भारतीय दंड संहिता १८६०
कलम ७ :
एकदा स्पष्टीकरण केलेल्य शब्दप्रयोगाचा अर्थ (एकदा समजवलेला अभिव्यक्ति किंवा पदाचा भाव) :
या संहितेच्या कोणत्याही भागात (कलमात) स्पष्टीकरण केलेला प्रत्येक शब्दप्रयोग जरी पुन्हा इतरत्र कलमात आला तरी तोच समजून योजलेला आहे.
कलम ८ :
लिंग :
(See section 2(10) of BNS 2023)
तो हे सर्वनाम व त्याचे साधित शब्द कोणत्याही व्यक्तीबद्दल मग ती पुरुष असो वा स्त्री संदर्भात वापरण्यात आले आहेत असे समजावे.
कलम ९ :
वचन :
(See section 2(22) of BNS 2023)
संदर्भावरुन विरुद्ध दिसून येत नसेल तर एकवचनार्थी शब्दांमध्ये अनेकवचनाचा समावेश आहे व अनेकवचनार्थी शब्दांमध्ये एकवचनाचा समावेश आहे.
कलम १० :
पुरुष-स्त्री :
(See section 2(19) and 2 (35) of BNS 2023)
पुरुष हा शब्द कोणत्याही वयाचा पुरुष जातीचा मनुष्यप्राणी दर्शवितो. स्त्री हा शब्द कोणत्याही वयाचा स्त्री जातीचा मनुष्यप्राणी दर्शवितो.
कलम ११ :
व्यक्ती (इसम) :
(See section 2(26) of BNS 2023)
व्यक्ति / इसम या शब्दामध्ये कोणत्याही कंपनीचा किंवा संघाचा अगर व्यक्ति निकायाचा (मनुष्याचा जमाव) मग तो सनदी (निगमित) असो अगर नसो समावेश आहे.
कलम १२ :
जनता (लोक) :
(See section 2(27) of BNS 2023)
या शब्दात कोणताही लोकवर्ग किंवा कोणताही जनसमाज याचा समावेश आहे.
कलम १३ :
राणी याची व्याख्या :
(विधि अनुकूलन आदेश, १९५० द्वारा निरसित.)
कलम १४ :
१.(शासनाचा (सरकार) सेवक :
(See section 2(28) of BNS 2023)
याचा अर्थ शासनाने किंवा त्याच्या अधिकारान्वये भारतात चालू ठेवलेला / नियुक्त केलेला, अगर कामावर ठेवलेला कोणताही अधिकारी अगर सेवक होय.)
———-
१. विधि अनुकूलन आदेश १९५० द्वारे मूळ कलमाऐवजी घातले.
कलम १५ :
ब्रिटिश इंडिया :
याची व्याख्या १९३७ च्या आदेशान्वये रद्द केली आहे.
कलम १६ :
भारत सरकार :
याची व्याख्या सन १९३७ च्या आदेशान्वये रद्द केली आहे.
कलम १८ :
१.(भारत :
भारत याचा अर्थ जम्मू व काश्मीय राज्य खेरीज करुन भारताचे राज्यक्षेत्र होय.)
———
१. १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे हे कलम अनुकूलन आदेश १९५० द्वारे समाविष्ट करण्यात आलेल्या पुर्वीच्या कलमाऐवजी घातले. मूळ कलम १८ हे अनुकूलन आदेश १९३७ द्वारे निरसित केले होते.
कलम १९ :
न्यायाधीश :
(See section 2(16) of BNS 2023)
न्यायाधीश हा शब्द, न्यायाधीश म्हणून अधिकृतपणे नामनियुक्त केलेली व्यक्तीच केवळ नव्हे, तर याशिवाय जी जी व्यक्ती दिवाणी अगर फौजदारी अशा कोणत्याही कायदेशीर निर्णायक न्यायनिर्णय देऊ शकते, अगर त्यावर जर अपील केले गेले नाही, तर तो निर्णय निर्णायक होऊ शकेल असा न्यायनिर्णय किंवा जो एखाद्या अधिकाऱ्याने कायम केला तर निर्णायक होऊ शकेल असा पद्धतीने न्यायनिर्णय देण्यास कायदेशीर अधिकार असलेली व्यक्ती होय किंवा
असा न्यायनिर्णय देण्यास ज्या व्यक्तिनिकायाला विधित: अधिकार प्राप्त झालेला असेल त्या व्यक्ति निकायापैकी एक आहे अशी प्रत्येक व्यक्तीदेखील दर्शवतो.
