भारतीय दंड संहिता १८६०
कलम १३० :
अशा कैद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा अवैधपणे (बेकायदेशीरपणे) सोडवणे किंवा आसरा देणे:
(See section 158 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अशा कैद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा अवैधपणे सोडवणे किंवा आसरा देणे, अथवा अशा कैद्याला पुन्हा गिरफ्तार करण्यास प्रतिकार करणे.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा करावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय
———————
जो कोणी जाणीवपूर्वक कोणत्याही राजकैद्याला किंवा युध्दकैद्याला कायदेशीर हवालतीमधून पळून जाण्यास मदत करील किंवा सहाय्य देईल, अथवा अशा कोणत्याही कैद्याला अवैधपणे सोडवील, किंवा सोडवण्याचा प्रयत्न करील, अथवा कायदेशीर हवालतीमधून पळालेल्या अशा कोणत्याही कैद्यास आसरा देईल किंवा लपवील, अथवा असा कैदी पुन्हा गिरफदार होत असता त्यास प्रतिकार करील, किंवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करील तर त्यास, १.(आजन्म कारावासाची), किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
ज्याला २.(भारतात) विवक्षित सीमांच्या आत मुक्त संचारासाठी पॅरोलवर परवानगी देण्यात आली आहे, तो राजकैदी अगर युध्दकैदी जर त्याला ज्या सीमांच्या आत मुक्त संचाराची मुभा आहे त्यांच्या पलीकडे गेला तर, तो कायदेशीर हवालतीतून पळाला असे म्हटले जाते.
———–
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी दाखल करण्यात आले.
२. अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे किंवा ब्रिटिश इंडियात याऐवजी समाविष्ट करण्यात आले.