी असल्याचे अभिकथन करण्यात आले असून, ती ३.(भारतात) केली असती तर, ती अपराध म्हणून शिक्षापात्र होण्यासारखी असेल, तर आणि ज्यासाठी प्रत्यर्पणासंबंधीच्या (अपराधी धरून स्वाधीन करणे) कोणत्याही कायद्याखाली ४.(***) अगर एरव्ही ती व्यक्ती त्याबद्दल ३.(भारतात) गिरफदार (अटक) होण्यास किंवा हवालतीत स्थानबध्द होण्यास पात्र असेल तर, अशी कृती किंवा अकृती देखील त्यात समाविष्ट आहे आणि अशी प्रत्येक कृती किंवा अकृती या कलमाच्या प्रयोजनार्थ आरोपी व्यक्ती जणू काही ती ३.(भारतात) केल्याबद्दल दोषी असावी त्याप्रमाणे शिक्षेस पात्र असल्याचे मानण्यात येईल.)
अपवाद :
ज्या बाबतीत गिरफदार (अटक) करावयाच्या व्यक्तीचा पती अगर पत्नी यांनी आसरा दिलेला असेल किंवा लपविलेले असेल, त्या बाबतीत, हा उपबंध (तरतूद) लागू होत नाही.
——–
१. १९५६ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप / काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १८८६ चा अधिनियम २६ – कलम २३ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
३. अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे किंवा पलायित अपराध अधिनियम १८८१ याद्वारे हा मजकूर वगळण्यात आला.

Leave a Reply