उदाहरणे :
क) १८५९ चा अधिनियम १० याखालील दाव्यामध्ये अधिकारिता वापरणारा जिल्हाधिकारी हा न्यायाधीश होय.
ख) ज्या आरोपाबद्दल द्रव्यदंडाची किंवा कारावासाचची शिक्षा-मग त्यावर अपील होत असो वा नसो देण्याचा अधिकार आपणास आहे त्या आरोपाच्या संबंधात अधिकारिता वापरणारा दंडाधिकारी हा न्यायाधीश होय.
ग) १.(मद्रास विधि संहितेतील १८१६) चा विनिमय ७ वा याखालील दाव्यांची संपरीक्षा व निर्णय करण्याचा अधिकार असलेला पंचायतीचा सदस्य हा न्यायाधीश होय.
घ) ज्या आरोपाचे प्रकरण दुसऱ्या न्यायालयाकडे संपरीक्षार्थ पाठवण्याचाच केवळ अधिकार आपणांस आहे त्या आरोपाच्या संबंधात अधिकारिता वापरणारा अधिकारी हा न्यायाधीश नव्हे.
———-
१. मद्रास दिवाणी न्यायालये अधिनियम १८७३ (१८७३ चा ३) याद्वारे निरसित.
कलम २० :
न्यायालय :
(See section 2(5) of BNS 2023)
याचा अर्थ कायद्याप्रमाणे ज्याला न्यायिक काम करता येते तो अगर न्यायाधीशांच्या ज्या मंडळीला एकत्र बसून (एकापेक्षा अधिक) न्यायिक काम, कायद्याप्रमाणे करता येते तो न्यायाधीश अगर न्यायाधीशांचा संघ-मंडळी न्यायालय होय.
उदाहरण :
१.(मद्रास विधि संहितेतील १८१६) चा विनियम ७ या खाली काम करणारी व दाव्यांची संपरीक्षा आणि निर्णय करण्याचा अधिकार असलेली पंचायत ही न्यायालय होय.
———-
१. मद्रास दिवाणी न्यायालये अधिनियम १८७३ (१८७३ चा ३) याद्वारे निरसित.
कलम २१ :
लोकसेवक :
(See section 2(28) of BNS 2023)
लोकसेवक या शब्दात यापुढे दिलेल्या कोणत्याही वर्णनात मोडणारी व्यक्ती दर्शवतो, ते असे:
१.(***)
(दुसरे) – २.(भारताच्या) भूसेना, ३.(नौसेना किंवा वायुसेना) मधील प्रत्येक राजादिष्ट-सनदी अधिकारी.
४.(तिसरे) – प्रत्येक न्यायाधीश स्वतंत्रपणे अगर संघाने त्याचा सदस्य म्हणून न्यायदानाचे किंवा अभिनिर्णयाचे काम करण्याचा अधिकार असलेली कोणतीही व्यक्ती.)
(चवथे) – न्यायालयाचा प्रत्येक अधिकारी ५.(यांत लिक्विडेटर – रिसिव्हर – कमिशनर पण येतात) जे कायदेविषयक किंवा इतर बाबींचे अन्वेषण करणे किंवा शोध घेणे किंवा त्यावर अहवाल देणे अथवा कोणताही दस्तऐवज तयार करणे, जपून ठेवणे किंवा अधिप्रमाणित करणे; ्अथवा कोणतीही मालमत्ता ताब्यात घेणे अगर विल्हेवाट लावणे, अथवा न्यायिक आदेशिकेची अंमलबजावणी करणे, अथवा कोणतीही शपथ देवविणे, अथवा भाषांतर करुन सांगणे अथवा न्यायालयात सुव्यवस्था राखणे अशी ज्यांची कर्तव्ये आहेत असे न्यायालयाचे प्रत्येक अधिकारी येतात; आणि न्यायालयाने अशी कोणतीही कर्तव्ये पार पाडण्यासाठी खास अधिकार किंवा प्राधिकृत केलेली प्रत्येक व्यक्ती;
(पाचवे) न्यायालयाला किंवा लोकसेवकाला सहाय्य करणारा प्रत्येक ज्यूरी सदस्य, न्याय सहायक किंवा पंचायतीचा सदस्य.
