भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४७७-अ:
१.(खोटे हिशेब तयार करणे :
(See section 344 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : खोटे हिशेब तयार करणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
लिपिक, पदाधिकारी, किंवा सेवक असलेला अथवा लिपिक, पदाधिकारी किंवा कर्मचारी याच्या कामावर नेमलेला किंवा ते काम करणारा जो कोणी बुद्धिपुरस्सर आणि लुबाडण्याच्या उद्देशाने, आपल्या नियोक्त्याच्या मालकीची किंवा त्याच्या कब्जात असलेली किंवा आपल्या नियोक्त्याकरिता मालकीची किंवा त्याच्या कब्जात असलेली किंवा आपल्या नियोक्त्याकरिता किंवा त्याच्या वतीने घेतलेली अशी कोणतीही २.(वही, इलेक्ट्रॉनिक अभिलेख, कागद, लिखाण) मल्यवान रोखा किंवा हिशेब नष्ट करील, बदलील, विच्छिन्न करील किंवा खोटी तयार करील, अथवा बुद्धिपुरस्सर आणि लुबाडण्याच्या उद्देशाने अशी कोणतीही १(वही, इलेक्ट्रॉनिक अभिलेख, कागद, लिखाण) मूल्यवान रोखा किंवा हिशेब यामध्ये कोणतीही खोटी नोंद करील, अगर त्यातील एखादा महत्वाचा तपशील त्यामधून गाळून टाकील, किंवा तो बदलील अगर तो गाळण्यास किंवा बदलण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
स्पष्टीकरण :
या कलमाखालील दोषारोपात, कोणाला लुबाडण्याचा उद्देश होता त्या विशिष्ट व्यक्तीचे नाव न देता अथवा कपटविषय म्हणून पैशांची कोणती रक्कम उद्देशित होती ती विशिष्ट रक्कम, किंवा ज्या दिवशी तो अपराध करण्यात आला तो विशिष्ट दिवस विनिर्दिष्ट न करता लुबाडण्याचा सर्वसाधारण उद्देश होता असे अभिकथन करणे पुरेसे होईल.)
——–
१. १८९५ चा अधिनियम ३ – कलम ४ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
२. सन २००० चा अधिनियम क्र. २१ याचे कलम ९१ व अनुसूचीद्वारे मूळ मजकुराऐवजी १७-१०-२००० पासून घातला.