भारतीय दंड संहिता १८६०
कलम १२४-अ :
१.(प्रजाक्षोभन (राजद्रोह):
(See section 152 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : प्रजाक्षोभन (राजद्रोह)
शिक्षा :आजीवन कारावास व द्रव्यदंड, किंवा ३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड किंवा द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय
——————-
जो कोणी २.(***) ३.(भारतामध्ये) ४.(***) विधित: (कायदेशीर) स्थापन झालेल्या शासनाबद्दल एकतर तोंडी किंवा लेखी शब्दांद्वारे अथवा खुणांद्वारे अथवा दृश्य प्रतिरुपणाद्वारे अथवा अन्य प्रकारे द्वेषाची किंवा तुच्छतेची भावना निर्माण करतो किंवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो अथवा अप्रीतीची भावना चेतवितो किंवा प्रयत्न करतो त्याला ५.(आजन्म कारावासाची) शिक्षा होईल व तिच्या जोडीला द्रव्यदंड लादता येईल किंवा तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा होईल त्याचप्रमाणे तिच्या जोडीला द्रव्यदंड लादता येईल अथवा नुसती द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
स्पष्टीकरण १ :
अप्रीती या शब्दप्रयोगात द्रोहभावनेचा व शत्रुत्वाच्या भावनांचा समावेश आहे.
स्पष्टीकरण २:
शासनाच्या उपाययोजनांमध्ये कायदेशीर मार्गांनी फेरबदल घडवून आणण्याच्या दृष्टीने, द्वेषाची, तुच्छतेची किंवा अप्रीतीची भावना न चेतवता किंवा तसा प्रयत्न न करता त्यांच्याबद्दल नापसंती व्यक्त करण्यासाठी केलेली टीका या कलमाखाली अपराध ठरत नाही.
स्पष्टीकरण ३:
द्वेषाची, तुच्छतेची, किंवा अप्रीतीची भावना न चेतवता किंवा चेतवण्याचा प्रयत्न न करता शासनाच्या प्रशासकीय किंवा अन्य कारवाईबद्दल नापसंती व्यक्त करण्यासाठी केलेली टीका या कलमाखाली अपराध ठरत नाही.)
———-
१. १८९८ चा अधिनियम ४ – कलम ४ द्वारे मूळ कलम १२४ अ ऐवजी हे दाखल करण्यात आले हे मूळ कलम १२४ अ १८७० चा अधिनियम २७ – कलम ५ द्वारे समाविष्ट करण्यात आले होते.
२. अनुकूलन आदेश १९५० द्वारे हर मॅजेस्टीबद्दल किंवा हे शब्द वगळण्यात आले. अनुकूलन आदेश १९३७ द्वारे मॅजेस्टीबद्दल यांनतर समाविष्ट करण्यात आलेले किंवा क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह बद्दल हे शब्द अनुकूलन आदेश १९४८ द्वारे वगळण्यात आले होते.
३. अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे किंवा ब्रिटिश इंडियात याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. अनुकूलन आदेश १९३७ द्वारे घातलेले किंवा ब्रिटिशमध्ये हे शब्द अनुकूलन आदेश १९४८ द्वारे वगळण्यात आले.
५. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळ्या पाण्याची किंवा कोणत्याही कमी मुदतीच्या काळ्या पाण्याची याऐवजी समाविष्ट करण्यात आले.