(सहावे) कोणत्याही न्यायालयाने किंवा अन्य कोणत्याही सक्षम लोकप्रधिकरणाने ज्याच्याकडे कोणताही कब्जा किंवा खटला – प्रकरण, किंवा बाब निर्णयासाठी अगर अहवालासाठी दिलेली असेल असा प्रत्येक लवाद किंवा ती अन्य व्यक्ती.
(सातवे) ज्या पदाच्या योगे कोणत्याही व्यक्तीस स्थानबद्ध करण्याचा किंवा स्थानबद्धतेत ठेवण्याचा अधिकार आपणांस प्राप्त होतो असे पद धारण करणारी प्रत्येक व्यक्ती.
(आठवे) ६.(शासनाचा) अधिकारी या नात्याने अपराधांना प्रतिबंध करणे, अपराधांची खबर देणे, अपराध्यांना न्यायासनासमोर आणणे, अथवा सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता किंवा सोय यांचे रक्षण करणे हे ज्यांचे कर्तव्य असेल असा ६.(शासनाचा) प्रत्येक अधिकारी;
(नववे) एक अधिकारी या नात्याने ७.(शासनाच्या) वतीने कोणतीही मालमत्ता ताब्यात घेणे, स्वीकारणे, ठेवणे किंवा खर्च करणे, अथवा ७.(शासनाच्या) वतीने कोणतेही सर्वेक्षण किंवा (निर्धारण)मोजमाप किंवा (संविदा) करार करणे, अथवा महसूल आदेशिकेची अंमलबजावणी करणे, अथवा ७.(शासनाच्या) आर्थिक हितसंबंधावर परिणाम करणाऱ्या बाबींचे अन्वेषण करणे किंवा शोध घेणे किंवा त्यावर अहवाल सादर करणे, अथवा ७.(शासनाच्या) आर्थिक हितसंबंधाशी संबंधित असा कोणताही दस्तऐवज तयार करणे, अधिप्रमाणित करणे किंवा जपून ठेवणे, अथवा ७.(शासनाच्या) ८.(***) आर्थिक हितसंबंधाच्या रक्षणाबाबतच्या कोणत्याही कायद्याच्या भंगास प्रतिबंध करणे हे ज्यांचे कर्तव्य आहे असा प्रत्येक अधिकारी;
(दहावे) एक अधिकारी या नात्याने कोणत्याही गावाच्या, नगराच्या किंवा जिल्ह्याच्या कोणत्याही धार्मिकेतर सामाजिक प्रयोजनासाठी कोणतीही मालमत्ता ताब्यात घेणे, स्वीकारणे, ठेवणे किंवा खर्च करणे, कोणतेही सर्वेक्षण किंवा निर्धारण करणे, कोणतीही पट्टी किंवा कर वसूल करणे अथवा कोणत्याही गावातील, नगरातील किंवा जिल्ह्यातील लोकांचे हक्क विनिश्चित करण्यासाठी कोणताही दस्तऐवज तयार करणे, अधिप्रमाणित करणे किंवा जपून ठेवणे हे ज्याचे कर्तव्य असेल असा प्रत्येक अधिकारी;
९.(अकरावे) ज्या पदाच्या योगे मतदार यादी तयार करणे, प्रकाशित करणे, राखणे, सुधारणा करणे, तसेच निवडणूक प्रक्रिया किंवा त्याचा काही भाग सूरु करण्याचा अधिकार असलेली प्रत्येक व्यक्ती.
१०.(बारावे)(अ) शासनाच्या सेवेत असलेली किंवा शासनाकडून वेतन मिळणारी अथवा एखादे सार्वजनिक काम करण्याबद्दल शासनाकडून फीच्या किंवा कमिशनच्या रुपात रक्कम मिळणारी प्रत्येक व्यक्ती.
(ब) स्थानिक प्राधिकरणाच्या अथवा केंद्रिय, प्रांतिक किंवा राज्याच्या कायद्यानुसार किंवा त्याखाली स्थापन केलेल्या महामंडळाच्या अथवा कंपनी अधिनियम १९५६ (१९५६ चा १) च्या कलम ६१७ मध्ये केलेल्या व्याख्येप्रमाणे शासकीय कंपनीच्या सेवेत असलेली किंवा त्यांच्या कडून वेतन मिळणारी प्रत्येक व्यक्ती.)
उदाहरण :
नगरपालिका आयुक्त हा लोकसेवक आहे.
स्पष्टीकरण १ :
कलम २१ मध्ये कोणत्याही वर्णनात मोडणाऱ्या व्यक्ति लोकसेवक असतात मग त्या शासनाने नियुक्त केलेल्या असोत वा नसोत.
स्पष्टीकरण २ :
लोकसेवक हा शब्द जेथे जेथे आलेला आहे तेथे तेथे तो लोकसेवकाचे पद प्रत्यक्षात धारण करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अनुलक्षून असल्याचे समजण्यात येईल मग ते पद धारण करण्याच्या तिच्या हक्कात काहीही कायदेविषयक उणीव असली तरी बाधा येणार नाही.
११.(स्पष्टीकरण ३ :
निवडणूक हा शब्द ज्या प्राधिकरणाबाबत निवडीची पद्धत ही कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली निवडणुकीच्या स्वरुपात विहित केलेली असते अशा कोणत्याही वैधानिक, नगरपालिकीय किंवा इतर लोक प्राधिकरणाच्या मग त्याचे स्वरुप कोणतेही असो सदस्यांची निवड करण्याच्या प्रयोजनार्थ घ्यावयाची निवडणू दर्शवतो.
१२.(***)
———
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारा पहिला खंड वगळला.
२. क्रमश: अनुकूलन आदेश १९३७, अनुकूलन आदेश १९४८ आणि अनुकूलन आदेश १९५० यांद्वारे भारत सरकारच्या किंवा कोणत्याही शासनाच्या सेवेत असलेला क्वीनच्या हा मजकूर वरील प्रमाणे विशोधित करण्यात आला.
३. १९२७ चा अधिनियम १० – कलम २ व अनुसूची १ यांद्वारे किंवा नौसेनेतील या शब्दांऐवजी घातले.
४. १९६४ चा अधिनियम ४० – कलम २ द्वारे पूर्वीच्या खंडाऐवजी घातला.
५. १९६४ चा अधिनियम ४० – कलम २ द्वारे घातले.
६. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्राऊन याऐवजी हा शब्द उल्लेख घातला. अनुकूलन आदेश १९३७ द्वारे सरकार याऐवजी क्राऊन हा शब्द उल्लेख घातला होता.
७. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्राऊन याऐवजी हा शब्द उल्लेख घातला. अनुकूलन आदेश १९३७ द्वारे सरकार याऐवजी क्राऊन हा शब्द उल्लेख घातला होता.
८. १९६४ चा अधिनियम ४० – कलम २ द्वारे विवक्षित शब्द गाळले.
९. १९२० चा अधिनियम ३९ – कलम २ द्वारे घातले.
१०. १९६४ चा अधिनियम ४० – कलम २ द्वारे पूर्वीच्या खंडाऐवजी घातले.
११. १९२० चा अधिनियम ३९ – कलम २ द्वारे घातले.
१२. १९२० चा अधिनियम ३९ – कलम २ द्वारे स्पष्टीकरण ४ गाळले.
कलम २३ :
गैरलाभ (सदोष अभिलाभ) : गैरहानी (सदोष हानि) :
(See section 2(21) and 2(36) of BNS 2023)
गैरलाभ (सदोष अभिलाभ) :
गैरलाभ म्हणजे ज्या व्यक्तीला कायद्याने अधिकार नसतो अशा मालमत्तेचा बेकायदेशीर साधनांद्वारे मिळविलेला लाभ होय.
गैरहानी (सदोष हानि) :
गैरहानी म्हणजे ज्या व्यक्तीची हानी होत असते तिला वास्तविक कायदेशीर हक्क त्या मिळकतीवर असताना बेकायदेशीर साधनांद्वारे हानी होय.
जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी गैरपणे ठेवून घेते किंवा संपादन करते तेव्हा अशी व्यक्ती गैरपणे लाभ मिळविते असे म्हटले जाते.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही मालमत्तेपासून गैरपणे दूर ठेवले जाते किंवा वंचित केले जाते तेव्हा त्यास अशी व्यक्ती गैरपणे हानी सोसते असे म्हटले जाते.
कलम २४ :
अप्रामाणिकपणाने :
(See section 2(7) of BNS 2023)
जो कोणी एखाद्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा किंवा दुसऱ्या व्यक्तीची गैरहानी व्हावी या उद्देशाने जेव्हा कोणतीही गोष्ट करतो तेव्हा तो ती गोष्ट अप्रामाणिकपणाने करतो, असे म्हटले जाते.
कलम २५ :
कपटीपणाने (कपटपूर्वक) :
(See section 2(9) of BNS 2023)
एखाद्या व्यक्तीने जर लुबाडण्याच्या उद्देशाने एखादी गोष्ट केली तर तिने ती गोष्ट कपटीपणाने केली असे म्हटले जाते; परंतु एरवी नाही.
कलम २६ :
समजण्यास कारण (विश्वास करण्यासाठी कारण) :
(See section 2(29) of BNS 2023)
एखाद्या व्यक्तीस जर एखादी घटना समजून चालण्यास पुरेसे कारण असेल, तर तिला तसे समजण्यास कारण असल्याचे म्हटले जाते, पण एरवी नाही.
कलम २७ :
पत्नीच्या, कारकूनाच्या (लिपिक) किंवा चाकराच्या कब्जातील मालमत्ता :
जेव्हा एखादी मालमत्ता एखाद्या व्यक्तीच्या तर्फे (कारणे) त्या व्यक्तीच्या पत्नीच्या, कारकुनाच्या किंवा चाकराच्या कब्जात असते तेव्हा या संहितेच्या अर्थानुसार ती त्या व्यक्तीच्या कब्जातच असते.
स्पष्टीकरण :
तात्पुरती किंवा विशिष्ट प्रसंगी कारकून (लिपिक) किंवा चाकर (नोकर) या नात्याने नोकरीवर ठेवलेली व्यक्ती या कलमाच्या अर्थानुसार कारकून(लिपिक) किंवा चाकर असते.
कलम २८ :
नकलीकरण (कूटकरण) :
(See section 2(4) of BNS 2023)
जर एखाद्या व्यक्तीने एक वस्तू दुसऱ्या वस्तूशी सदृश (सारखी) अशी केली आणि त्या सादृश्याया साहाय्याने फसवणूक करण्याचा तिचा उद्देश असेल किंवा त्यामुळे फसवणूक होणे संभवनीय असल्याची तिला जाणीव असेल, तर ती नकलीकरण करते असे म्हटले जाते.
१.(स्पष्टीकरण १ :
नकलीकरणाकरीता अगदी तंतोतंत नक्कल असणे आवश्यक नाही.
स्पष्टीकरण २ :
जेव्हा एखादी व्यक्ती एक वस्तू दुसऱ्या वस्तूशी सदृश्य अशी करील आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीची फसगत होण्यासारखी असेल तेव्हा, विरुद्ध शाबीत होत नाही तोपर्यंत असे गृहीत धरले जाईल की, एक वस्तू याप्रमाणे दुसऱ्या वस्तूशी सदृश्य अशी करणाऱ्या व्यक्तीच्या त्या सादृश्याच्या साहाय्याने फसगत करण्याचा उद्देश होता किंवा त्यामुळे फसगत होणे संभवनीय असल्याची तिला जाणीव होती.)
———
१. १८८९ चा अधिनियम १ – कलम ९ द्वारे मूळ स्पष्टीकरणाऐवजी घातले.
कलम २९ :
दस्तऐवज :
(See section 2(8) of BNS 2023)
दस्तऐवज हा शब्द कोणत्याही बाबीचा पुरावा म्हणून अक्षरे, आकडे किंवा आकृत्या किंवा चिन्हे अशा साधनांनी किंवा अशा एकाहून अधिक साधनांनी कोणत्याही पदार्थावर व्यक्त केलेली किंवा रेखाटलेली किंवा अभिलिखित केलेली ती बाब दर्शवितो.
स्पष्टीकरण १ :
हे महत्वाचे नाही, की सदरची अक्षरे, आकडे, आकृत्या किंवा चिन्हे कोणत्या साधनाद्वारे किंवा कोणत्या पदार्थावर काढली आहेत अथवा तो पुरावा न्यायालयात वापरण्याचा उद्देश आहे की नाही.
उदाहरणे :
संविदेच्या अटी व्यक्त करणारा जो लेख त्या संविदेचा पुरावा म्हणून वापरता येईल तो दस्तऐवज होय.
बँकरवरील धनादेश हा दस्तऐवज होय.
मुखत्यारनामा हा दस्तऐवज होय.
पुरावा म्हणून जो वापरण्याचा उद्देश आहे किंवा जो वापरता येईल तो नकाशा किंवा तो आराखडा दस्तऐवज होय.
निदेश किंवा अनुदेश अंतर्भूत असलेला लेख हा दस्तऐवज होय.
स्पष्टीकरण २ :
वाणिज्यिक (व्यापारी) किंवा अन्य प्रथा रीतीरिवाजाप्रमाणे ज्याचे स्पष्टीकरण केले जाते अशी अक्षरे, आकडे, आकृत्या किंवा चिन्हे यामार्फत जे काही व्यक्त केले असेल ते जरी प्रत्यक्षपणे तसे व्यक्त केलेले नसले तरी अशी अक्षरे, आकडे, आकृत्या किंवा चिन्हे यांद्वारे ते या कलमाच्या अर्थानुसार व्यक्त केले असल्याचे मानले जाईल.
उदाहरण :
(क) आपल्या आदिष्टास प्रदेय असलेल्या विनिमयपत्राच्या मागे आले नाव लिहितो. व्यापारी परिपाठाअन्वये स्पष्ट केल्यानुसार पृष्ठांकनाचा अर्थ असा आहे की, त्या विपत्राची रक्कम धारकास द्यावयाची आहे. पृष्ठांकन हा दस्तऐवज आहे व धारकास द्यावेत हे शब्द किंवा त्या आशयाचे शब्द जणू काही स्वाक्षरीच्यावर लिहिलेले असावेत असे समजून त्याच रीतीने त्याचा अर्थ लावला पाहिजे.
कलम २९अ :
१.(इलेक्ट्रॉनिक अभिलेख :
(See section 2(39) of BNS 2023)
याचा अर्थ माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० (२००० चा २१) मधील व्याख्या कलम २ पोटकलम (१) खण्ड (न) मध्ये दिलेला अर्थ समजावा.
———
१. २००० चा अधिनियम २१ कलम ९१ आणि पहीली अनुसूची द्वारा घातले (१७-१०-२००० पासून).
कलम ३० :
मूल्यावान रोखा (प्रतिभूति) :
(See section 2(31) of BNS 2023)
मौल्यवान रोखा याचा अर्थ जो दस्तऐवज कोणत्याही वैध हक्काची निर्मिती, विस्तारण, हस्तांतरण, निर्बंधन, विलोपन (नाहीसा करणे), परिमोचन (सोडून देणे) या गोष्टी करतो किंवा आपण ज्याद्वारे वैध दायित्व अधीन आहोत किंवा आपणास वैध हक्क नाही असे कोणीही व्यक्ती अभिस्वीकृत करते असा दस्तऐवज आहे किंवा तसा असल्याचे दिसते तो दस्तऐवज दर्शवला जातो.
उदाहरण :
(क) विनिमयपत्राच्या मागे आपले नाव लिहितो. जी व्यक्ती त्या विपत्राची कायदेशीर धारक होईल अशा कोणत्याही व्यक्तीला त्यावरील हक्क हस्तांतरित होणे हा या पृष्ठांकनाचा परिणाम असल्यामुळे ते पृष्ठांकन (मान्यता / सही) म्हणजे मूल्यवान रोखा होय.
कलम ३१ :
मृत्युपत्र (विल):
(See section 2(34) of BNS 2023)
मृत्युपत्र (विल) हा शब्द कोणताही मृत्युपत्रीय दस्तऐवज दर्शवितो.
कलम ३३ :
कृती (कार्य) – अकृती (वर्ज करणे) :
(See section 2(1) and 2(25) of BNS 2023)
कृती हा शब्द एक कृती व त्याचप्रमाणे कृतींची मालिकादेखील दर्शवितो तसेच अकृती हा शब्द एक अकृती व त्याचप्रमाणे अकृतीची मालिकादेखील दर्शवितो.
कलम ३९ :
इच्छापूर्वक (स्वेच्छया) :
(See section 2(33) of BNS 2023)
एखादी व्यक्ती ज्याद्वारे एखादा परिणाम घडवून आणण्याचा तिचा उद्देश होता त्या साधनाद्वारे अथवा ज्यामुळे तो परिणाम घडून येण्याचा संभव आहे अशी तिला त्याचा वापर करण्याच्या वेळी जाणीव होती किंवा तसे समजण्यास कारण होते त्या साधनाद्वारे तो घडवून आणते तेव्हा, तो परिणाम तिने इच्छापूर्वक घडवून आणला असे म्हटले जाते.
उदाहरण :
(क) एका मोठ्या नगरातील वस्ती असलेल्या घरास रात्री जबरी चोरीचे काम सुकर करण्यासाठी आग लावतो व अशा प्रकारे एका व्यक्तीचा मृत्यू घडवून आणतो. याबाबतीत मृत्यू घडवून आणावा असा (क) चा उद्देश नसेल आणि आपल्या कृतीमुळे मृत्यु घडून आल्याबद्दल त्याला खेदही होईल : तथापि, जर आपण मृत्यूस कारणीभूत होण्याचा संभव होता याची त्यास जाणीव असेल तर, त्याने तो मृत्यू इच्छापूर्वक घडवून आणला असे होते.
कलम ४० :
१.(अपराध :
(See section 2(24) of BNS 2023)
या कलमाच्या खंड (२) (३) याखाली नमूद केलेली २.(प्रकरणे) व कलमे वगळता अन्यत्र अपराध हा शब्द संहितेद्वारे शिक्षापात्र केलेली गोष्ट दर्शवितो.
प्रकरण ४ थे, ३.(प्रकरण ५-अ), यामध्ये आणि पुढील कलमांमध्ये म्हणजेच कलमे ४.(६४, ६५, ६६, ५.(६७), ७१), १०९, ११०, ११२, ११४, ११५, ११६, ११७, १.(११८, ११९ व १२०) १८७, १९४, १९५, २०३, २११, २१३, २१४, २२१, २२२, २२३, २२४, २२५, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३४७, ३४८, ३८८, ३८९ आणि ४४५ यामध्ये अपराध हा शब्द या संहितेखाली किंवा यात यापुढे केलेल्या व्याख्येप्रमाणे असलेल्या विशेष किंवा स्थानिक कायद्याखाली शिक्षापात्र असलेली गोष्ट दर्शवितो.
आणि कलमे १४१, १७६, १७७, २०१, २०२, २१२, २१६, आणि ४४१ यामधील स्थानिक आणि विशेष कायद्याखाली शिक्षापात्र असलेली गोष्ट अशा कायद्याखाली सहा महिने किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस मग ते द्रव्यदंडासह असो वा त्याविना असो, पात्र असते तेव्हा अपराध याचा अर्थ तोच असतो.)
———-
१. १८७० चा अधिनियम २७ – कलम २ द्वारे मूळ कलमाऐवजी घातले.
२. १९३० चा अधिनियम ८ – कलम २ व अनुसूची १ यांद्वारे प्रकरण याऐवजी हा शब्द उल्लेख घातला.
३. १९१३ चा अधिनियम ८ – कलम २ द्वारे घातले.
४. १८८२ चा अधिनियम ८ – कलम १ द्वारे घातले.
५. १८८६ चा अधिनियम १० – कलम २(१) द्वारे घातले.
६. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००८(२००९ चा १०) कलम ५१ (ब) द्वारे घातला (२७-१०-२००९ पासून)
कलम ४१ :
विशेष कायदा :
(See section 2(30) of BNS 2023)
विशेष कायदा म्हणजे विशिष्ट विषयाला लागू असलेला कायदा होय.
कलम ४२ :
स्थानिक कायदा :
(See section 2(18) of BNS 2023)
स्थानिक कायदा म्हणजे १.(२.(भारतातील)३.(***)) केवळ विशिष्ट भागालाच लागू असलेला कायदा होय.
———
१. अनुकूलन आदेश १९४८ द्वारा ब्रिटिश इंडियाच्या याऐवजी घातले.
२. १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे राज्ये याऐवजी हा शब्द उल्लेख घातला. अनुकूलन आदेश १९५० द्वारे प्रांत याऐवजी राज्ये असा शब्द उल्लेख घातला होता.
३. १९५२ चा अधिनियम ४८ – कलम ३ व अनुसूची २ यांद्वारे समाविष्ट राज्यक्षेत्रांच्या हा मजकूर वगळला.
कलम ४३ :
अवैध : करण्यास विधित बद्ध असणे :
(See section 2(15) of BNS 2023)
अवैध हा शब्द जी गोष्ट अपराध असेल किंवा जी कायद्याद्वारे मनाई केली असेल किंवा जी दिवाणी कारवाईकरिता आधारकारण होत असेल अशा प्रत्येक गोष्टीला लागू आहे.
करण्यास विधित बद्ध असणे: म्हणजे ज्या वेळी एखाद्या व्यक्तीने कोणतीही गोष्ट न करणे अवैध असते, त्या वेळेस ती गोष्ट करण्यास कायद्याने बांधलेला आहे किंवा करण्यास विधित: बद्ध आहे असे म्हटले जाते.
कलम ४४ :
क्षती(नुकसान ):
(See section 2(14) of BNS 2023)
क्षती हा शब्द कोणत्याही व्यक्तीला तिचे शरीर, मन, लौकिक किंवा मालमत्ता यांच्या बाबतीत अवैधपणे घडवून आणलेला कोणताही अपाय दर्शवितो.
कलम ४५ :
जीवित (जीवन) :
(See section 2(17) of BNS 2023)
संदर्भावरुन विरुद्ध काही दिसत नसेल तर – जिवित (जीवन)हा शब्द मनुष्यप्राण्याचे जीवित (जीवन) दर्शवितो.
कलम ४६ :
मृत्यू :
(See section 2(6) of BNS 2023)
संदर्भावरुन विरुद्ध काही दिसत येत नसेल, तर मृत्यू हा शब्द मनुष्यप्राण्याचा मृत्यू दर्शवितो.
कलम ४७ :
प्राणी (जीवजन्तु) :
(See section 2(2) of BNS 2023)
प्राणी हा शब्द मनुष्यप्राणी वगळता इतर कोणताही सजीव प्राणी (जीवजन्तु) दर्शवितो.
कलम ४८ :
जलयान :
(See section 2(32) of BNS 2023)
जलयान हा शब्द मनुष्यप्राणी किंवा मालमत्ता जलमार्गाने वाहून नेण्यासाठी तयार केलेली कोणतीही वस्तू दर्शवितो.
कलम ४९ :
वर्ष. महिना :
(See section 2(20) of BNS 2023)
वर्ष किंवा महिना हा शब्द जेथे जेथे आलेला आहे तेथे तेथे वर्षाची किंवा महिन्याची गणना ब्रिटिश कालगणनेप्रमाणे करावयाची असते, असे समजावे.
कलम ५० :
कलम :
हा शब्द या संहितेच्या प्रकरणाचे जे भाग त्यामागे जोडलेल्या संख्यादर्शक आकड्यामार्फत वेगवेगळे दाखविले असतील त्यापैकी एक भाग दर्शवितो.
कलम ५१ :
शपथ :
(See section 2(23) of BNS 2023)
शपथ या शब्दात विधित: (कायद्याने) शपथेऐवजी योजलेले गांभीर्यपूर्वक दृढकथन आणि लोकसेवेकासमोर करावयाचे आणि शाबितीसाठी पुढे उपयोगात आणावयाचे म्हणून, मग ते न्यायालयात असो वा नसो, यात विधित: (कायद्याने) आवश्यक किंवा प्राधिकृत केलेले कोणतेही अभिकथन (निवेदन) यांचा समावेश आहे.
कलम ५२ :
सद्भावपूर्वक :
(See section 2(11) of BNS 2023)
जेव्हा एखादी गोष्ट प्रामाणिकपणे आणि जरुर ती काळजी घेऊन आणि अवधान ठेवून केली जाते किंवा समजली जाते तेव्हा ती सद्भावपूर्वक केली आहे किंवा समजली गेली आहे, असे म्हटले जाते.
कलम ५२-अ :
१.(आसरा देणे (संश्रय) :
(See section 2(13) of BNS 2023)
या संहितेमधील कलम १५७ आणि १३० मध्ये आसरा, नवरा बायको यांनी एकमेकांस दिलेला आहे तो वगळता, आसरा देणे त्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला आश्रय देणे असा आहे, म्हणजेच त्याची अटक चुकविण्यासाठी त्याला अन्नपाणी, पैसा, कपडे, शस्त्रे, दारुगोळा किंवा ने-आण करण्याची साधने पुरवणे किंवा त्या व्यक्तीला कोणत्याही रीतीने सहाय्य करणे यांचा समावेश आहे.)
———
१. १९४२ चा अधिनियम ८ कलम २ द्वारे घातले.
कलम २१६-ब :
१.( कलम २१२,२१६ आणि २१६-अ यामधील आसरा देणे याची व्याख्या) :
(See section 2(13) of BNS 2023)
भारतीय दंडसंहिता (दुरूस्ती) कायदा १९४२ (सन १९४२ चा क्रमांक ८) कलम ३ द्वारे कमी करण्यात आली आहे.
———
१. हे कलम १८९४ चा अधिनियम ३ – कलम ८ नुसार समाविेष्ट करण्यात आले होते.